दरवर्षी गांधी जयंती आणि पुण्यतिथीला ‘गांधी आणि प्रासंगिकता’ या विषयावर चर्चा होते ! गांधीवादाचा प्रभाव ओसरलेला नाही. कदाचित गेल्या काही वर्षांत तो काकणभर वाढलेलाच आहे, असा एक सूर असतो आणि दुसरीकडे गांधी एक विचार म्हणून शाश्वत आहेत, मात्र राजकीय शक्ती म्हणून या विचाराची उपयोगिता क्षीण होत आहे, असे काहींचे म्हणणे असते. अर्थात डावे, उजवे, समाजवादी, आंबेडकरी अशा सगळ्यांचे गांधीवादाबद्दल मतभेद असतील, मात्र गांधी कोणत्याही गटाला वर्ज्य नाहीत ही बाब ज्येष्ठ गांधीवादी प्रा. अशोक चौसाळकर, पुणे विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर तसेच ‘साप्ताहिक साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांच्यासारखे अभ्यासक, लेखक, संपादक मान्य करतात.

एकीकडे गांधींचा सरकारी पातळीवर उत्सवमूर्ती म्हणून विपुल वापर होत असतानाच समाजमाध्यमे आणि युवावर्गात गांधी हा मीम आणि खिल्लीचा विषय झाला आहे. याची कारणमीमांसा करताना बऱ्याच जणांचा प्रवास २०१४ आणि रा. स्व. संघापर्यंत येऊन थांबतो. मात्र तात्कालिक कारणांपेक्षा रचनात्मक विश्लेषण करताना अल्गोरिदम, समाजमाध्यमे आणि एआय यांचा प्रभाव हा गांधी आणि गांधीवादाच्या प्रभावाला नवीन आव्हान म्हणून उभे राहताना दिसत आहे.

गांधी समजून घेताना…

बऱ्याचदा प्रथम वाचकाला गांधीवाद हा विनोदाचा विषय वाटू शकतो. समाजमाध्यमांच्या युगात ३० सेकंदाच्या रीलवर ज्ञानार्जन करण्याच्या युगात, गांधी समजून घेताना हाच सर्वात मोठा धोका आहे. गांधी समजून घेताना केवळ अहिंसा, सत्य आणि सत्याग्रह या आयुधांपेक्षा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श घेणे जास्त गरजेचे आहे. एक उच्चशिक्षित, विदेशी स्वातंत्र्याची चव चाखलेला, दुसऱ्या देशात वकिली करणारा माणूस धर्म, सात्त्विकता, सत्य, अहिंसा यांची भाषा करतो तेव्हा तो अनेक अदृश्य विषयांवर भाष्य करत असतो. मार्क्स सत्ताबदलासाठी क्रांतीची भाषा करत असेल तर गांधी व्यापक पातळीवर विचार करून क्रांतीच्या टिकाऊपणाबद्दल चिंताक्रांत होतात. प्रतिक्रांतीच्या शक्यतेच्या जाणिवेतून ते लढ्याचे स्वरूप शरीर आणि मनापर्यंत मर्यादित न ठेवता आत्म्यापर्यंत नेऊन ठेवतात. सत्ताबदलानंतर हिंसेचे स्वरूप मर्यादित राहून वैयक्तिक स्वार्थापलीकडील तत्त्वांचा विचार होऊन अमूल्य अशा मानवी जीवनाची अबाधितता टिकणे ही त्यांची प्राथमिकता! त्यासाठी कोणतीही टोकाची भूमिका न घेता गांधी सर्वसमावेशकता, मध्यम मार्ग आणि व्यावहारिकतेचा बारकाईने विचार करतात. एकंदरीतच गांधीविचार हा राजकारणाला शुचिर्भूत करण्याचे सूत्र नसून व्यावहारिकतेचा आणि अजातशत्रू राजकारणाचा व्यूह आहे.

डिजिटल कसोट्यांवर गांधी

डिजिटल व्यासपीठे ही वैचारिक ध्रुवीकरण, सनसनाटी, मतैक्यापेक्षा मतभेदांचा पुरस्कार, प्रचंड वेग, भावनातिरेक या इंधनावर चालतात. तिथे मध्यममार्ग, सर्वसमावेशकता या गोष्टी उपजतच नाकारल्या जातात. या पिढीत वाढणाऱ्यांसाठी साहजिकच या मध्यममार्गाचे आकर्षण नाहीसे होणे स्वाभाविक आहे. संयम हा गांधीवादाचा आत्मा! हजारो कार्यकर्ते गांधींच्या एका शब्दाखातर दमनकारी साम्राज्याच्या लाठ्या सहन करण्यासाठी, डोकी फोडून घेण्यासाठी तयार होतात, तेव्हा त्या कार्यकर्त्याचा त्याग आणि शौर्य समाजमाध्यमावरील कार्यकर्त्याच्या तुलनेत अतुलनीय असते. मात्र ही समाजमाध्यमे सहनशीलतेपेक्षा आक्रमणाला चिथावणी देतात. स्वत:चे अवलोकन करण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याचे पातळी सोडून वैचारिक/ चारित्र्य हनन करून हिंसेला प्रोत्साहन देतात. अशा वेळी आक्रमण हे धाडस नसून सहनशीलता हे धाडस आहे हा गांधीविचार अल्गोरिदमच्या बाजाराला अनाकर्षक वाटतो. परंपरा आणि रूढी यांचा व्यापक अर्थ लावून गांधींनी राजकारणामध्ये शुचिर्भूतता आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच धर्म, रूढी आणि परंपरांचा वापर आज ‘आपण आणि ते’ ही चौकट फाकवण्यासाठी केला जात आहे. ही धग एवढी तीव्र झाली आहे की, शेकडो वर्षांपासून भिन्न धर्मीयांना एकत्र आणणाऱ्या प्रथा धर्मविरोधी म्हणून टीकेच्या धनी होत आहेत. समाजमाध्यमांवरील हा पीडित आक्रोश एवढा तीव्र झाला आहे की काही घटकांकडून ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ या भजनाच्या ओळींवरदेखील आक्षेप नोंदविण्यात आले. सत्याग्रह हा निषेधाचा केवळ एक मार्ग नसून आंतरिक विकासातून सामाजिक-राजकीय जाणिवेच्या प्रगल्भतेचा रस्ता आहे. आजचा सत्याग्रह हा समाजमाध्यमांवरील प्रोफाइल छायाचित्रे बदल करून त्याबद्दल एखादी पोस्ट करण्यापुरता मर्यादित झाला आहे. रस्त्यावर उतरून केलेल्या मूठभरांच्या उपोषणांपेक्षा ढीगभरांनी बदललेली प्रोफाइल चित्रे समाजमाध्यमांवर जास्त प्रभावी ठरत आहेत. प्रभावकांच्या (Influencer) गर्दीत बरेच जण निषेध, विरोध आणि अहिंसेचा पुरस्कार करून गांधीविचारांची ज्योत तेवत ठेवल्याचा दावा करतात. मात्र हेतूंची शुद्धी हा गांधीविचारांचा गाभा आहे. मात्र उपोषण हे राजकीय स्वार्थासाठी अथवा वेठीला धरण्याचे (ब्लॅकमेलिंग) राजकीय साधन म्हणून वापरले जात असेल तर सर्वच उपोषणांना गांधीवादी म्हणणे फसगत करून घेण्यासारखे आहे.

सध्याच्या कॅमेराकेंद्री युगात दिखाऊ गोष्टींवर भर दिला जातो. अशा वेळी गांधींची सामान्य राहणीमानाची शिकवण अश्मयुगीन गोष्ट वाटण्याची शक्यता आहे. या कॅमेराकेंद्री युगात वृक्ष तोडताना घातलेला केवळ शेवटचा घाव लक्षणीय ठरतो. अशा वेळी १९२० च्या असहकार आंदोलनापासून १९४२च्या ‘चले जाव’पर्यंत ब्रिटिश साम्राज्यावर घातलेले असंख्य घाव दुर्लक्षित होण्याचा धोका आहे. गांधीव्यूहामध्ये सावकाश मात्र निरंतर कार्य करण्यास प्रोत्साहन दिले जाते. फावल्या वेळेतसुद्धा विधायक कार्य करण्यावर भर देऊन कार्यकर्ते आणि समाज यांच्यामध्ये असणारी नाळ मजबूत करण्यावर भर दिला जातो. एवढ्या दीर्घ, बहुस्तरीय चळवळीची आज समाजामध्ये लोकप्रियता आणि स्वीकारार्हता टिकवून ठेवणे आणि समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे जिकिरीचे काम आहे. विशेषत: समाजमाध्यमांवर निषेधाचा सोपा मार्ग अस्तित्वात असताना लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे दु:साहस कशासाठी? हाच प्रश्न उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

विचारांपासून व्यक्तीपर्यंत

गांधी ही व्यक्ती किंवा नेतृत्व म्हणून विचार करता अल्गोरिदम वादग्रस्त, कणखर आणि करिश्माई नेतृत्वाला प्राधान्य देत असताना या माणसाने देशाचा अनभिषिक्त सम्राट असताना स्वत:च्या चुका मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला. ‘सत्याचे प्रयोग’मध्ये त्यांनी दाखवून दिले की चुका हे अपयश नसून जगण्याच्या प्रयोगात स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी माहितीकेंद्रे आहेत. गांधी, त्यांच्या विरोधाभास, उत्क्रांती आणि मान्य केलेल्या चुकांसह पचपचीतपणाला बळी पडतात. ‘सत्याचा शोध’ हा त्यांचा तत्त्वज्ञानाचा मूलभूत सिद्धांत – म्हणजेच एखाद्याची समजूत तात्पुरती आणि बदलण्यासारखी असू शकते ही कल्पना -डिजिटल जगातील ‘स्थिर’ मते आणि गटबाजीच्या बाजारात पूर्णपणे विसंगत आहे. जिथे प्रत्येक विधान एक कायमचे रेकॉर्ड बनते आणि विरोधकांद्वारे ते हत्यार म्हणून वापरले जाऊ शकते अशा वातावरणात ‘सत्याचे प्रयोग’ राजकीयदृष्ट्या आत्मघात होऊ शकतात. विचारांची लढाई लढताना ‘गांधी विरुद्ध आंबेडकर’ किंवा ‘गांधी विरुद्ध सावरकर’ अशी नवी परिमाणे उपस्थित राहून गांधींना फाळणीवादी, जातीय दाखवून त्यांचे खलनायकीकरण करण्याचा प्रयत्न जोमाने चालू आहे. मुळातच हे विषय तात्कालिक संदर्भ असलेले आणि नेत्यांमध्ये सखोल चर्चा होऊन मतभेद निर्माण झालेले आहेत. अशा वेळी अल्गोरिदमची कार्यपद्धती त्याचे अतिसुलभीकरण करून ‘हे विरुद्ध ते’ अशी विभाजनवादी मांडणी करून वर्षांची वैचारिक देवाणघेवाण सेकंदांवर आणतात. अस्मिता आणि विचारांची टोकदार भूमिका नसल्याने गांधींची अनाकर्षकता वाढणे साहजिक आहे. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ सांगतात की, ‘प्रा. यशवंत सुमंत यांच्यासारख्या गांधीवाद्यांनी आंबेडकरी, डावे यांच्याबरोबर शिबिरांचे आयोजन करून मतभेद कमी करण्याचा प्रयत्न केला.’ मात्र आज बंदिस्त चर्चाविश्वामुळे (इको चेंबर्स) दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्याच्या मन:स्थितीतच कार्यकर्ते नाहीत. गांधींच्या समर्थकांनी केलेले त्यांचे दैवतीकरण हा गांधीवादाच्या पतनासाठी कारणीभूत ठरलेला आणखी एक महत्त्वाचा घटक! समाजमाध्यमे अस्तित्वात असणारे दोष उघडे पाडून त्यांना अधिक महत्त्व देतात. या दैवतीकरणाच्या प्रयत्नात डिजिटल युगामध्ये गांधींना बदनाम करणे अधिक सोपे झाले.

अहिंसा, सत्य आणि सत्याग्रह यांपलीकडे गांधी हा सहअस्तित्वाचा आणि सर्वसमावेशक राजकारणाच्या निरंतरतेचा मार्ग आहे. गांधी हे भारताला राजकीय विचारांचे मिळालेले वरदान आहे. त्याची खिल्लीदेखील बऱ्याचदा उडवली गेली आहे. मात्र सध्याचा प्रश्न विरोध कोण करते यापेक्षा कसा केला जातो असा आहे. अन्यथा उथळ आकलनाच्या भोवऱ्यात सापडून गांधी म्हणजे ‘शहरी नक्षलवादी’ आणि गांधी म्हणजे दुबळेपणा हे समीकरण रूढ होऊन हा महात्मा मीममध्ये विरून जायला वेळ लागणार नाही.