‘ठाकरे ब्रँड’ मजबूत करण्याच्या व्यासपीठावर हजेरी लावून दोन भावंडांमधील ऐक्य आणखी खुलून दिसण्यासाठी केलेली लगबग कामी आली, असा विचार करत सुप्रियाताई घरी पोहचल्या तर दारात बाबा उभेच. मग त्यांना सर्व वृत्तांत कथन करून झाल्यावर त्या घरात जायला वळल्या तोच ते म्हणाले, ‘व्यासपीठावरच्या तुझ्या सक्रियतेची खूपच चर्चा सुरू झाली आहे सगळीकडे.’ त्यावर हसत दाद देत त्या शयनगृहात गेल्या. लगेच त्यांच्या मनात विचारांचे वारे वेगाने घोंगावू लागले. आज आपण जे काही केले ते हेतुपूर्वक. या राज्यात खरे ब्रँड दोनच. एक ठाकरे व दुसरा पवार. त्यातले ठाकरेंचे घोडे आज गंगेत न्हाले. आता राहिली ती पवारांची एकी. हे घडले तर दोन्ही ब्रँड संपवू अशी वल्गना करणारे डोक्यावर आपटलेच म्हणून समजा. शेवटी प्रश्न प्रादेशिक अस्मितांचा. आणि हे पक्ष म्हणजे भलेमोठे कुटुंबच की! कुणी कितीही मोडता घातला तरी एकत्र येणे गरजेचे.
आज आपले कुटुंबवत्सलपण पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मागे मविआ स्थापनेच्या वेळी क्षणिक बंड करून परतलेल्या दादांना आपण मिठीच मारली. काय चर्चा झाली तेव्हा त्याची. सामान्यांना असा कौटुंबिक उत्स्फूर्तपणा आवडतो. घर तोडणाऱ्यांपेक्षा घर जोडणारी माणसे जास्त भावतात. या मेळाव्यात केलेल्या कृतीतून हे वेगळेपण सामान्यांच्या मनावर ठसले. यामुळे प्रतिमाही सुधारेल पण आपले लक्ष्य केवळ एवढेच नाही. आता दादा काय करतो ते बघायचे. तसा तो वरून रांगडा दिसत असला तरी आतून हळवा आहे. त्याने नक्कीच ही दृश्ये वाहिन्यांवर बघितली असणार. ते बघून त्याचे मन नक्कीच गलबलून आले असेल. आता तो ऐक्याविषयी निश्चित गंभीरपणे विचार करेल. ठाकरेंमधील एकी २० वर्षांनी जमून आली. आपल्यातल्या बेकीला तर अजून २० महिनेसुद्धा व्हायचे. त्यामुळे जेवढ्या लवकर हे जमेल तेवढे पुलाखालून पाणी कमी वाहील. खरे तर या मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील राजकीय कुटुंबांच्या एकत्रीकरणाची लाटच यायला हवी. तिथे पुढे पुढे करण्याचा आपला खरा हेतू हाच होता की! ते दोन्ही ठाकरे बंधू मला ताई म्हणतात. याच नात्याचा आधार घेत आत्या म्हणून मी दोन्ही भाचे आदित्य व अमितला वेळेवर धावपळ करून योग्य जागी उभे केले. कोणत्याही कुटुंबात भाच्याच्या उजवण्याने आत्याला जो आनंद होतो तो लक्षवेधी ठरतो. तशी संधी आता दादा देईल का हे बघायचे.
यानिमित्ताने आता राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू व्हायला हव्यात. माध्यमात तसे ‘फिलर’ सोडायला एक-दोघांना सांगायला हवे. अशी विधाने आली की बाबा नेहमीप्रमाणे त्यावर कळस चढवतात. मग चर्चेला जोर येत दादावर दबाव आणखी वाढतो. तसा तो अलीकडे सावध झालाय पण यावेळी आपली ‘आत्याधर्म’ पाळण्याची कृती त्याला नक्की भावली असेल. असा विचार करता करता ताईंना कधी डोळा लागला ते कळलेच नाही.
झोपेत त्यांना स्वप्न पडले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा सोहळा सुरू आहे. बाबा, आई, दादा, सुनेत्रा वहिनी सारे व्यासपीठावर आहेत. सर्वांची भाषणे आटोपल्यावर एकत्रित छायाचित्रासाठी सारे उभे राहतात तेव्हा ताई पार्थ व सुनेत्रा वहिनींना आई-बाबांच्या मध्ये, रोहित व युगेंद्रला दादांच्या जवळ उभे करतात. तेवढ्यात त्यांना स्वप्न भंगून जाग येते. बघतात तर सकाळ झालेली. सवयीप्रमाणे मेजावरची वर्तमानपत्रे उघडून त्या बघतात तर ‘एकत्र येण्यासाठी मराठीसारखा मुद्दाच कुठे आहे आमच्यात’ हे दादांचे वक्तव्य बघून त्यांचा हिरमोड होतो. मग ताई मुद्द्याच्या शोधकार्याला लागतात.