सरकारने प्रतिसाद दिला नाही म्हणून थांबण्याचे काही कारण नाही. आज भाद्रपद शुद्ध द्वितीया. आपण वराहजयंती साजरी करायचीच. तीही धूमधडाक्यात. असा निर्धार करून नितेश राणे सकाळी लवकर उठले. साहेबांना काय हवे हे बरोबर ओळखणाऱ्या सहाय्यकाने कणकवलीत जाऊन काही वराहपालकांना बंगल्यावर बोलावले होतेच. मिळालेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी त्यांची डुकरे अगदी स्वच्छ धुवून व चांगली सजवून आणली होती. शास्त्रीबुवांनी सांगितलेल्या मुहूर्तावर राणे बाहेर आले व मोठ्या थाटात त्यांनी वराहपूजन केले. हजर असलेल्या कार्यकर्त्यांनी वराहांचा जयजयकार करताच संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्यांच्यासोबत आलेल्या पालकांना रोख बक्षीस देऊन राणे बंगल्यात जायला वळताच अचानक आजूबाजूच्या झाडीतून शेकडो डुकरे त्यांच्या सभोवताली येऊन उभी ठाकली. सुरुवातीला त्यांना वाटले यांनासुद्धा जयंतीचा आनंद झाला असेल पण त्यांचे आक्रोशयुक्त ओरडणे ऐकून ते थबकले.
‘ही इतक्या मोठ्या संख्येत इथे कशी काय आलीत? यांना आणले कुणी?’ असे दरडावून विचारताच त्यांना पाळणाऱ्या वृद्धांचा एक समूह समोर आला. ‘हं, काय, बोला पटकन’ असे राणेंनी विचारताच त्यातला एक भीतभीत म्हणाला. ‘आमचे म्हणणे काहीच नाही. जे काही म्हणायचे ते या डुकरांनाच. तुम्ही जयंतीची घोषणा केल्यापासून यांनी तुम्हाला भेटण्याचा लकडा लावलाय.’ हे ऐकून त्रासलेले राणे म्हणाले ‘काय म्हणणे आहे यांचे.’ हा सूचक इशारा मिळताच डुकरांनी ओरडणे सुरू केले. त्यांना शांत करत एक वृद्ध म्हणाला. ‘तुम्ही जयंती साजरी करताय हे चांगलेच. मात्र यांच्याही काही मागण्या आहेत.
पहिली म्हणजे डबक्यात लोळणे ही यांची सवय आहे. तेव्हा ठिकठिकाणी यांच्यासाठी स्वच्छ पाण्याचे डबके तयार करून द्यावे. रस्त्यावरचे मोठे खड्डे बुजवू नयेत, जेणेकरून त्यात यांना आराम करता येईल. युरोपमध्ये ज्या पद्धतीने वराहपालनास प्रोत्साहन दिले जाते, तसे राज्य सरकारने सुद्धा द्यावे. वराहसंवर्धन व संगोपन योजना तातडीने सुरू करावी. डुकरांचे फार्म ठिकठिकाणी उभारण्यासाठी जागा द्यावी. ते कुणाच्या प्रार्थनास्थळाजवळ नसतील याची खबरदारी घ्यावी कारण तुमच्या धार्मिक वादात यांना अजिबात रस नाही. डुकरांना नेहमी खाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा उकिरड्यावर गुजारा करावा लागतो. त्यामुळे सरकारने प्रत्येक हॉटेलचालकांना वराहांसाठी जेवण बाहेर ठेवावे लागेल अशी सक्ती करावी. त्यासाठी पत्रावळी उपलब्ध करून द्याव्यात. डुकरांच्या शिकारीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून डुकरांना पकडण्यासाठी अमानवी पद्धतीचा वापर केला जातो. तारांचे फासे टाकून तोंड आवळले जाते. ही क्रूरता ताबडतोब थांबवण्यात यावी. डुक्कर हा शब्द शिवी म्हणून वापरता येणार नाही असा शासकीय आदेश तातडीने जारी करण्यात यावा. हिरण्याक्षाने पाताळात ढकललेल्या पृथ्वीला वर करण्यात डुकरांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे यांना भूतलावर सन्मानजनक वागणूक मिळेल याची सरकारने दक्षता घ्यावी. डुकरांचे केस कापण्यासाठी न्हाव्यांची नेमणूक करण्यात यावी.’
या मागण्या ऐकून राणे विचारात पडले. कुणाला तरी डिवचण्यासाठी हे जयंतीचे खूळ आपण काढले पण ते आपल्यावरच उलटते की काय या शंकेने ते अस्वस्थ झाले. त्याच अवस्थेत ते समुद्रकिनारी पायी फिरायला निघाले. फिरता फिरता अचानक त्यांना कासवांच्या कळपाने गराडा घातला. आता हे काय नवे म्हणून ते थबकले. त्यातील एक कासव म्हणाले, ‘वसुंधरेच्या रक्षणासाठी विष्णूने घेतलेला पहिला अवतार तर आम्ही म्हणजे कूर्म. सांगा आमची जयंती कधी साजरी करता ते’ हे ऐकून राणे हादरलेच!