राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला’’ अशा प्रसंगी अनेक साधने निर्माण झालेली आपण ऐकली असतील. रामाला आपली क्रांतिकारक शक्ती वाढविण्याकरिता वानरांची म्हणजे तत्कालीन सामान्य तरुणांची शक्ती संघटित करावी लागली. श्रीकृष्णाला गोपाळ व गोपिकांची शक्ती एकवटावी लागली. तसे शूरांना व संतांनाही करावे लागले. जोपर्यंत सत्यत्वाची भूमिका लोकांना पटली नाही तोपर्यंत त्या देवांना व शूरांनाही यातना सहन कराव्याच लागल्या. शक्तीची वाढ प्रसंगाच्या कसोटीनेच होते. त्यासाठी सत्याने वागणारे लोक पुढे यावे लागतात. अर्थात यालाही सामुदायिक योगच यावा लागतो. त्यासाठी जनजागृती करावी लागते. जाती, पंथ व पक्षभेद विसरावे लागतात. 

पण लोक अज्ञान झाकण्याकरिता म्हणतात की, ‘‘थोरांची बरोबरी आपण कशी करणार?’’ पण हे म्हणणे चूक आहे व ही चूक तेच करू शकतात, ज्यांना समाजाच्या हिताबद्दल अनास्था आहे किंवा जे स्वार्थी आहेत. आसुरी शक्तीविरुद्ध दैवी दुर्बलतेचे उदाहरण देऊन महाराज म्हणतात, ज्या संघटनेविरुद्ध लढायचे असते त्या संघटनेइतके तरी लोक एक जात, एक धर्म व एकमती होणे विजयाच्या व संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असते. याचे प्रमाण समोरच्या आक्रमक किंवा प्रतिकारी शक्ती संख्येवरच अवलंबून असते. कारण त्यांनाही तेच दाखवायचे असते जे तुम्ही दाखविणार! बाह्यभेद नसला तरी दोघांच्या हेतूत मात्र फार मोठा फरक राहतो. ज्याचा हेतू विशाल व न्याय्य त्याला दैवी शक्तिवान म्हणतात आणि ज्याचा हेतू आकुंचित व अन्याय्य त्याला आसुरी शक्तिवान म्हणतात. आसुरी शक्तीच्या लोकांशी लढण्याचा प्रसंग येतो तेव्हा केवळ हेतू उच्च असूनच भागत नाही; तर त्यांच्यापेक्षा अधिक लोकशक्ती दाखवावी लागते.

परिस्थितीबरोबर साधने बदलली किंवा कितीही भिन्न भिन्न रूपके देऊन वर्णन केले गेले तरी हे तत्त्व अबाधित आहे व आजही त्याचाच अंगीकार करून जात, धर्म, गरीब व श्रीमंत हा भेद इत्यादी गोष्टी विसराव्या लागतील. आपल्याला आपली दृष्टी विशाल केली पाहिजे. आपसात जर एखादी गोष्ट जमत नसेल तर त्याला विकासाची भावना शोधावी लागते व शक्ती दाखवावी लागते. त्यात स्वार्थी भावनेचा थोडादेखील अंकुर असला तरी ‘मतामतांचा गलबला व कोणी पुसेना कोणाला’ असे होते. महाराज प्रश्न विचारतात की, आपणाला कुणाचा प्रतिकार करायचा आहे? व ज्यांचा प्रतिकार करायचा आहे त्यांच्या पुढाऱ्यांसहित व त्यांच्या सेनेसहित त्यांची जात एक आहे की अनेक? त्यांचे ध्येय, आणि धर्म एक आहेत की अनेक? अर्थात जेवढय़ा प्रमाणात ते एक असतील तेवढय़ा प्रमाणात त्यांना यश आहे हे निश्चित समजा. जोपर्यंत ही शक्ती प्रतिकार करणाऱ्यांनी अजमावली नसेल तोपर्यंत त्यांना त्यांच्यावर विजय मिळविता येणार नाही. यासाठी आपण कोणते कार्य करावे, याची योजना आधी आखली पाहिजे, नाही तर बाकीची सर्व धडपड अपयशी ठरणार आहे हे विसरू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com