मे महिन्यात पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईमध्ये पाकिस्तानची सीमा न भेदता त्या देशाला धडा शिकवण्यात आला. यात तिन्ही सैन्यदले आणि संबंधित शाखांचा समावेश असला, तरी प्रथमच लष्करापेक्षा हवाई दलाची भूमिका निर्णायक ठरली. लढाऊ विमानांच्या तुटवड्यामुळे या दलासमोर सर्वाधिक खडतर आव्हान उभे असताना, अशा प्रकारची कारवाई हवाई दलाचे मनोधैर्य वाढवणारी ठरली. या दलाचे विद्यामान प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. लढाऊ विमानांच्या घटणाऱ्या तुकड्या किंवा स्क्वाड्रन्सविषयी त्यांनी अनेक व्यासपीठांवरून प्रसंगी संरक्षणमंत्र्यांसमक्ष चिंता व्यक्त केली. तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीस होत असलेल्या विलंबाचाही त्यांनी समाचार घेतला. पण अलीकडे विशेषत: ‘सिंदूर’पश्चात त्यांनी एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. त्यावरून ते आणि इतर सैन्यदल उच्चपदस्थांमध्ये असलेले मतभेदही उलगडू लागले आहेत. मतभेद असायला हरकत नाही, असे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटले असले, तरी युद्धसज्जतेची स्थिती यापुढे वारंवार येत असताना अशी परिस्थिती फार काळ टिकणे हितकारक नाही.
मतभेदांच्या केंद्रस्थानी आहे सैन्यदलांचे प्रस्तावित एकात्मीकरण. पारंपरिक विभागवार संरचना कालबाह्य ठरू लागली आहे. शिवाय अशा योजनेमध्ये समन्वय आणि सहकार्य फारसे दिसून येत नाही. भविष्यात कधी तरी पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकाच वेळी लढण्याची वेळ आली, तर विभागवार रचनेतून ईप्सित उद्दिष्ट साधता येणार नाही. यास्तव तिन्ही सैन्यदलांमध्ये टापूकेंद्री एकात्मीकरण (थिएटरायझेशन) अत्यावश्यक आहे, या जाणिवेतून त्या दिशेने विचारविनिमय सुरू आहे. भारतीय संरक्षण दलांचे संयुक्त प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असे स्वतंत्र पदच ही योजना प्राधान्याने अमलात आणण्यासाठी निर्माण केले गेले. डझनभर विभागांऐवजी तिन्ही दलांचा समावेश असलेले मोजकेच संयुक्त टापू (थिएटर) निर्धारित करून त्यांचे आधिपत्य लष्कर, हवाई दल आणि नौदलाकडे सोपवणे अपेक्षित आहे. या रचनेस सर्वप्रथम विरोध हवाई दलाकडून झाला. कारण ‘थिएटरायझेशन’मध्ये लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्सची विभागणी होणार आहे. इतर दोन दलांपेक्षा हवाई दलच या अत्यंत महत्त्वाच्या सामग्रीबाबत अनेक वर्षे ‘उणे’ स्थितीत आहे. दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी ४२ तुकड्यांची गरज असताना आपल्याकडे तीसेक तुकड्याच हाताशी होत्या. त्यातही आता मिग – २१ विमानांच्या दोन तुकड्या निवृत्त होत असल्यामुळे मोठा खड्डा पडणार आहे. थिएटरायझेशनविषयी नेमके काही ठरत नाही आणि त्यासाठी आहेत त्या लढाऊ विमानांना वेगवेगळ्या ठिकाणी विखुरणे हवाई दलास मान्य नाही.
ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने एअर चीफ मार्शल सिंग यांनी हा मुद्दा उचलून धरला. पण नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी थिएटरायझेशनला पाठिंबा दर्शवला. दिल्लीतील एका परिसंवादामध्ये हवाई दलप्रमुख आणि नौदलप्रमुखांतील मतभेद समोर आले. त्यात काही गैर नाही असे सीडीएस जनरल चौहान यांना वाटते. ते ठीकच. पण या मुद्द्यावर तडजोड किंवा तोडगा तातडीने शोधावा लागेल, हे तर स्पष्टच आहे.
लष्करी तंत्रज्ञान आणि सामरिक व्यूहरचनेचा पोतच गेल्या तीन शतकांमध्ये बदलून गेला आहे. सुस्थिर, समृद्ध युरोपमध्ये युद्धभडका उडाला. पश्चिम आशियाही अजून धुमसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नवीन सहस्राकात प्रथमच तीव्र स्वरूपाची लष्करी चकमक उडाली. तैवानच्या वेशीवर चीनच्या आक्रमक हालचाली अजूनही सुरू आहेत, किंबहुना त्यांत वाढच होत आहे. त्यामुळे जग कधी नव्हे इतके असुरक्षित बनलेले आहे. अशा वेळी स्वसंरक्षणासाठी एकल दल म्हणून काम करण्याऐवजी संयुक्तपणे शत्रूचा सामना करणे केव्हाही हितकारक. पण ‘स्वतंत्र’ राहूनही ‘संयुक्त’पणे काम करता येते, हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिल्याचे एअर चीफ मार्शल सिंग यांना वाटते. सरकारने एक तर त्यांचे म्हणणे स्वीकारावे किंवा त्यांना वेळीच आवर तरी घालावा. जनरल असिम मुनीर यांच्या लष्करी आधिपत्याखालील पाकिस्तान पूर्वीपेक्षा अधिक कुरापतखोर बनला आहे नि चीन पूर्वीइतकाच बेभरवशाचा! त्यांच्या महत्त्वाकांक्षांना आपल्या सैन्यदल प्रमुखांतील मतभेदांनी खतपाणी मिळणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपलीच.