राजेश बोबडे

‘‘पंढरपूर व नाशिकच्या मंदिरांत हरिजनांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रवेश मिळवून दिला. भारतातील अस्पृश्यता हटविण्यासाठी सतत देशभर प्रबोधन केले. महाराज म्हणतात भारतात विद्वान, पंडित, सत्ताधारी पुष्कळ होऊन गेले. राजेमहाराजेही झाले; पण त्यांनी ताजमहाल, किल्ले बांधणे व मोठमोठे धर्मग्रंथ लिहिणे याशिवाय काही कार्य केले नसावे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, भारतातील शेकडा १० टक्के लोकांनादेखील खरा धर्म म्हणजे काय, हे कळत नाही. स्वार्थी मनोवृत्तीवर संयमाची आवश्यकता वाटत नाही. अध्यात्माच्या दृष्टीने ‘सर्व ठिकाणी ब्रह्म आहे’ असे लोक म्हणतात, पण आपल्या शेजारी काय घडत आहे, याकडे ढुंकूनही पाहात नाहीत. अध्यात्माचा देश म्हणून आपल्या देशाचा कितीही गाजावाजा झालेला असला तरी, आपल्यातील धर्मग्रंथांची खरी परीक्षा आपणास अजून झालेली नाही. विदेशात मात्र धर्म जिवंत दिसतो.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: देखावा नको, कर्तव्य करा!

‘‘महाराज अनुभव कथन करताना म्हणतात, मी जपानमध्ये विश्वधर्म व विश्वशांती परिषदेला संबोधित करण्यासाठी गेलो होतो; तिथे तर मालक व नोकर असा भेदच नाही. मला हे ओळखताच येईना की कोण नोकर व कोण मालक! आपापले काम झाले की दोघेही एका टेबलावर चहा पीत. आपल्याकडे नोकरवर्गावर अन्याय होतो. मालक अर्ध्या रात्री भेटला तरी नोकराने दंडवत केलाच पाहिजे असा दंडक आहे. मानवसमाज सर्व एकच आहे ना? मग कशाला पाहिजेत गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, स्पृश्य-अस्पृश्य, मालक-नोकर भेद? सरकारने कायदा करावा, लोकांनी सप्ताह पाळावा, प्रचारकांनी व नोकरवर्गाने प्रचार करावा, हे ठीक आहे. परंतु अंत:करणातून जोपर्यंत ‘हा अमुक जातीत जन्मला म्हणून याला स्पर्श करू नका, यांच्याशी बंधुत्वाचा व्यवहार करू नका’ ही भावना नष्ट होत नाही तोपर्यंत हे सर्व अनाठायी आहे.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : रामराज्यनिर्मितीचा रामबाण उपाय

‘‘बिहारमध्ये भूदानात मिळालेली जमीन एका हरिजनाला देण्यात आली. तेव्हा तो जमीनमालक म्हणू लागला – ‘हमारी जमीन हरिजन को क्यों देते हो? ब्रह्मणोंको दो, ऊंची जातीवालोंको दो।’ तो त्या हरिजनाला शेतात गेल्याबद्दल मारू लागला. दानधर्मामुळे उद्धार होतो या भावनेने दान केले, पण मनात दया नाही, माणुसकी नाही, ते खरे धर्माचरण नव्हे. सृश्यास्पृश्यतेचे हे भूत आपणास गाडून टाकायचे आहे. हे कार्य प्रचार करूनच पूर्ण होईल. स्वत:ला सनातनी म्हणविणारे ‘सनातन तत्त्वांची’ किती बूज राखतात? परक्या धर्मात गेलेले त्यांना चालतात, मग त्यांना कोठेही मज्जाव नाही; पण हरिजन म्हणून, आपले म्हणून ते आपल्या घराची किंवा देवळाची एक पायरी चढले तरी या कर्मठ लोकांना खपत नाही.’’  महाराज राष्ट्रवंदनेत म्हणतात,

तन-मन-धन से सदा सुखी हो,

भारत देश हमारा।

स्पृश्यास्पृश्य हटे यह सारा,

देश कलंक मिटाने।

सब के मन कर्तव्यशील हो,

धन उद्योग बढाने।

तुकडय़ादास कहे स्फूर्ति हो,

सब को भक्ती कराने।।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com