राजेश बोबडे
आज १ मे – आंतरराष्ट्रीय कामगार दिन! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कामगार-कर्मचारी वर्ग आणि उद्योगपती यांच्यातील संबंधाचा विचार साकल्याने केला होता. ते म्हणतात, ‘‘आपण हे ऐकत व पाहात आलो आहोत की काहीही काम न करता, कष्ट न घेता, युक्तीने वा सक्तीने अज्ञ समाजाची शक्ती कवडीमोलाने विकत घेऊन त्यावर चैनीने जगण्याची प्रवृत्ती ज्यावेळी श्रीमंत समाजात शिरली, त्यावेळी त्या अनुचित वर्तनाचा इतका अतिरेक होत गेला की आज समाजात भयंकर विषमता वाढून परिश्रम करणाऱ्यांना जगणेदेखील मुश्कील होऊन गेले. नशीब व देवाची अवकृपा घोकणाऱ्या भाबडय़ा समाजाला या विषमतेचे खरे रहस्य ज्या दिवशी कळले त्या दिवसापासून त्यांच्या मनात या ऐतखाऊ समाजासंबंधी अशी तेढ वाढू लागली की तिचा परिणाम आता पदोपदी जाणवू लागलेला आहे.’’
आर्थिक विषमतेतून येणाऱ्या या तेढीमुळे आपल्या कार्यसंस्कृतीवर व अंतिमत: देशावर त्याचा कसा अनिष्ट परिणाम होतो, याविषयीचे महाराजांचे विवेचन तर अत्यंत मार्मिक आहे. ते म्हणतात, ‘‘मी खेडय़ातील व शहरातील पुष्कळ कामगारांना (सरकारी कर्मचारीसुद्धा) बघतो. मला त्यांच्या मनात आजकाल ही गोष्ट प्रामुख्याने शिरलेली दिसते की, ज्यांच्या जवळ म्हणून पैसा आहे त्यांच्या जवळ तो हरामानेच (बेइमानीने) आलेला आहे -हरामाशिवाय कुठेही पैसा असणेच शक्य नाही; मग त्यांचा पैसा आपण तरी इमानाने काम करून का घ्यायचा ? आपणही तो हरामानेच का घेऊ नये? या दृढ समजाचा त्यांच्या कामावरदेखील परिणाम झालेला दिसतो. मजूर घरून निघतो केव्हा, कामावर पोहोचतो कधी व तेथे थांबतो किती हे जरी घडय़ाळाचे काटे अगदी तंतोतंत दर्शवीत असले व त्यात चूक नसली, तरी काम करताना त्यात त्याची गती, उत्साह, जीवभाव मात्र दिसून येत नाही. ते आळशी आहेत, मुत्सद्दी आहेत, कामचुकार आहेत की बीमार आहेत, याची बारकाईने पाहाणी करताना मला आश्चर्य वाटू लागते. शरीराला जर असाच स्वभाव पडत गेला तर अंगची कामाची तडफ व धमक अल्पावकाशात त्यांना कायमची सोडून गेलीच म्हणून समजा.
मधल्या मुनिमांची देखील वृत्ती त्याच प्रकारची बनलेली असल्यामुळे तिला कोणताही ताळमेळ नसतो. फक्त मालकांच्या डोळय़ासमोर ‘देखावा’ दाखविला की झाले ! वरिष्ठांशी हांजी-हांजी करून त्यांची मर्जी संपादन केली की आटोपले! मग अन्य वेळी मजूर व मुनीम हे दोघेही आपली गट्टी जमवितात आणि ‘तेच मजूर व तेच काम पाहणारे’ असे स्वरूप त्यास प्राप्त होऊन, ती एक पैसा लुबाडणारी टोळीच बनून जाते. किंवा असेही होते की मुनीम आपणाला ‘कमिशन’ देणाऱ्या मजुरांनाच हाताशी घेतात आणि अशा रीतीने त्यांच्या घासातला घास काढून गब्बर बनत जातात. त्यांचे संबंध एवढे चांगले असतात की मालकांना मजुरांचे व मजुरांना मालकाचे दर्शन घडण्याचा प्रसंगच बहुधा येत नाही. ‘‘मी सर्व काही पाहून घेतो’’ म्हणून तो दिवाणजीच इकडे आपले राज्य स्थापन करून आपला गोंधळ चालू ठेवतो’’
rajesh772@gmail.com
