‘अरे, त्या नानासाहेब पेशव्यांकडे उत्तरेतून आलेल्या घाशीराम कोतवालशी माझी तुलना करता काय? काही जिभेला हाड तुमच्या? काहीही बोलाल काय? चला, घ्या सोडले राजकारण. तेही एका झटक्यात. आणि हो, व्यथित होऊन वगैरे नाही सोडले. अगदी ठरवून जाणीवपूर्वक घेतलाय मी हा निर्णय. आता वागा तुम्हाला जसे वागायचे असेल तसे.’ असे काहीसे बडबडत मोहितभाई दिवाणखान्यात येऊन बसले तेव्हा जलसंपदामधले काही कंत्राटदार त्यांची वाटच बघत होते. आज भाईंचा मूड काही चांगला नाही हे बघून त्यांनी आणलेल्या फाइली मांडीखाली दडवल्या. बसलेल्यांपैकी एकाचीही भाईंना काम सांगायची हिंमत झाली नाही.

मग बैठकीतले मौन तोडत पुन्हा भाई सुरू झाले. ‘मी पक्का ‘बेपारी’ माणूस. तो करताना नफा-तोटा तर होणारच. तोटा झाल्याने नाही भरू शकलो बँकेचे हप्ते. निघाली जप्ती. गुन्हाही दाखल झाला. तेव्हा केवढा गजहब केला या पार्टीवाल्यांनी. शेवटी द्यावा लागला सर्व पदांचा राजीनामा. पण नेहमी कृपादृष्टी ठेवून असलेल्या साहेबांनी साथ सोडली नाही. पाठीवर हात ठेवत धीर दिला. एवढेच नाही तर पडद्याआडचे राजकारण सांभाळ असा सल्ला दिला. आपल्यासाठी काशीचे विश्वनाथ व साहेब सारखेच. दोघांवरही आपली तेवढीच श्रद्धा! त्यांच्यामुळेच पक्षात न राहतासुद्धा आपली भरभराट झाली. शेवटी ‘फ्लेअर मॅनेजमेंट’ सांभाळण्यासाठी कुणीतरी लागतेच ना! या इथल्या गुळचट लोकांना ते जमत नाही त्याला मी काय करणार? तरीही माझा द्वेष करतात लेकाचे! म्हणून करून टाकली घोषणा राजकारण संन्यासाची. अरे, नसलो राजकारणात म्हणून काय झाले? आजही सत्तेच्या वर्तुळात वावरणारे सारेच मला सलाम करतात. माझ्याशिवाय पान हलत नाही कुणाचे. मग तो आमदार असो की मंत्री. कारण एकच. साहेबांनी टाकलेला विश्वास व मी दाखवलेली निष्ठा. राजकीय (आर्थिक नाही) व्यवहारात चोख राहिले की माणूस साऱ्यांनाच हवाहवासा वाटतो. तसा मी आहे व आयुष्यभर राहणार. कसलीही निवडणूक न लढता जर एवढा सन्मान मिळत असेल, सारे राजकारणी दरबारात हजेरी लावत असतील तर कशाला उगीच उमेदवारी मागण्याच्या फंदात पडायचे. उमेदवारीचे म्हणाल तर एका मिनिटात पाहिजे तिथून ती मिळवू शकतो मी. तेवढी वट आहे आपली. मुंबई आणि दिल्लीतही. आखीर पैसा बोलता है! पण मीच ठरवले. नकोच ते पडद्यासमोरचे राजकारण. साहेबांच्या आशीर्वादाने सुरू असलेला व्यवसायच बरा. निवडणूक आली की साहेब सांगतील तसे करायचे. विजय मिळाला की साहेबांना उचलून गुलाल उधळायचा. इतर कुणाचेही ‘बोज’ बनून राहायचे नाही. हो, आहे मी आक्रमक. आमच्या उत्तर प्रदेशच्या राजकारणाची शैलीच तशी आहे. इथल्या नेत्यांना ती जमत नसेल तर त्याला मी काय करणार? सुरुवातीला मला लक्षातच आले नाही हे घाशीराम प्रकरण. नंतर काही मराठी मित्रांकडून माहिती घेतली तेव्हा इतिहास कळला व चिडवतात का तेही कळले. आता चिडवा कितीही. मला काही फरक पडत नाही.’

एवढे बोलून भाई दमले. त्यांनी कपाळावर लावलेल्या टिळ्यावरही घामबिंदू दिसत होते. हे बघून बसलेले कंत्राटदार निघून गेले. ते जाताच भाईंनी डायरी काढून एकेका ‘ग्लोबल इन्व्हेस्टर’ला फोन लावायला सुरुवात केली. ‘तुमच्या सांगण्यावरून मी राजकारण सोडले. आता करा माझ्या कंपनीत गुंतवणूक. आपल्याकडे भरपूर जमिनी आहेत मुंबईत.’