या वर्षाच्या प्रारंभी प्रा. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. बरोबर ७१ वर्षांपूर्वी १ ऑक्टोबर १९५४ रोजी संपन्न ३७वे असे साहित्य संमेलन दिल्लीत भरले होते. त्याचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. सुमारे ५० पृष्ठांचे त्यांचे अध्यक्षीय भाषण मराठी साहित्य आणि संस्कृतीचा परामर्ष घेणारे होते. त्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू होते. त्यांनी भाषणात भारतीय साहित्यिकांची जबाबदारी लक्षात आणून देत ५० वर्षांपूर्वीची फ्रेंच वृत्तपत्रे आपली पहिली दोन पाने वाङ्मयास समर्पित करीत, अशी आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते की, आज समाजजीवनात साहित्याचा साकल्य प्रदेश आक्रसत निघालाय. त्याचे कारण आहे वृत्तपत्रांतील वाङ्मयाची आखुडती जागा नि महत्त्व.

अध्यक्षीय भाषणात तर्कतीर्थ म्हणाले होते की, ‘‘भारतीयांनी भविष्यलक्ष्यी राहून भूतकाळाकडे पाठ फिरवली पाहिजे. भारतीय संस्कृती विश्वव्यापी आविष्करण होय. मानवी प्रेरणा एकात्म संस्कृती निर्माण करते. संस्कृती-संस्कृतीत असलेला संघर्ष नष्ट करून माणसाने संवादी संस्कृती निर्मितीचा प्रयत्न करायला हवा. भारतातील लोकशाही ही एक संस्कृतीच आहे. ती टिकण्यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे. सामर्थ्यशाली एकराष्ट्रीयत्व निर्माण करण्यास मराठीसारख्या प्रादेशिक मातृभाषी साहित्यांची महत्त्वाची भूमिका असते.

साहित्य मानवी संस्कृतीचाच आविष्कार असतो. संस्कृती, साहित्य आणि कला यांच्या मुळाशी असलेली सर्जनशक्ती एकच असते. संस्कृतीच्या व्यापक पार्श्वभूमीवर कला, साहित्याचे सर्जन होत असते. संस्कृती आणि राष्ट्र यांचा परस्परपूरक संबंध असतो. ग्रीक संस्कृतीचा अभ्यास करताना ही गोष्ट स्पष्ट होते. भारतीय साहित्यशास्त्रकारांनी विद्या (ज्ञान) आणि कलेचे सन्निकर्ष दाखवून दिले आहे.

मराठी साहित्याची अशी परंपरा, इतिहास दीर्घकाळाचा आहे. त्यात ‘ज्ञानेश्वरी’चे स्थान असाधारण आहे. पाश्चात्त्य संस्कृती विकासात तेथील साहित्याने मोलाची भूमिका बजावली आहे. डांटे, गटे या साहित्यकारांबरोबर न्यूटनसारख्या वैज्ञानिकांनी तेथील (पाश्चात्त्य) संस्कृतिविकासात मोलाची कामगिरी बजावली आहे. तशीच कामगिरी भारतीय संस्कृतीत मराठी साहित्याने बजावली. महाराष्ट्र संस्कृती विकासात येथील संत, तंत, पंत कवींचे जितके योगदान आहे, तितकेच मराठी गद्याकारांचेही आहे. ‘भगवद्गीता’ चिंतनाचा नुसता विचार केला, तरी ज्ञानेश्वरांपासून सुरू होऊन ती टिळकांपर्यंत (गीतारहस्य) येऊन ठेपते. प्राचीन आणि आधुनिक साहित्यात अनुबंधांचे असे अनेक दुवे आढळतात. त्यातून सारस्वत आणि संस्कृतीचा परस्परपूरक अन्वय दिसून येतो.’’

भारतीय राष्ट्रीयत्वाचा जन्म सांस्कृतिक पूर्वपरंपरेच्या अधिष्ठानावर झालेला आहे. मराठीचा वाङ्मयीन इतिहास म्हणजे मराठी संस्कृतिविकास असला, तरी तो भारतीय साहित्य आणि संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात झाला आहे. तर्कतीर्थांनी या भाषणात मराठी साहित्यविकासाचा सोदाहरण धांडोळा घेतला आहे. मराठी साहित्य भारतीय साहित्याचे अंग आहे. साहित्य अकादमी साहित्य आणि संस्कृती समन्वयातून हिंदीद्वारे भारतीय राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे मोठे कार्य करीत आली आहे. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आकांक्षा एकच असल्याने त्यांचे साहित्यही एकच आहे.

तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘वाङ्मयाच्या संवर्धनाने भाषा प्रगल्भ होते,’ असे नवे प्रमेय मांडले होते. स्वानुभव व स्वआकलनाद्वारे विचारविवेचन हे तर्कतीर्थीय वक्तृत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. पारंपरिक विचारांना शह देत, त्यांच्यावर मात करत, नवविचारांची मांडणी त्यांच्या व्याख्यानांतून नित्य अनुभवास येत असे. हे भाषणही त्याची प्रचीती देते. तर्कतीर्थीय विवेचनात प्राचीन-आधुनिक, पौर्वात्य-पाश्चात्त्य असे वैचारिक दृष्टांतांचे हिंदोळे आले नाहीत तरच आश्चर्य! विसाव्या शतकातील अधिकांश अशी अध्यक्षीय भाषणे म्हणजे मराठी गतसाहित्याचा संक्षिप्त आढावा, अशी धाटणी दिसून येते. हे भाषण याच पठडीतले आहे. सारस्वत आणि संस्कृतीचा विचार हा मूलत: राष्ट्रनिर्मितीचा व घडणीचा विचार आहे. प्रांतिकतेकडून राष्ट्रीयतेकडे तो गेला, तरच राष्ट्राची घडण व उभारणी एकात्म होणार, याचे भान देणारे हे भाषण म्हणूनही राष्ट्रीय महत्त्वाचे ठरते.

– डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com