विश्वकोश वा ज्ञानकोशामधील नोंदी लिहिण्याचे विश्वमान्य शास्त्र व शैली विकसित झालेली आहे. तीवर प्रकाश टाकत फिल डेव्हिस यांनी ‘रायटिंग अॅन एन्सायक्लोपीडिया एन्ट्री’ नावाचा लेख लिहून स्पष्ट केले आहे की, ‘‘नोंद ही औपचारिक असायला हवी. ती अधिकृत असली पाहिजे. अशा नोंदीत स्वमत असता कामा नये. नोंद संक्षिप्त, विशिष्ट, घोषणाबाजीमुक्त (जॉर्गन फ्री), किमान शब्दांत असावी. तांत्रिक नोंदी संकल्पना स्पष्ट करणाऱ्या हव्यात. या संज्ञा, परिभाषा (व्याख्या)युक्त हव्यात.’’ मराठी विश्वकोश नोंदीत हे पथ्य पाळलेले आढळते. असे असले तरी मराठी विश्वकोशाचे खंड जसजसे प्रकाशित होत राहिले, तसतसे पृच्छा, प्रश्न, शंका विचारणारा मोठा पत्रव्यवहार जिज्ञासू वाचकांनी मराठी विश्वकोश कार्यालयाशी वेळोवेळी केलेला दिसतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मात्र पदभान राखत अत्यंत संयम नि सभ्यतेने उत्तरे देण्याचा रिवाज पाळत.
दैनिक ‘नवशक्ति’च्या १५ मे १९८३च्या अंकात डॉ. ज. वा. जोशी यांनी ‘तर्कतीर्थांची विश्रब्ध शारदा’ शीर्षक लेख लिहिला होता. डॉ. जोशी यांनी मराठी विश्वकोशासाठी तर्कशास्त्रावरील काही नोंदी लिहिल्या होत्या. त्या मराठी विश्वकोशांनी स्वीकारल्या नाहीत. या विषयावर अन्यांकडून लिहून घेऊन या नोंदी मराठी विश्वकोशात प्रकाशित केल्या. डॉ. जोशींचे म्हणणे होते की, प्रकाशित नोंदी आपल्या लेखनावर आधारित आहेत. यावर प्रकाश टाकत मराठी विश्वकोशातर्फे खुलासा करत जो मजकूर दैनिक ‘नवशक्ति’कडे पाठविला होता, तो मराठी विश्वकोशातील नोंद लेखन पद्धती व एकंदर कार्यपद्धतीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. संपादक म्हणून यातून तर्कतीर्थविचार, व्यवहार समजतो. यात स्पष्ट केले होते की, ‘‘मराठी विश्वकोशाचे तज्ज्ञ लेखकांकडून नोंदी लिहून घेण्याच्या संबंधातले धोरण असे : एका तज्ज्ञ लेखकाने लिहिलेला लेख किंवा नोंद दुसऱ्या तज्ज्ञाकडून समीक्षित करून घेतली जाते. या समीक्षक तज्ज्ञाने जर समीक्षीलेला लेख किंवा नोंद पुनर्लिखित करून घेण्याची सूचना केली, तर त्याचा अर्थ असा समजला जातो की, लेख किंवा नोंद असमाधानकारक आहे. त्यासाठी अनेक वेळा विश्वकोश कार्यालय निराळ्या तज्ज्ञांकडून त्याच विषयावरील लेख किंवा नोंद लिहून घेऊन आपली गरज भागविते. मूळ लेखकाला सूचना करून पुनर्लेखन नीट होईल अशी शक्यता वाटली, तर मूळ लेखकास सूचना करून पुनर्लेखन करून घेतले जाते. परंतु, मूळ लेखकाला त्याचे लेखन अमान्य झाले, तरी लेखनाचा मोबदला आवर्जून दिला जातो. ज्या त्या तज्ज्ञाचा लेख किंवा नोंद का वगळली वा रद्द केली, याचे कारण न सांगण्याची प्रथा कार्यालयाने ठेवली आहे. कारणे सांगत बसण्यात काम वाढते, कटुताही निर्माण होते आणि वेळेचाही अपव्यय होतो. तज्ज्ञ लेखकाचा मान राखणे हे कर्तव्य समजले जाते.’’
या सर्वांत तर्कतीर्थांनी परमतसहिष्णुता जपली आहे आणि दुसरीकडे मराठी विश्वकोश लेखन पद्धतीशी प्रतिबद्धता सांभाळली आहे. ज्ञानव्यवहार एका अर्थाने ‘विश्रब्ध शारदा’ अर्थात् ‘विश्वसनीय सारस्वत धर्मपालन वा साधना’ असली पाहिजे, यावर तर्कतीर्थांचा कटाक्ष असे. डॉ. जोशी यांच्या लेख शीर्षकातील वक्रोक्ती तर्कतीर्थांना समजली नसेल असे नाही; पण समाज व्यवहारात व्यष्टीपेक्षा समष्टीभाव वा समष्टीमत महत्त्वाचे असते.
असाच पत्रव्यवहार बंजारा, राजर्षी शाहू महाराज, आत्मचरित्र, अश्लीलता, किल्ले, अनेक व्यक्ती नोंदींसंबंधी दिसून येतो. ‘विश्वकोशातील विलक्षण विद्रूप’, ‘तर्कतीर्थांच्या गळ्यातील रत्नमाला’ शीर्षक लेखांना दिली गेलेली उत्तरे ही महाराष्ट्रीय ज्ञानव्यवहार स्पष्ट करणारी आहेत. अगदी अलीकडे ‘गांधी वध’ शब्द बदलून ‘गांधी हत्या’ शब्द वापरून मराठी विश्वकोशाने केलेली दुरुस्ती याच परंपरेचे वर्धिष्णू रूप होय. काही वेळा तर वाचक वृत्तपत्रांतून नोंदींबद्दल अनावृत पत्रे लिहीत. तर्कतीर्थ अशा अनावृत पत्रांना अनावृत उत्तरे लिहीत.
‘मराठी विश्वकोश’ निर्मिती मराठी भाषक विद्वान, चित्रकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, विश्वकोश कार्यालयीन विद्याव्यासंगी संपादक, समीक्षक, कर्मचारी यांच्या संयुक्त श्रमाची फलश्रुती होय. म्हणून तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मराठी विश्वकोशाच्या पहिल्या पाच खंडांचे प्रकाशन करताना, ‘‘भारतीय भाषांनी या उपक्रमाचे अनुकरण केले पाहिजे,’’ असे आवाहन केले होते.