राजेश बोबडे

नामस्मरणातच सर्व काही आहे असे संत म्हणतात. तेव्हा कोणते नाम सर्वात मोठे व ते किती वेळ जपावे म्हणजे आत्म्याला शांती व मोक्षसुख मिळेल? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘नामस्मरण लहान किंवा मोठे नाही. मोठे आहे जागृत राहून मन स्थिर करून पवित्र श्रद्धेने स्मरण करणे. मग तुमच्या आवडीचे कोणतेही नाम असो ते एकाच अर्थी असते. उगीच नामानामांचा भेद करून जे त्यात लहानमोठेपण निर्माण करतात ते सर्व पंथमार्गी लोक आहेत.’’ महाराज म्हणतात की, ‘‘मी त्यांना असा प्रश्न करतो, की तुम्ही सांगितलेल्या मोठय़ा नावानेही किती लोक इमानदार व व्यवहारशुद्ध झाले आहेत? त्यांना तरी साक्षात्कार झाला आहे का? याचे उत्तर तुम्ही असे द्याल की, ‘‘जाकी रही भावना जैसी, हरिमुरत देखी तिन तैसी’’ असे जर आहे तर मग भावना, चारित्र्य, स्थिरता हेच महत्त्वाचे आहे, असे का नाही सांगत? नामस्मरण हे आपल्यासमोर दिव्य पुरुषांचे चरित्र नेहमी उभे राहावे याचे द्योतक आहे.

हेही वाचा >>> चिंतनधारा : जग कसे चालले आहे?

जसे संत तुकोबा म्हणतात- ‘‘तुका म्हणे अळी। झाली भिंगोटी सगळी’ याचे कारण जसा निजध्यास आहे तसेच जपाचेही कारण निजध्यासानेच पूर्ण होते व स्मरण करणाऱ्याला चिरंतन शांती मिळते. तो जेव्हा तनाने, मनाने त्या नामस्मरणरूपी ध्येयाला समर्पित होतो तेव्हा त्याच्या दैहिक वासना नामस्मरणात विलीन होतात. ही संधी जेव्हा उपासकाला मिळते तेव्हा अनेक सिद्धी आडव्या येतात. तो त्यात भुलला व महत्त्वाचे संधान त्याने सोडले की त्या नामस्मरण करणाऱ्याचे पतन होते. व नको असेल तीच दिशा त्याला लागते, असे होऊ नये म्हणून वैराग्य, ज्ञान याची संगती नामस्मरण करणाऱ्याला साथ मिळाली तरच त्याची नाव पार होते, पण या दैहिक सुखाकरिता, लोक-प्रतिष्ठेकरिता, राज्यसत्तेकरिता आपल्याला या नामस्मरणाचा लाभ व्हावा असे मनात चिंतत असेल तर तेही सुख प्राप्त होणे स्वाभाविक आहे.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: पतनशील पांडित्य

‘‘गंगेवर स्नानाला जाणारा माणूस जसा डबक्यात स्नान करून यावा, अमृताकडे जाणारा माणूस जसा दारूकडे वळावा तशी या नाम घेणाऱ्याची गती होते. शेवटी ते नामस्मरण उद्देशहीन रूप धारण करते व त्याने जीवाची हानी होते. तेव्हा नाम कोणते घ्यावे, याचे उत्तर आवडेल ते घ्यावे, पंथ कोणता असावा याचे उत्तर आवडेल तो, आपल्या बुद्धीला पटेल तो. पण तत्त्व मात्र एकच असते. ते साधण्याची साधना ‘मने, काया-वाचे-उच्चारावे नाम’ ही असावी. याला संसार सोडावा लागत नाही, पण अनायासेच त्याच्या बुद्धीत फरक पडल्यामुळे संसारातील सार त्याला मिळते आणि मग तो आत्मशांतीला व मोक्षाला पात्र होतो. महाराज ग्रामगीतेत लिहितात..

भिंगोटी अळीसि गोंजारी।

निज्यध्यासे आपणासमान करी।

तैसा देव भक्तालागी घरी।

साधनजाळे पसरोनि॥

ऐसे हे प्रत्यक्षचि घडे।

जीव आर्त होता मार्ग सापडे।

मार्गे चालता साक्षात्कार जोडे।

व्यापक देवदर्शनाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com