दिल्लीवाला

मोदींचं नाव घेतल्याशिवाय भाजपच्या मंत्र्यांचा दिवस पूर्ण होत नाही. कोणतीही माहिती देण्याआधी आणि नंतर मंत्री मोदींचं नाव घेतात. कधी नुसतं नाव घेतात किंवा ‘मोदी है तो मुमकिन है’ अशी घोषणा देतात. मोदींचं मंत्र्यांच्या कामगिरीवर लक्ष असतं. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी सर्व मंत्र्यांना पुढील शंभर दिवसांचा आराखडा द्यायला सांगितला होता. मोदींची आपल्या मंत्र्यांवर इतकी तीक्ष्ण नजर असेल तर त्यांना मोदींचं नाव घ्यावंच लागेल. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर मोदींची विशेष मर्जी असावी. राज्यसभेचे सदस्य असलेल्या सगळ्या मंत्र्यांना मोदींनी पुन्हा राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. आता त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेतून वाचले ते फक्त वैष्णव! त्यांना ओदिशातून बिजू जनता दलाने राज्यसभेवर निवडून आणलं आहे. इतकी कृपादृष्टी असेल तर वैष्णवांना म्हणावंच लागेल, मोदी है तो मुमकिन है… सेमीकंडक्टरच्या चिप्सनिर्मितीचा मोठा कारखाना गुजरातमध्ये उभा राहतोय. गुजरात हळूहळू सेमीकंडक्टरचा हब बनू लागला, तेही मोदींमुळंच शक्य झाल्यामुळं श्रेय त्यांना द्यावंच लागेल. म्हणून वैष्णव म्हणाले, मोदी है तो… मोदींना भाजपच्या सत्तेचेच नव्हे तर आघाड्यांचेही शिल्पकार मानलं जाऊ लागलंय. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’च्या निर्मितीबद्दल सांगत होते. त्याबद्दल माहिती देण्याआधी ठाकूर यांना ‘अलायन्स’ शब्द आठवला. मग, आठवले मोदी. ठाकूर म्हणाले की, तुम्हाला माहीतच आहे की, मोदींना आघाड्यांचे शिल्पकार म्हणतात. खरंतर बिग कॅट अलायन्सचा आणि राजकीय पक्षांच्या आघाड्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही पण, मोदींचा उल्लेख करण्यासाठी ‘अलायन्स’ शब्द वापरून यमक जुळण्याचा ठाकूर प्रयत्न करत होते. यमक जुळलं नाही हा भाग वेगळा, पण मोदी शब्द तर आला. ठाकूर यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित झालेली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफुस पाहता ठाकूर यांना विजयासाठी फार कष्ट करण्याची गरज नाही. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही हिमाचल प्रदेशचे. त्यांना स्वतःच्या राज्यात भाजपला विजयी करता आलं नसलं तरी काँग्रेसचे आमदार फोडता येतीलच. पहिला प्रयत्न अपयशी ठरला असला तरी दुसरा प्रयत्न होणार नाही असं नाही.

supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
Prahar Janshakti Party akola party bearers send praposal to bachhcu kadu to Support Congress in Akola Lok Sabha
अकोल्यात प्रहारचा महायुतीला धक्का; काँग्रेसला पाठिंब्याचा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा ठराव
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

हेही वाचा >>> बुकबातमी: बनी, बनी.. वाडय़ावरची बनी..

चला, लवकर चला!

केंद्रीय निवडणूक आयोगाची लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये आयोगाने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचाही आढावा घेतलेला आहे. त्यामुळं आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दौरे आणि केंद्र सरकारच्या संभाव्य घोषणा यांचा विचार करून आयोग पत्रकार परिषद कधी घ्यायची याचा तारतम्यानं निर्णय करेल. आयोगाने निवडणूक घोषित करण्याआधी भाजपने उमेदवारांची पहिली यादी देखील तयार केलेली आहे. भाजप सशासारखं धावतो. काँग्रेसला बहुधा कोणतीही घाई नसावी. काँग्रेस कासवाप्रमाणं मंद गतीनं चाललाय. काँग्रेस पक्ष अजून राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय’ यात्रेमध्ये अडकून पडलेला दिसतोय. मूळ कार्यक्रमानुसार यात्रा २० मार्चनंतर मुंबईला पोहोचणार होती. या वेगानं यात्रा निघाली तर यात्रेची सांगता होण्याआधीच निवडणूक जाहीर होईल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर यात्रा काढण्यासाठी आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. यात्रेच्या खर्चाचा हिोब द्यावा लागेल. यात्रेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने ही यात्रा १० मार्चपर्यंत मुंबईत येईल असं दिसतंय. म्हणजेच आचारसंहितेआधीच यात्रा संपुष्टात येईल. कासवानं गती थोडी वाढवली असावी. आधी ठरल्याप्रमाणं यात्रा दररोज ४०-५० किमीचं अंतर पार करणार होती. आता दररोज सुमारे १०० किमीचं अंतर कापलं जातंय. राहुल गांधींची पहिली यात्रा पदयात्रा होती, तिथं दररोज २५-२६ किमी अंतर पार केलं जात होतं. सकाळी साडेसहा ते दहा आणि दुपारी साडेतीन ते सात अशा दोन टप्प्यांमध्ये पदयात्रा होत असे. नव्या यात्रेमध्ये बहुतांश अंतर गाडीतून पार केलं जातंय. त्यामुळं अखेरच्या टप्प्यामध्ये यात्रेचा वेगही वाढवण्यात आलेला आहे. जुन्या यात्रेप्रमाणं नव्या यात्रेतही विश्रांतीचे दिवस आहेत. गेल्या आठवड्यात मोठी सुट्टी घेण्यात आली होती. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांमध्ये राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये व्याख्यान देण्यासाठी सुट्टी घेतली होती. ही यात्रा मध्य प्रदेशात आलेली असून यानंतर ती राजस्थान, गुजरात आणि अखेर महाराष्ट्रात प्रवेश करेल. ही यात्रा संपल्यानंतरच काँग्रेस उमेदवारांच्या निवडीचा विचार करेल असं दिसतंय. तोपर्यंत भाजपने दीडशे-दोनशे उमेदवार घोषित करून प्रचारही सुरू केलेला असेल.

हेही वाचा >>> कलाकारण: व्हेनिस बिएनालेत भारत आणि भारतीय

बक्षीस कोणाचं कोणाला?

मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे (बसप) खासदार भाजपमध्ये जात आहेत, आमदार भाजपच्या उमेदवाराला मतदान करत आहेत. बसपमध्ये अचानक लोकशाही अवतरलीय. मायावती देखील भाजपविरोधात एक शब्द बोलायला तयार नाहीत. कधी काळी मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या आणि ‘बसप’ची सत्ता होती. आता ‘बसप’चा उत्तर प्रदेशच्या विधानसभेत फक्त एक आमदार आहे. हेच ‘बसप’चे आमदार उमाशंकर सिंह यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या संजय सेठ यांना मतदान करून बहुधा ‘बसप’ला कृतकृत्य केलं आहे. ‘बसप’च्या या मदतीचं बक्षीसही मायावतींना मिळालेलं आहे. ‘बसप’ची धुरा आता मायावतींचे पुतणे आकाश आनंद सांभाळणार आहेत. आनंद यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर घेण्यात आला. सेठ यांना मतदान करणाऱ्या उमाशंकर यांचे मोदींशी नातेसंबंधही सौहार्दपूर्ण असावेत. उमाशंकर यांनी मोदींना त्यांच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिलं होतं. मोदी लग्नाला उपस्थित राहू शकले नसले तरी, त्यांनी उमाशंकर यांच्या कुटुंबाला आवर्जून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उमाशंकर यांनी भाजपला मतदान केलं. लोकसभेत रितेश पांडे आणि दानिश अली हे ‘बसप’चे ओळखीचे चेहरे होते. रितेश पांडेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय रितेश पांडे यांनी वर्ष-दीड वर्षापूर्वीच घेतलेला होता. यावेळी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, ते जिंकूनही येतील. दानिश अलींना मायावतींनी पक्षातून काढून टाकलेलं आहे. आता ते काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवतील. ‘बसप’चे जौनपूरचे खासदार श्यामसिंह यादव आग्र्यात ‘भारत जोडो न्याय’ यात्रेत सहभागी झाले होते. मायावती त्यांना लोकसभेचं तिकीट देण्याची शक्यता नाही. २०१९ मधल्या मोदींच्या झंझावातातही ‘बसप’चे दहा खासदार निवडून आले होते. यावेळी ही संख्या त्यापेक्षाही कमी असेल असं दिसतंय.

सेल्फी विथ मोदी…

देशातील इतर शहरांचं माहीत नाही पण, दिल्लीत सेल्फीची हौस भागवायची असेल तर, ‘सेल्फी विथ मोदी’चा अनुभव घेता येऊ शकतो. कधी काळी पं. नेहरूंचं सरकारी निवासस्थान असलेल्या तीनमूर्ती भवनाचं पंतप्रधान संग्रहालयात रूपांतर झालंय. तिथं आजी-माजी पंतप्रधानांच्या छायाचित्रासोबत सेल्फी काढता येतो. नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांसोबत छायाचित्र काढता येत असल्यानं त्यांच्या काळात गेल्याचा आभास निर्माण होतो. मोदी आत्ताच्या काळातील असल्यामुळं मागं जाण्याची गरज नाही. शिवाय, त्यांच्यासोबत सेल्फीसाठी या संग्रहालयात गेलं पाहिजे असं नाही. मोदींसोबत सेल्फी दिल्लीत कुठंही काढता येईल. कुठल्याही मंत्रालयात जा, ही सेल्फीची सुविधा उपलब्ध आहे. संसदेच्या आवारात, रेल्वे भवन, कृषी भवन, शास्त्री भवन, नॅशनल मीडिया सेंटर, रफी मार्गावर तर अनुसंधान भवनाच्या दारातच सेल्फी काढता येईल. त्यासाठी इतर कुठल्या मंत्रालयाच्या आवारात देखील प्रवेश करण्याची गरज नाही. दिल्लीत आलेल्या पर्यटकांना कुठंच ही सुविधा दिसली नाही तर लालकिल्ल्यात मोदींबरोबर सेल्फी काढता येईल. मोदींची आणि पक्षाची लोकप्रियता वाढवण्याचा भाजपचा हा अनोखा उपक्रम आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अशाच वेगवेगळ्या क्लृप्त्या उपयुक्त ठरत असतात.