लोकांचे सेवक म्हणून संसदेत येणारे काही प्रतिनिधी म्हणजे खासदार पूर्वाश्रमीचे राजे होते. आत्ताही काही राजे खासदार संसदेत पाहायला मिळतात. त्यांची चालढाल राजासारखीच असते. त्यांचं राजेपण जात नाही. संसदेत त्यांना कुणी कुर्निसात करत नाही इतकंच. काही जण नेत्यांना लवून नमस्कार करताना दिसतात. काहींच्या नावात ‘राजे’ आहे. पण, ते राजघराण्यातील आहेत की नाही माहीत नाही. पण, त्यांचं वागणं राजेपणाला शोभेसं असतं. असं म्हणतात की, एका मराठी खासदाराला आपण राजे असल्यासारखं वाटतं. इतरांनी आपल्याला राजेपणाची वागणूक द्यावी असंही त्यांना वाटत असावं. दिल्लीमध्ये खासदारांना सरकारी निवासस्थान दिलेलं असतं. या इमारती सात-आठ मजल्यांच्या आहेत. या सगळ्या इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध असते. ही इमारत कोणा एका खासदाराच्या मालकीची नसते. तिथं इतर खासदारही राहतात, त्यांचे स्वीय सचिव, अन्य कर्मचारी ये-जा करत असतात. ही मंडळी लिफ्टचा वापर करतात. ही लिफ्टदेखील कोणा एका व्यक्तीसाठी नसते. एकावेळी पाच-सात व्यक्ती लिफ्टचा वापर करतात. लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली ही सुविधा फक्त आपल्यासाठी आहे असा समज बहुधा या खासदाराने करून घेतला असावा. या खासदारांना वाटतं की, लिफ्टमध्ये फक्त तेच असावेत किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य… या खासदाराच्या कुटुंबातील एक सदस्य लिफ्टमधून जात असताना अन्य व्यक्तींनीही लिफ्टचा वापर केला. त्यावर माझ्या कुटुंबातील सदस्य लिफ्टमध्ये जात असताना इतर व्यक्ती लिफ्टचा वापर करतातच कसा, असा या खासदारांचा सवाल होता. त्यांना ही लिफ्ट त्यांच्या कुटुंबाची जागीर वाटत असावी. त्यांचा तीळपापड झाला, त्यांनी इमारतीतील कर्मचाऱ्यांना झापलं असं कळतंय. हा अरेरावीपणा येतो कुठून हे माहीत नाही. खासदारांचा संतप्त अवतार पाहून इमारतीतील कर्मचारी आधी शांत बसले, पण नंतर त्यांनी या खासदारांना स्पष्ट सांगितलं की, या इमारतीमध्ये तुम्हीच नव्हे तर इतर खासदारही राहतात. त्यांच्याकडं अनेक व्यक्तींचं येणं-जाणं असतं. खासदार आणि त्यांच्याकडं येणाऱ्या व्यक्तींना याच लिफ्टचा वापर करावा लागतो. खासदारांसाठी वेगळी लिफ्ट नाही. तुमच्या कुटुंबीयांनाही याच लिफ्टचा वापर करावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी कोणालाही रोखता येत नाही… हे ऐकल्यावर खासदारांमधील राजेपणाची मिजास निघून गेली असं म्हणतात.
उद्धव ठाकरे संसदेत…
दिल्ली दौऱ्यादरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार तसेच राहुल गांधी यांच्या घरी गेले. या भेटीमध्ये राजकीय संवाद झाला असणारच. त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. असे असले तरी, उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्त्वाची राजकीय भेट म्हणजे संसद. ते संसदेत फार वेळ नव्हते पण, ठाकरेंनी संसदेत येणे हाच मोठा संदेश होता. दिल्लीतील अनेक राजकीय चाणक्यांना या भेटीतील अर्थ कळला असेलच! शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच संसदेमध्ये आले होते. मुख्यमंत्री असताना ठाकरे दिल्लीत आले होते तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवार आणि अशोक चव्हाण होते. मुख्यमंत्रीपद गेल्यावरही ते आले होते तेव्हा त्यांनी राजकीय गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यावेळी ठाकरे संसदेत गेलेले नव्हते. यावेळी मात्र ते आवर्जून संसदेत गेले. दोन शिवसेना झाल्यानंतर संसदेच्या आवारात दोन्ही गटांना दोन वेगवेगळी कार्यालयं देण्यात आली. ही कार्यालयं एकमेकांच्या शेजारीच आहेत. हे दोन्ही गट शेजारधर्म किती पाळतात माहीत नाही. पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे थेट संसदेत गेले. जुन्या संसद भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या गटाला दिलेल्या कार्यालयात ते अर्धा-पाऊण तास होते. तिथं त्यांनी खासदारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत फोटोसेशन झालं. संसदेच्या कार्यालयातून ते खासदार अरविंद सावंत यांच्या घरी जाणार होते. संसदेत आले आहेत, तर ते काही राजकीय नेत्यांना भेटणार का, हा प्रश्न होता. अगदी आदल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही संसदेमध्ये आले होते. त्यांनी नव्या संसद भवनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळं ठाकरे काय करणार, असं विचारलं जात होतं. कार्यालयातील उपस्थितांच्या चेहऱ्यावर कदाचित हा प्रश्न ठाकरेंना समजला असावा. ठाकरेंनी या उपस्थितांची फिरकी घेतली. ‘चला, मी निघतो, मी मोदींनाच जाऊन भेटतो’, अशी गुगली त्यांनी टाकली आणि ते निघाले. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राज्यसभेतील खासदार संजय राऊत होते. कार्यालयात येताना सगळे उजव्या बाजूने होते. परत जाताना देखील उजव्याच बाजूने जाणं अपेक्षित होतं. तसे ते निघालेही होते. पण, संजय राऊत अचानक थांबले, त्यांनी दिशा बदलली. ते ठाकरेंना म्हणाले की, आपण डाव्या बाजूने जाऊ… डाव्या बाजूला शिंदे गटाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोरून ठाकरे आणि त्यांचे खासदार निघून गेले. संसदेच्या मुख्य द्वारासमोर पत्रकारांची गर्दी जमलेली होती. उद्धव ठाकरेंना बघताच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सगळेच धावले. ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यामुळं त्यांनी संसदेमध्ये पत्रकारांशी पुन्हा संवाद साधण्याचं कारण नव्हतं. ते लगेचच संसदेतून निघून गेले. म्हटलं तर उद्धव ठाकरेंच्या संसदेतील भेटीत फारसं काही घडलं नाही. ते आले, ते कार्यालयात गेले आणि निघून गेले. पण, ज्यांची या संसदेत सत्ता आहे, त्यांची कोणतीही दखल न घेता ते निघून गेले हेही दिसलं.
लोकांचा हिरमोड
अलीकडं संसदेमध्ये सामान्य लोकांना प्रवेश मिळणं अत्यंत अवघड झालेलं आहे. पूर्वी खासदाराचं पत्र आणि ओळखपत्र या दोन गोष्टी पुरेशा होत्या. आता ही पत्रं हवीतच पण, प्रवेशासाठी परवानगी चार-पाच दिवस आधी काढावी लागते. दोन्ही पत्रं दिल्यानंतर तुमच्याबद्दल पूर्ण चौकशी केली जाते. तुमच्याबद्दल तुम्ही राहात असलेल्या भागातील पोलीस ठाण्यात विचारणा केली जाते. या पोलीस ठाण्यातून ना हरकत प्रमाणपत्र आल्यानंतरच तुम्हाला संसदेत प्रवेश दिला जातो. पोलीस ठाण्यातून वेळेवर हिरवा कंदील मिळाला नाही, तर तुमचं नाव त्या दिवसाच्या प्रवेश यादीतून वगळलं जातं. केंद्र सरकार कदाचित तुम्ही शहरी नक्षल आहेत का, गुन्हेगार आहात का, कुठल्या डाव्या आंदोलनात होतात का, चळवळी केल्या होत्या का, त्याअंतर्गत तुमच्यावर फौजदारी गुन्हे, राजकीय गुन्हे नोंदवले आहेत का, हे तपासत असावं. संसद पाहायची असेल तर आंदोलन, चळवळ करू नका, डावा विचार मनात आणू नका असं केंद्र सरकारला लोकांना सांगायचं असावं. संसदेतील प्रवेशाची प्रक्रिया अवघड झाली असली तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. दररोज वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक संसदेला भेट देत असतात.
दोन आठवड्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे २०० जणांचा जत्था संसदेत आला होता. चार दिवसांपूर्वी पुणे शहरातील भाजपचे बरेच कार्यकर्ते आले होते. त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घ्यायची होती. शहांची भेट झाली नाही, पण, त्यांना जे. पी. नड्डा भेटले. मकरद्वाराच्या लॉबीत या कार्यकर्त्यांनी नड्डा यांना गणपतीची मूर्ती भेट दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लोकांचा राबता असला तरी, सभागृहात कामकाज होत नाही. सगळी सुरक्षाव्यवस्था पार करून लोक प्रेक्षक कक्षापर्यंत कसेबसे पोहोचतात पण, तोपर्यंत सभागृहे तहकूब होतात. त्यामुळं कामकाज कसं चालतं हे पाहण्याची उत्सुकता असलेल्या लोकांचा हिरमोड होतो. कामकाज न बघताच आल्या पावली त्यांना परत जावं लागत आहे.
महाराष्ट्रात येणार ना?
भाजपचे लोकसभेतील खासदार निशिकांत दुबे यांच्यामागं मराठीचा मुद्दा हात धुऊन लागला आहे. भाषेच्या वादावरून दुबे सतत चर्चेत राहतात. संसदेमध्ये मराठी खासदारांनी दुबेंविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर दुबेंना कोणी ना कोणी मराठीच्या मुद्द्यावरून टोमणा मारतंच. लोकसभेच्या बाहेरील लॉबीमध्ये केंद्रीय मंत्री पत्रकारांशी गप्पा मारत होते. हे मंत्री मोदींचे विश्वासू. ते मूळचे महाराष्ट्रातील. मराठीच. पण, गुजरातमधून निवडून येतात. मराठी पत्रकार नेहमीच त्यांच्याशी मराठीत संवाद साधतात. तेही त्यांच्याशी मराठीत बोलतात. सभागृहाचं कामकाज तहकूब झालं असल्यानं हे केंद्रीय मंत्री लॉबीत आले, ते गप्पा मारत असताना समोरून दुबे आले. दुबेंनी या मंत्र्यांना नमस्कार केला, त्यांच्याशी हस्तांदोलन करत या मंत्र्यांनी त्यांना गमतीनं विचारलं, ‘दुबेजी महाराष्ट्रात येणार ना?…’ त्यावर ‘हो येणार… तुमच्याबरोबरच येणार… ’असं म्हणत दुबे निघून गेले. दुसऱ्या दिवशी दुबे ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेसाठी बोलायला उभे राहिले. त्यांना द्रमुकच्या खासदारांनी अडवलं. ‘तुम्ही हिंदीत कशाला बोलता, इंग्रजीत बोला…’ हे ऐकल्यावर मात्र दुबेंचा तोल गेला. ते प्रचंड संतापले. हिंदीदेखील या देशातील एक भाषा आहे, मी हिंदीतून बोलणार… भाषेवरून मला सारखं टोकलं जातंय. परवा मराठीवरून टोकलं गेलं… असं म्हणत दुबेंनी भाषणाला सुरुवात केली.