राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपासनामार्गात आलेल्या अनुभवांविषयी सांगतात, ‘मीही एक उपासक आहे. माझ्या या धारणेत वयाच्या नवव्या वर्षांपासूनचा काळ गेलेला आहे. मुले त्रास देत म्हणून दूर कुठे तरी गुराखी मुलांसोबत जाऊन, नदीमध्ये महादेवाची पिंड करून सहा-सहा, आठ-आठ तास मी त्यात घालवीत असे. माझी पूजा म्हणजे पऱ्हाटीची फुले व झाडांची कोवळी पाने, धूप म्हणजे कुठलीही जळती गोवरी आणि आरती म्हणजे मारुतीच्या देवळातील स्नेहभरित वात तेथे लावणे. या पूजेत मी नेहमी गर्क असे आणि घरच्या लोकांचा ‘तू उनाड आहेस’ म्हणून मार खावा लागत असे. असा माझा मूर्तिपूजेचा कार्यक्रम सतत तीन वर्षे चालला होता. मला त्यात जर काही दिसून आले असेल तर ते एवढेच की, उपासना ही वृतीला बोध देऊन आपल्या उपास्य देवतेची कार्यप्रणाली उपासकासमोर मांडते. उपास्य देवतेची कर्तव्यदीक्षा ती त्यास देते. पुरुष एकदा त्या मार्गात प्रविष्ट झाला की त्यास- उपास्य देवतेचे आवडते कार्य करणे म्हणजेच उपासना- असे वाटू लागते. तो सर्वदा सावधपणाने आपल्या उपास्यमूर्तीशी हितगुज करीत कर्तव्यशूर होऊन जीवनसंग्रामात लढत असतो. आपल्या अंत:करणात अशा योग्य उपासनेचे बीज रुजविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ठरलेल्या मार्गानेच तुम्ही विचार करून वर चढू शकला (कोणत्याही मार्गाचे योग्य अवलंबन केल्यास चढता येतेच.) तर तुम्हास कळून येईल की, अनेक देवदेवतांच्या उपासना मार्गानी जाण्याचे काही कारण उरत नाही. कोणताही एक मार्ग योग्य विचारांनी आचरला की त्यातच अंतिम साध्य प्राप्त होऊ शकते.

उपासनेतून उन्नतीचा राजमार्ग सांगताना महाराज म्हणतात, ‘एखाद्या व्यवहारी मित्राच्या संगतीने पुरुष ज्याप्रमाणे थोडय़ा अवधीत भरपूर व्यवहारज्ञान मिळवू शकतो, त्याप्रमाणेच उपासनेने जे लोक अध्यात्माचे धनी झाले त्यांचे वचन पाळण्याची उपासनावृत्ती आपल्यात निर्माण झाली की, आपण त्यांच्या बोधानुसार सहजच वर चढून इहपरसुख साधक अमरज्ञान मिळवून स्थितप्रज्ञता प्राप्त करू शकतो. त्याचे मार्ग जरी अनेकविध रंगांनी रंगलेले दिसत असले तरी निर्लोभ वृत्तीने वर येण्यास काही अडचण येत नाही. आपोआपच- विचारपूर्वक उन्नती करू इच्छिणाऱ्यास एक निश्चित मार्ग लाभतो. केवळ स्वत:च्या प्रयत्नाने किंवा संस्कारांनी, तसेच संगतीने व कोणत्याही धर्मानेसुद्धा उन्नतीचा मार्ग मिळू शकतो पण त्या सर्वात केंद्ररूप मार्ग (किंवा वृत्ती) निर्लोभ, निवैर व निर्विकार असायला पाहिजे. म्हणजे उपासक उपासनेने उपास्यच होऊन आपल्या अमर आत्मतत्त्वात- मूळचा अमर आहे तसाच होऊन- अखंड निश्चल राहू शकतो. महाराज याविषयी ग्रामगीतेत लिहितात-

उपासनेद्वारे मानसिक शक्ति।

वाढता दु:खीही सुखाची प्राप्ती

ही ईश्वरी कृपाही असे हाती। जीवाच्याचि

मित्रा! हे विसरू नको आता।

आपणचि सर्व कर्ताहर्ता

यात देव-दैवाची वार्ता। आपणचि केली

rajesh772@gmail.com