अपयशामुळे सैरभैर झालेल्या उद्धवराव ठाकरेंना आपले नेमके चुकले कोठे याचाच शोध अद्याप लागलेला नाही. ज्याच्या पक्षाची संपलेला पक्ष अशी टिंगलटवाळी केली त्याच राज ठाकरेंकडे जाण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली आहे. राजकारणातील ‘फिरता रंगमंच’ अशी ख्याती मिळवलेल्या राज ठाकरेंच्या मनसेचेही २०१४ च्या निवडणुकीनंतर घसरलेले इंजिन अजूनही रुळावर येऊ शकलेले नाही…

महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांत सर्वाधिक महत्त्व मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना आहे, हे सांगण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही. मुंबई महापालिकेचा पोपट पुन्हा आपल्याच पिंजऱ्यात अडकावा यासाठी उद्धवराव ठाकरेंना देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची अखेरची लढाई आहे, असा समज करून घेतल्यामुळे आपल्या हातातले सारे काही पणाला लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अर्थात त्यांनी स्वत: हूनच ही वेळ ओढवून घेतली आहे. ज्या सख्ख्या मावस आणि चुलत भावाला त्यांनी पक्षाबाहेर काढले, ज्याच्या पक्षाची संपलेला पक्ष अशी टिंगलटवाळी केली त्याच राज ठाकरेंचे पाय धरण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली आहे. उबाठांकडून झालेला सगळा अपमान विसरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करून ऑफर मान्य केली हा त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल. मात्र त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या स्वत:च्या राजकीय अस्तित्वाच्या चिंतेची किनार आहे.

२०१४ नंतर सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे राज ठाकरेंना आपल्या अस्तित्वाचा घोर लागला आहे. त्या राजकीय अपरिहार्यतेतून त्यांना उद्धव ठाकरेंशी समझोता करणे भाग पडले असावे. असो. गेली १९ वर्षे एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या या दोघा भावांना एकत्र यावेसे वाटले यावरून मुंबई महापालिकेचा पोपट किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या अफवेने उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला लॉटरी लागली होती. विधानसभा निवडणुकीत अशी कोणतीच लॉटरी मदतीला नव्हती. त्यातून पदरी आलेल्या जबरदस्त अपयशामुळे उद्धव ठाकरेंचा खणखणीत मुखभंग झाला. त्या अपयशामुळे सैरभैर झालेल्या उद्धवराव ठाकरेंना आपले नेमके चुकले कोठे याचाच शोध अजून लागलेला नाही. हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या युवराज राहुल गांधींना त्यांच्या सल्लागारांनी मतदार यादीतील चुकांचा मुद्दा लावून धरण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्राच्या निकालानंतर ईव्हीएम यंत्रांवर शंका घेणाऱ्या युवराजांनी मग मतदार याद्यांतील चुकांचा शोध घेऊन त्याच्या आधारे रडण्याचे, भेकण्याचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. उद्धवराव ठाकरेंनीही मग आपल्या बुद्ध्यांकाचा कौल मानत राहुल गांधींच्या रडगाण्यात आपला आवाज मिळवण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्याबरोबर केलेली हातमिळवणी मुंबई महापालिकेत विजय मिळवण्यासाठी पुरेशी ठरणार नाही हे लक्षात आल्यामुळे उद्धवराव ठाकरेंनी काळी पात लावून रडणे सुरू केले आहे. मतदार याद्यांच्या दुरुस्तीच्या मुद्द्यासाठी मोर्चाचा घाट म्हणूनच घातला गेला. असे अनेक मोर्चे काढा पण जनतेच्या मनात स्थान मिळवण्यासाठी अशा मोर्चांचा उपयोग नाही हे उद्धवराव कधी ध्यानात घेणार?

एका महापालिकेसाठी एवढे असाहाय्य होण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर का आली याचे आत्मपरीक्षण ते स्वत: कधीच करणार नाहीत. नुकताच उद्धवरावांनी आपल्या गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. शिवसेनेचे प्रमुखपद हाती आल्यानंतर पक्षाची शाखाप्रमुखापासूनची संघटनात्मक रचना संपवून टाकणाऱ्या उद्धवरावांना आता गटप्रमुखांना भेटावेसे वाटू लागले आहे. राजकारणात परिश्रम करावे लागतात , मेहनतीने विश्वासार्हता मिळवावी लागते हे उद्धवरावांच्या गावीही नाही. कोथळा, खंजीर, मर्दाची औलाद एवढीच बुद्धीमर्यादा असल्याने त्यापलीकडे उद्धवराव कधी गेलेच नाहीत. मुंबईला गुजरातच्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडेन, ही गर्जना केली की आपला मतदार खूश होईल या कल्पनेत वर्षानुवर्षे वावरणाऱ्या उद्धवरावांनी संघटना बांधणीकडे किती दुर्लक्ष केले हे जुनेजाणते शिवसैनिक सांगतील. अनेक वर्षे मुंबईची सत्ता भोगूनसुद्धा मुंबईकरांसाठी केलेले एकही भरीव काम दाखवू न शकणाऱ्या उद्धवरावांना विकासाऐवजी भावनात्मक मुद्द्यांचा म्हणूनच आधार घ्यावा लागतो.

मुंबई मेट्रोचा आरे ते कफ परेड हा भुयारी मार्ग सुरू झाल्यावर मुंबईकरांना झालेला आनंद समाज माध्यमांवरील प्रतिक्रियांतून व्यक्त होत आहे. याच मेट्रोच्या कामाला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याझाल्या स्थगिती दिली होती. या मेट्रोतून प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक मोदी सरकार आणि फडणवीस सरकारला मनापासून धन्यवाद देतातच पण ही मेट्रो रखडवल्याबद्दल उद्धवराव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांचा खुलेआम कसा उद्धार करतात हे मेट्रोतून प्रवास केल्यावरच समजेल. उद्धव ठाकरेंनी गेल्या तीन वर्षांत किती वेळा महाराष्ट्रभर हिंडून संघटनेच्या बांधणीकडे लक्ष दिले, किती वेळा जनतेचे प्रश्न समजून घेतले या प्रश्नांचे उत्तर देण्याची हिंमत त्यांच्याकडे नाही. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवसही स्वस्थ न बसता महाराष्ट्रभर हिंडून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आपल्या कार्यकर्त्याला सातत्याने संघटनात्मक कार्यक्रम देत असते. जनतेपर्यंत थेट पोहचण्यासाठी भाजप संघटना सातत्याने विविध उपक्रम राबवीत असते.

आता राजकारणातील ‘फिरता रंगमंच’ अशी ख्याती मिळवलेल्या राज ठाकरेंबद्दल थोडेसे… २०१४ च्या निवडणुकीनंतर रुळावरून घसरलेले इंजिन अजूनही पुन्हा रुळावर येऊ शकलेले नाही. २०१३ मध्ये टोल नाके बंद करण्याच्या मागणीसाठी केलेले आंदोलन अचानक मागे घेतल्यानंतर राजसाहेबांची जनमानसातील पत संपली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास २०१९ मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी सभा घेण्यापर्यंत येऊन पोहोचला. २०२२ मध्ये मशिदींवरील बेकायदा भोंग्यांच्या विरोधात भगवी शाल पांघरून मैदानात उतरून राजसाहेब राजकारणातला उड्डाण पूल मार्गही हिंडून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच पुन्हा देशात सत्तेवर यावे, असे डायव्हर्जन घेतलेल्या राजसाहेबांनी आता उबाठा आणि महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा बाह्यवळण मार्ग निवडला आहे. आपण किती भूमिका बदलल्या हे राजसाहेबांनाही आता आठवत नसेल. जनता आपल्याला स्वीकारणार नाही याची मनोमन कल्पना आल्याने मतदार याद्यांतील चुकांचा मुद्दा या सर्कशीच्या म्होरक्यांनी हाती घेतला आहे. जनता या सर्कशीला थारा देणार नाही, हे मात्र नक्की.