‘मोदी हे मिडियाने फुगवलेला फुगा,’ या धारदार वक्तव्याला देशभर प्रसिद्धी मिळाल्याने राहुलजी जाम खुशीत होते. घरी परतल्यावर त्यांनी त्यांच्या आवडत्या दंडबैठका मारायला सुरुवात केली. तेवढ्यात एक सहायक जवळ येत कानात कुजबुजला. सत्ताधारी म्हणताहेत, मोदींनी तुमच्या फुग्यातील हवा एकदा नाही तर तीनदा काढली. हे ऐकताच ते अस्वस्थ झाले. व्यायाम थांबवून क्षणभर विचार केल्यावर त्यांनी हुकूम सोडला. ‘ढेरसारे गुब्बारे लाओ.’
अर्ध्या तासात त्यांच्यासमोर फुग्यांचा ढीग होता. तो घेऊन ते बंगल्याच्या हिरवळीवर गेले व एकेक फुगा फुगवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र तोंडावाटे फुग्यात हवा भरणे त्यांना काही केल्या जमेना. लहानपणी तर हे आपण खूपदा केले. आता मोठे (?) झाल्यावर का जमत नसेल? कदाचित सराव राहिला नाही असे म्हणत त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी महत्प्रयासाने एक फुगा फुगवला. त्याला गाठ बांधल्यावर हवेत सोडला पण तो वरच जाईना! वातावरण कुंद, हवा (पक्षाची) अजिबात नाही, हे लक्षात येताच ते थांबले. तोंडाला भरपूर व्यायाम झाल्याने त्यांचे कान दुखू लागले होते.
थोड्याच वेळात वाऱ्याची मंद झुळूक येताच त्यांनी फुगा हवेत सोडला. तो वर जायला लागला तसे ते आनंदाने टाळ्या पिटू लागले. ते बघून तिथे जमलेल्या त्यांच्या ‘टीम’मधील नेत्यांनीसुद्धा त्यांचेच अनुकरण केले. वर जात असलेला फुगा बघण्यात सारेच दंग असताना अचानक कुठून तरी आलेल्या रबरी गोळीने थेट फुग्याचा वेध घेतला व मोठा आवाज करत तो फुटला. लक्षात येताच हजर असलेले नेते आवाजाच्या दिशेने धावले तेव्हा कुंपण भिंतीच्या पलीकडून मणिशंकर अय्यर पळत जाताना दिसले.
हे बघून राहुलजी नाउमेद झाले नाहीत. त्यांनी पुन्हा नव्या फुग्यात हवा भरून तो सोडला. तो उंच गेला. हवेचा वेग कमी झाल्यावर तो बंगल्यासमोरच्या रस्त्याच्या दिशेने खाली यायला लागला तसे नेते धावले. तेवढ्यात एक पांढरी गाडी आली. त्यातून सॅम पित्रोदा उतरले. त्यांनी पटकन तो फुगा हातात घेऊन फोडून टाकला व लगेच निघूनही गेले. राहुलसकट सारे हा प्रकार अवाक् होऊन बघत राहिले. तरीही हिंमत न हारता राहुलजींनी तिसरा फुगा फुगवायला घेतला.
हवा भरताना त्यांना दम लागला. हे बघून एका टीम मेंबरने हवा भरण्याचा पंप आणला पण मेहनत मीच करणार असे सांगत त्यांनी तो वापरण्यास नकार दिला. हा फुगा अपेक्षेपेक्षाही जास्त वर गेला. काही वेळाने तो बंगल्यापासून दूर अंतरावर खाली उतरू लागला तसे सारे धावले. तेवढ्यात पुढे व मागे कमळ चिन्ह असलेली एक गाडी भरधाव वेगात आली. त्यात बसलेले शशी थरुर झटकन खाली उतरले. त्यांनी फुगा हातात घेतला व गाडीत बसून क्षणार्धात निघून गेले.
हे बघून संतापलेले राहुलजी घरात निघून गेले. थोड्या वेळाने ते एकटेच गाडी चालवत बाहेर पडले व थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ गेले. तिथे खुद्द मोदीच फुगे उडवत होते. वर गेलेले फुगे खाली येताच त्यांचे समर्थक ते हळुवारपणे हातात घेत होते व त्यांच्या नावाचा जयजयकार करत होते. हे दृश्य बघून त्यांच्या मनात अपराधीभाव दाटून आला. तेवढ्यात त्यांच्या खांद्यावर एक हात विसावला. मागे वळून बघितले तर खरगे उभे. ‘चलो बेटा, वापस चलो, नुसते फुगे उडवून आपल्याला यश मिळणार नाही. तुमचे परदेशदौरे बंद करून पक्षात शिस्त आणा. नक्की यश मिळेल.’ हे ऐकताच राहुलजी मान खाली घालून परतले.