परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील मुंबर हे दीड-एक हजार लोकसंख्येचे गाव. गावात मारुती, ज्योतिबा, काळोबा ही मंदिरे आहेत. या श्रद्धास्थानांबरोबरच हाजीसाहेब पीरसुद्धा गावात आहे. गावकरी सारख्याच श्रद्धेने या सर्व ठिकाणी जातात. गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी या गावात ‘मोहरम’चा सण साजरा होतो. मोहरमच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सगळा गाव त्यात सहभागी होतो. हाजीसाहेब पीर या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी गव्हाची खीर केली जाते. मोहरमनिमित्त सवारी, डोले पार पडतात. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सवाऱ्यांची पूजा केली जाते. श्रद्धाळू या ठिकाणी ऊद घालतात, पेढे-साखर वाटतात. हाजीसाहेब पीर या ठिकाणी असलेले निवृत्ती महाराज शिंदे हे रमजानच्या महिन्यात ‘रोजा’चे उपवास करतात. संपूर्ण महिनाभर ते अनवाणी वावरतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता आहे. केवळ मुंबर या गावातच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्येही हाजीसाहेब पिराविषयी लोकांच्या मनात आस्था आहे. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा या गावाने जपलीय. अशी कितीतरी गावं आहेत जिथे दर्गा किंवा पीर असलेल्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांच्या श्रद्धा एकवटल्या आहेत. अशा ठिकाणी दरवर्षी यात्रा भरतात. चादर चढवली जाते. हजारोंच्या संख्येने लोक येतात. भोळी- भाबडी माणसं नवस बोलतात, जगण्यासाठीचं बळ गोळा करतात.

अर्थात सगळीकडेच हे जगणं सदासर्वकाळ गुण्यागोविंदाने राहण्याएवढं भाबडंही असत नाही. त्यातही तणाव निर्माण होतात. गावाची वीण कधी कधी उसवली जाते. संबंधांना, नात्यांना तडे जातात. संघर्षही धुमसतो. कधीकधी कित्येक दिवस गावे या संघर्षात होरपळत असतात. त्यातल्या त्यात आता समाजमाध्यमे हाताशी आली. कुठल्या घटनेचे कुठेही पडसाद उमटू शकतात एवढं काळानं सगळ्यांनाच जवळ आणलं. काही दिवस धुमसणारी गावे हळूहळू पूर्वपदावर येऊ लागतात. काळ जखमा भरून काढतो आणि माणसे पुन्हा पूर्वीसारखी जगू लागतात, वागू लागतात. हमीद दलवाई यांच्या ‘इंधन’ कादंबरीत एका गावातला जातीय, धार्मिक संघर्ष विलक्षण कलात्म पद्धतीने आणि संयमाने आलेला आहे.

भारतीय साहित्याच्या उजेडात समकालीनता आणि समाज याचा धांडोळा घ्यायचा झाला तर आधी भारतीय साहित्य कशाला म्हणता येईल तेही स्पष्ट झालं पाहिजे. या ठिकाणी निर्देश करायचा आहे तो आणखी एका वेगळ्या कादंबरीचा. उत्तर प्रदेशातल्या गाजीपूर जिल्ह्यातील गंगौली या गावाचं चित्रण राही मासूम रझा यांच्या ‘आधा गाँव’ या कादंबरीत आहे. कादंबरीची सुरुवातच गावात होणाऱ्या मोहरमपासून होते. ज्या गावात हिंदूंसह मुस्लीमही मोठ्या प्रमाणात आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीवेळी तिथल्या मुस्लिमांची मन:स्थिती, गावातल्या हिंदू-मुस्लीम संबंधांचे ताणेबाणे आणि एकजिनसीपणसुद्धा या कादंबरीतल्या अनेक प्रसंगांमधून दृढ होते. कादंबरी शेवटाकडे येते तेव्हा राही मासूम रझा यांनी दोन पानांची ‘भूमिका’ जोडली आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केलंय, ‘‘जनसंघाचं म्हणणं असं आहे की मुसलमान इथले नाहीत. माझी काय हिंमत आहे की मी त्यांना खोटं ठरवू… पण गंगौली या गावाशी माझा अतूट संबंध आहे. ते केवळ एक गाव नाही तर माझं घर आहे. ‘घर’ हा शब्द दुनियेतल्या प्रत्येक बोलीत, प्रत्येक भाषेत आहे. आणि प्रत्येक बोली व भाषेतला तो सर्वात सुंदर शब्द आहे.’’ या भूमिकेत पुढं ते आणखी स्पष्टपणे लिहितात. ‘‘…क्योंकी वह केवल एक गाँव नही है, क्योंकी वह मेरा घर भी है … ‘क्योंकी’ यह शब्द कितना मजबूत है। और इस तरह के हजारो हजार ‘क्योंकी’ और है। और कोई तलवार इतनी तेज नही हो सकती कि इस क्योंकी को काट द।’’ स्वत:च्या गावाशी, घराशी असलेल्या अतूट नात्याची ही गोष्ट आहे. हे तेच राही आहेत ज्यांनी दूरचित्रवाणीवर एकेकाळी प्रचंड लोकप्रिय झालेल्या महाभारत या मालिकेची पटकथा व संवाद लिहिले आहेत… त्यामुळे एखादं मराठवाड्यातलं गोदाकाठावरचं गाव असो की उत्तर प्रदेशातलं गंगौली असो. गंगा जमनी तहजीबची अशी अनेक उदाहरणे आढळतात. या स्वच्छ, प्रवाही पाण्यात जसजसे राजकारणाचे रंग मिसळत चालले तसतसा प्रवाह गढूळ होत चालला. कधीकाळी बेरजेचे राजकारण अशीही एक संकल्पना होती, आता ती भागाकारावर येऊन ठेपली आहे.

विभिन्न सांस्कृतिक धाग्यांनीच भारतीयतेचं वस्त्र विणलं जाणं अपेक्षित आहे. ही विविधता संगीत, शास्त्र, कलांची आहे. अनेक भाषांची, वेशभूषेची, चालीरीती- रिवाजांची आहे. धर्मांची, विचारांची, परंपरांची आहे. परंपरासुद्धा एक नसते, अनेक असतात. त्यामुळे भारतीय साहित्य असं आपण म्हणतो तेव्हा ते अनेक भाषांमधून आलेले, भिन्न धर्मीयांचे सहजीवन मान्य करणारं असंच असतं. म्हणूनच ते एकसुरी होत नाही. व्यापक असं जीवनदर्शन त्यातून घडतं. साहित्य सगळ्या सीमारेषा पुसट करून टाकतं. अगदी संवेदनेच्या पातळीवरसुद्धा! कुठल्यातरी दूरच्या मुलखातली गोष्ट वाचकाला आपली वाटायला लागते. त्या माणसांच्या सुखदु:खाशी आपलं नातं आहे असं वाटायला लागतं. भाषेची बंधनंही गळून पडतात. आशयाचं, अनुभवाचं वैविध्य हे भारतीय साहित्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानता येईल. याच प्रकारच्या साहित्यातून भारतीयता झिरपते.

कट्टरता फोफावणं, परस्परांबद्दल अविश्वास निर्माण होणं, सहिष्णुता- औदार्य मरणपंथाला लागणं अशा गोष्टी घडायला लागल्या की भवताल विखारी होतो. भय वाटू लागतं. कोणत्याही प्रकारची कट्टरता वाईटच. ती माणसा- माणसात भेद निर्माण करते. धर्मावरून, भाषेवरून, खाण्या-पिण्यावरून कुणाला तरी हीन लेखणं, ललकारणं, अस्तित्व नाकारणं, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा अवकाश संकुचित करणं आणि मुस्कटदाबी करणं या गोष्टी अंतिमत: माणूसपणालाच नख लावणाऱ्या असतात. आम्ही सांगू तसंच घडलं पाहिजे किंवा इथे राहायचे असेल तर हे असे काही चालणार नाही. या प्रकारचे आग्रह टोकदार होतात, विवेक हरवतो तेव्हा उन्माद जागोजागी फणा वर काढायला लागतो. रस्त्यावर झुंडी दिसू लागतात. धर्म ही धारण करण्याची गोष्ट. जसं सावली देणं हा झाडाचा धर्म, वाहणं हा नदीचा… मात्र या धर्मावरच तवंग दिसू लागतो तेव्हा त्याची उग्र रूपे जागोजागी दिसू लागतात.

मेरी आस्था कांप उठती है…

मैं उसे वापस लेता हूँ

नहीं चाहिए तुम्हारा यह आश्वासन

जो केवल हिंसा से अपने को

सिद्ध कर सकता है।

नहीं चाहिए वह विश्वास,

जिसकी चरम परिणति हत्या हो।

मैं अपनी अनास्था में अधिक सहिष्णु हूँ

अपनी नास्तिकता में अधिक धार्मिक।

अपने अकेलेपन में अधिक मुक्त।

अपनी उदासी में अधिक उदार।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदीतले प्रसिद्ध कवी कुंवर नारायण यांच्या ‘आत्मजयी’ कवितेतल्या या ओळी. कविता १९६५ च्या काळातली. ‘विभागले गेलो तर कापले जाऊ’ आणि ‘एक राहिलो तर सुरक्षित राहु’ अशा अर्थाचे हाकारे उठण्याच्या कितीतरी आधीच्या काळात लिहिली गेलेली. जे मौलिक असतं ते सर्वकालिक असतं हे ठासून सिद्ध करणारी…