बेताल वर्तनामुळे राज्यातील महायुती सरकारच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या मंत्र्यांना कारवाईऐवजी केवळ समज देऊन सोडून द्यावे लागणे केवळ युतीच्या राजकारणाचीच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही अपरिहार्यता दाखवून देणारे आहे. माणिकराव कोकाटे, संजय शिरसाठ व योगेश कदम या तीन मंत्र्यांवर कारवाई होणार, असे वातावरण गेल्या काही दिवसांपासून निर्माण केले गेले होते, पण प्रत्यक्षात असे काही नव्हतेच हे काल मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे संजय शिरसाठ व योगेश कदम या तिघांचेही प्रमाद तसे गंभीर स्वरूपाचे. नेहमी बेताल बोलण्यामुळे चर्चेत येणारे कोकाटे भर सभागृहात २० ते २२ मिनिटे पत्त्याचा डाव रंगवत होते असे प्राथमिक चौकशीतून बाहेर आलेले. संजय शिरसाठ यांच्या पैशाच्या बॅगेची चित्रफीतच समोर आलेली. त्याला त्यांच्या घरातूनच पाय फुटल्याची चर्चा रंगलेली. योगेश कदमांच्या कुटुंबातील बारमध्ये मुली नाचतात हे पोलिसांच्या धाडीतून स्पष्ट झालेले. या तिघांविरुद्ध इतका ढळढळीत पुरावा असताना ‘स्वच्छ प्रतिमे’च्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना केवळ फैलावर घेता यावे ही या सरकारची अगतिकता दर्शवणारे.

मित्रपक्षांबरोबर सरकार चालवताना अनेक अडचणी येतात. धोरणात्मक मुद्द्यावर अशी गोची झाली तर ती समजून घेता येण्यासारखी. मात्र या तीनही मंत्र्यांमुळे सरकारच्याच प्रतिमेला तडा गेला असताना त्यांना केवळ समज देऊन अभय देण्यामागचे कारण काय? याचे उत्तर सरकारात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आधी आखलेल्या डावपेचात दडले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपच्याच पुढाकाराने राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष फोडले गेले. वैकल्पिक नेतृत्व उभे करून नवे पक्ष निर्माण करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. त्यावर निवडणुकीतील विजयाने मोहोर उमटवली. पण पक्ष सांभाळण्याच्या मुद्द्यावर या नेतृत्वाला मर्यादा असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट दिसले.

एरवी कठोर भासणारे अजितदादा असोत वा शिंदे, त्यांचा त्यांच्याच पक्षातील सहकाऱ्यांवर पुरेसा अंकुश नाही हेच यातून दिसले. याला जोड मिळाली ती सरकारमधील पक्षांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाची. नेहमी आमचेच मंत्री लक्ष्य का असा सूर राष्ट्रवादीच्या गोटात उमटलेला तर मित्रपक्षांच्याच मंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे असे शिंदेंच्या सेनेतील अंतस्थ वर्तुळाचे म्हणणे. यातूनच मग दोन दिवसांपूर्वी इजा बिजा तिजाची भाषा करणारे अजितदादा मवाळ होत गेले, तर एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांच्या बारव्यवसायाची चक्क जाहीरपणे पाठराखण केली. या घडामोडी महायुतीत समन्वयाऐवजी विसंवादाला कारणीभूत ठरू शकतात हे लक्षात आल्यानेच कदाचित मुख्यमंत्र्यांनी मवाळ धोरण स्वीकारले असावे.

मात्र प्रश्न एवढ्यापुरता मर्यादित नाही. केवळ ही ‘समज’ ऐकून हे मंत्री सुधारतील का हा आहे. बेताल बडबड वा वर्तन हा स्वभावदोषाचा प्रकार समजला जातो. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यामुळे कोकाटे व शिरसाठ आपल्या स्वभावात बदल करतील का? तशी उपरती त्यांना होण्याचे कोणतेही लक्षण सध्या तरी दिसत नाही. योगेश कदम यांचे कुटुंबीय डान्सबारचा व्यवसाय खरोखर त्यागतील का, याही प्रश्नाचे उत्तर सध्यातरी नकारात्मक.

याचाच अर्थ काही काळानंतर परिस्थिती जैसे थे होणार. मग अशा स्थितीत भाजप काय करणार? या बदनामीचे शिंतोडे या पक्षाच्या अंगावर आता उडू लागले आहेत. मग भाजपच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ या प्रतिमेचे काय? केवळ निवडणुकीतील प्रचारापुरते हे धोरण मर्यादित आहे काय? सत्तेसाठीची राजकीय गरज म्हणून आपणच उभे केलेले हे पक्ष आपल्याच अंगावर उलटत आहेत याची जाणीव भाजपला कधी होणार? सध्याच्या संख्याबळाचा विचार केला तर सत्ता चालवण्यासाठी भाजपला या मित्रपक्षांची फार गरज नाही. तरीही या पक्षाच्या मंत्र्यांकडून वारंवार होणाऱ्या चुका भाजप का पदरात घालत आहे? युतीत तीन पक्षांची एकत्र मोट दिल्लीहून बांधण्यात आली असे राज्यातले भाजपचे नेते सांगतात, तर हे सर्व राज्यपातळीवरच घडून आले असे दिल्लीतले नेते सांगतात.

ही संदिग्धता आणखी काही दिवस कायम राहावी यासाठी ही अभय योजना राबवली जात आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला कार्यकाळ उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्याचा नमुना होता. तेव्हा त्यांनी दाखवलेली राजकीय समज वाखाणण्याजोगी होती. तेव्हाही त्यांच्यावर वारंवार ‘क्लीनचीट’ देण्याचे आरोप झाले. पण खडसेसारख्यांना घरी बसवून त्यांनी योग्य तो संदेश दिला. आताही त्यांच्याकडून अशीच अपेक्षा असताना त्यांनी मवाळ होणे समजण्यापलीकडचे आहे. या मंत्र्यांच्या गैरवर्तनाचा फटका केवळ मित्रपक्षांनाच नाही तर भाजपलासुद्धा बसेल हे ठाऊक असूनसुद्धा ते मवाळ का? राज्यातील मतदारांनी इतके उदंड बहुमत पदरात टाकले असताना चुकीला क्षमा नाही, असेच धोरण त्यांनी राबवणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात भलतेच घडताना दिसत असल्याने महायुतीत नेमके चाललेय काय?