काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर व्होट चोरीचा आरोप केला तेव्हापासून काँग्रेसला नवा नारा मिळालेला आहे. व्होट चोर, गद्दी छोड!… हा नारा संसदेपासून बिहारपर्यंत सगळीकडे गाजू लागलेला आहे. या नाऱ्याचं श्रेय खरंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, वर्षा गायकवाड आणि इतर काही मराठी खासदारांना द्यायला हवं. लोकसभेमध्ये आक्रमक होणाऱ्या या मराठी खासदारांनी पहिल्यांदा सभागृहात मोदी-शहांविरोधात ही घोषणा द्यायला सुरुवात केली आणि ती लगेचच विरोधी खासदारांमध्ये लोकप्रियही झाली.

बिहारमध्ये राहुल गांधींची व्होटर अधिकार यात्रा सुरू आहे. या यात्रेआधी सासाराममध्ये महागठबंधनच्या घटक पक्षांची मोठी जाहीर सभा झाली. सभेच्या ठिकाणी जे मोठमोठे फलक लावलेले होते, त्यावर ‘व्होट चोर, गद्दी छोड!…’ हेच घोषवाक्य लिहिलेलं होतं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आले तेव्हा त्यांचं स्वागत विरोधकांनी हीच घोषणा देऊन केलं. संसदेच्या अधिवेशनाचे शेवटचे दोन आठवडे प्रामुख्याने मतचोरीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात संपले. दररोज विरोधकांनी ‘व्होट चोर, गद्दी छोड’च्या घोषणाबाजीने सभागृहे दणाणून टाकली होती. लोकसभेमध्ये १३० वी घटनादुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मांडत असताना, एकीकडं तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी वगैरे खासदारांनी लोकसभाध्यक्षांच्या समोरील जागेत येऊन घोषणाबाजी केली, नंतर काँग्रेसच्या खासदारांनीही त्यांना साथ दिली. ही घोषणाबाजी ‘व्होट चोर…’ हीच होती. बिहारच्या विधानसभा निवडणुकीतही हा नारा प्रचारामध्ये गाजेल असं दिसू लागलं आहे. राहुल गांधींच्या नुक्कड सभांमध्येही हा नारा दिला जात आहे. तेजस्वी यादव वगैरे इतर पक्षांच्या नेत्यांनाही या नाऱ्यापासून स्वत:ला वेगळं ठेवणं कठीण जात आहे. काँग्रेसचा नारा विरोधकांना उचलून धरावा लागत आहे. मतचोरीचा खरा दणका भाजपला वाराणसीमध्ये बसू शकतो. वाराणसीमध्येदेखील मतांची चोरी करून मोदी निवडून आले असा आरोप काँग्रेसने केला आहे. पण, अजून काँग्रेसने त्याचे पुरावे दिलेले नाहीत. कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरी काँग्रेसने जशी उघड केली, तशी वाराणसीमध्ये झाली तर राजकीय वादळ येण्याची शक्यता आहे. वारणसीमध्येही मतांची चोरी झालेली दिसेल, असे सूचक विधान काँग्रेसचे प्रवक्ते करत असले तरी, त्यासाठी राहुल गांधी पत्रकार परिषद कधी घेणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. वाराणसीचा उल्लेख करून काँग्रेस केवळ हवेत गप्पा मारत आहे की, खरोखरच काँग्रेसला वाराणसीतील मतचोरीचा माहिती-विदा मिळाला आहे हे माहीत नाही. वाराणसीचा उल्लेख मात्र काँग्रेसचे प्रवक्ते वारंवार करताना दिसतात.

शिंदेंची लोकप्रियता…

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आठवड्यांपूर्वी दिल्लीत ठाण मांडून बसले होते. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. शिंदेंनी मोदींची भेट लोककल्याण मार्गावरील सरकारी निवासामध्ये घेतली होती. शहांना मात्र ते संसदेच्या दालनामध्ये जाऊन भेटले. शहांचं दालन जिथं आहे, त्या रांगेत नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह अशा वरिष्ठ नेत्यांचीही दालने आहेत. या नेत्यांच्या दालनाकडं जाणारी लॉबी चिंचोळी आहे आणि या नेत्यांकडील राबता मोठा आहे, त्यामुळं ही लॉबी नेहमी लोकांनी भरलेली असते. शिंदे याच लॉबीतून शहांच्या दालनात गेले. शिंदे आल्यामुळं आपोआप वातावरणनिर्मिती झाली. मराठीच नव्हे, हिंदी-इंग्रजी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथं धावले. काँग्रेस-भाजपच्या खासदारांचीही ये-जा सुरू होती. शहांच्या दालनातून शिंदे बाहेर येताच वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्यांना घेरलं. शिंदेंचे या प्रत्येकाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं पाहायला मिळालं. गोरखपूरचे खासदार आणि अभिनेता रविकिशनही तिथं होते, त्यांनी लगेच शिंदेंशी हस्तांदोलन केलं, मग तिथंच दोन-चार मिनिटं गप्पा रंगल्या. शिंदे मुख्य द्वारातून संसदेतून बाहेर पडले, तिथंही कोण-कोण भेटत गेलं. तेवढ्यात मागून तृणमूल काँग्रेसचे गप्पिष्ट खासदार कल्याण बॅनर्जी आले. त्यांनी शिंदेंना हाक मारून थांबवलं. शिंदेंना कसे आहात वगैरे चौकशी केली. ते निघून गेल्यावर शिंदेंनी टीव्हीवाल्या पत्रकारांना बाइट दिला. शिंदे हे शहांशी जेवढा वेळ बोलले त्याहीपेक्षा जास्त वेळ वेगवेगळ्या खासदारांकडून झालेलं स्वागत स्वीकारण्यात गेला. शिंदेंची दिल्लीतील लोकप्रियता सगळ्यांनाच अचंबित करून गेली.

चला, सभा सुरू करू!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना राजकारणातील हेवेदावे फारसे समजत नाहीत, हे एका अर्थी चांगलंच म्हटलं पाहिजे. त्यांचा अजेंडा ठरलेला असतो, त्यानुसार ते काम करत राहतात. सासारामच्या जाहीर सभेसाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर काँग्रेसचे नेते घटनास्थळी पोहोचले होते. ते लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची वाट पाहात होते. ते आले की, सभा सुरू करायची असं ठरलेलं होतं. राहुल गांधी वाट पाहात होते, सभेची वेळ होत होती, काही वेळाने राहुल गांधींनी त्यांच्या बिहारच्या नेत्यांना विचारलं की, लालूप्रसाद आणि तेजस्वी किती वेळात पोहोचतील?… या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे स्वत:ला अडचणीत आणणं होतं. दोन दिग्गज कधी येतील हे कसं सांगणार, असा प्रश्न होता. काही ज्येष्ठ नेते अनुभवातून शहाणे झाले असल्यानं त्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नावर मौन बाळगलं. पण, त्यातील एखाद-दोघांनी, १०-१५ मिनिटांत दोघेही येतील, असं सांगितलं. त्यावर, राहुल गांधी म्हणाले की, त्यांना येऊ द्या, आपण, तोपर्यंत सभा सुरू करून टाकू… बिहारमध्ये काँग्रेसचे महागठबंधन राष्ट्रीय जनता दलाशी आहे, असं असताना लालूप्रसाद आणि तेजस्वी यांच्याशिवाय सभा सुरू करायची म्हणजे दोघांनाही दुखावण्यासारखं होते. पण, तोपर्यंत लालूप्रसाद-तेजस्वी यांचं आगमन झालं. दुय्यम स्तरावरील नेत्यांनी आपली भाषण संपवली आणि सभेची सुरुवात तेजस्वीच्या भाषणाने झाली आणि शेवट लालूप्रसाद यादव यांच्या अस्सल बिहारी बोलीने!

वंचित मतदारांकडं लक्ष कोण देणार?

बिहारमध्ये राहुल गांधींच्या यात्रेमुळं मतांची चोरी होत असल्याचं लोकांना समजू लागलं आहे हे खरं, पण, या यात्रेच्या वेळेवर आक्षेप घेता येऊ शकतात. या यात्रेमध्ये राहुल गांधी असल्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना सहभागी व्हावं लागतंय. त्यातील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या यात्रेमुळं कळीचे दिवस वाया जाणार आहेत! मतदार फेरतपासणी मोहिमेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने ६५ लाख मतदारांना मतदार यादीतून वगळलेलं आहे. त्यातील २० लाखांहून अधिक मृत असल्यानं त्यांना वगळावंच लागेल. पण, अन्य मतदारांना आधार कार्ड व इतर पुरावे देऊन आपलं नाव पुन्हा मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेता येईल. पण, ब्लॉक स्तरावरील निवडणूक अधिकारी वगळलेल्या मतदारांना दाद देणार नाहीत, हे सगळ्यांना माहीत आहे. लोकांनी निवडणूक कार्यालयात पोहोचून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घ्यावे या साठी काँग्रेसच्या नेत्यांना गावा-गावांत फिरावं लागेल. पण, नेते तर राहुल गांधींच्या यात्रेत व्यस्त आहेत. मग, हे काम करणार कोण? पण, त्याकडं काँग्रेसनं लक्ष दिलेलं नाही. यात्रा काढून वातावरणनिर्मिती होणार असली तरी, प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम करण्याची गरज काँग्रेस कशी पूर्ण करणार हा प्रश्न काही शहाणे काँग्रेस नेते खासगीत विचारत होते. वेळ वाया जात असल्याची कबुली त्यांनी पत्रकारांशी खासगीत गप्पा मारताना दिलीही. भाजपकडं यंत्रणा आहे, त्यांना हवे ते मतदार पुन्हा मतदार यादीमध्ये समाविष्टही होतील. काँग्रेसला मत देऊ शकणारे मतदार वंचित राहतील, त्यावर उपाय शोधण्याची गरज असताना यात्रा काढून काय फायदा, हा काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न खरंतर त्यांचीच कोंडी करणारा होता!