‘राजकारण्यांची विश्वसनीयता कमी होत आहे’ असे भाजपचे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कार्यक्रमात केलेले वक्तव्य (७ सप्टें.) वाचले. वस्तुस्थितीला धरूनच असणारे हे वक्तव्य नितीनजींनी नेमके कुणासंदर्भात केले आहे हे मात्र त्यांनी ऐकणाऱ्यांवर सोपविले आहे का? या वक्तव्याद्वारे त्यांना स्वपक्षीयांची कानउघाडणी करायची आहे की, इतर नेत्यांना कानपिचक्या द्यायच्या आहेत? महाराष्ट्र सरकार ज्या लाखो- कोट्यवधींच्या योजना रोज ऊठसूट जाहीर करते पण त्या पूर्ण करण्याची कुवत आहे का हे पाहिले जात नाही. तसेच दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी नुसताच बोलघेवडेपणा सुरू आहे, त्याला उद्देशून नितीनजींनी हे वक्तव्य केले असेल तर ते बरोबरच आहे. परंतु इथेही, भाजपची इतर शीर्षस्थ नेतेमंडळी वारेमाप आश्वासने देत असताना त्यांचा एक नेता जनतेच्या बाजूने बोलत असल्याचे भासवून निवडणूक जिंकण्याची रणनीती तर आखली जात नसेल, कशावरून ?

● मिलिंद कोर्लेकरठाणे.

आधुनिक, संविधानारित देवत्व

देव झालो असे स्वत: म्हणू नये’ हे सरसंघचालकाचे बौद्धिक वाचले. वस्तुत: त्यांना असे विचार का मांडावे लागले हे समजणे फार महत्त्वाचे आहे. आधुनिक भारताची संकल्पना व विस्ताराचा तसेच देशातील सर्व घटकांचा विकास हे स्वप्न वास्तव्यास आणण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात; पण हे मार्ग संविधानाच्या चौकटींतून मार्गक्रमण करणारे असावेत. ते साध्य करण्यासाठी आर्थिक, मानवी क्षमता सामाजिक वृत्ती व कृती यांच्या मर्यादेचे भान सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्यांना हवे; पण आज सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्यांच्या स्वत:ला देवत्व प्राप्त करून घेण्याच्या हट्टापायी सरसंघचालकास या गुंणाचा अभाव दिसत असावा. लोकशाही व राष्ट्र उभारणी ही काही वास्तू-बांधणीसारखी नसते तर ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. अशा राष्ट्र संकल्पनेच्या उभारणीसाठी द्वेष भावना, संकुचित विचार, सूड भावना आदी गुंणांना तिलांजली देणे आवश्यक असते. राष्ट्रीय एकात्मता, संसदीय लोकशाही, वैज्ञानिक दृष्टिकोन व सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती हीच खऱ्या देवत्वाची लक्षणे ठरावीत.

● फादर पायस फ्रान्सिस मच्याडो, नंदाखाल (विरार)

हेही वाचा >>> लोकमानस: घाईगडबड महागात पडू शकते!

नंदाखाल कोफराड, वसई

धुरीणांनाच चाड नाही

अन्यथासदरातील ‘देश बदल रहा है…!’ हा लेख (७ सप्टेंबर) वाचला. नैतिकता आणि ‘जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगणे’ यासारख्या बाबी आता आमच्या काही धुरीणांनी आपल्या आचरणातून व शब्दकोशातून हद्दपार केल्या आहेत, असेच सद्या;स्थितीचे अवलोकन करता दिसून येते.

● अॅड.लखनसिंह कटरेबोरकन्हार, जि. गोंदिया

लागेबांधे उघड होतील म्हणून?

लोकलेखा समितीकडून ‘सेबी’ अध्यक्षा माधवी बुच यांची चौकशी होणार’ व ‘कर्मचाऱ्यांकडून राजीनाम्याची मागणी’ या बातम्या (६ व ७ सप्टें.) वाचल्या. एकंदरीत गुंतवणूकदारांच्या हिताच्या दृष्टीने ‘हिंडेनबर्ग’ अहवालानंतर सरकारने बुच यांना पदावरून हटवायला हवे होते. पण सगळेच लागेबांधे उघड होतील म्हणून कोंबडे झाकायचा प्रयत्न झाला असावा.

● स्टीफन परेरावयभाट (वसई), जि. पालघर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही देशाची बुद्धिहत्या…

वाद आणि दहशत’ हे संपादकीय (७ सप्टेंबर) वाचले. गोरक्षकांकडून हत्या हा गेल्या दशकभरातला प्रकार, परंतु हरियाणातील एका उच्चवर्णीय हिंदू तरुणाचा झुंडबळी झाल्याच्या निमित्ताने समाजात त्याविरोधात आता आवाज उठतो आहे; ज्याप्रमाणे बलात्काराच्या विरोधातसुद्धा उच्चवर्णीयांमधील, अभिजनांमधील पीडितांच्या निमित्तानेच पुन:पुन्हा आवाज उठत असतो. गोरक्षक म्हणून जी नवी ‘जमात’ निर्माण झाली आहे तिच्या निर्मितीची मुळे खुद्द सत्तेतील भाजप आणि पर्यायाने रा. स्व. संघापर्यंत पोहोचतात. तरीही याविषयी भाजपचे धोरण कायमच दुटप्पीपणाचे राहिले आहे. ते एका राज्यात गोहत्याबंदीचे समर्थन करतात तर भाजपच्याच काळात गोमांस निर्यात वाढली असल्याचे अहवाल आहेत. ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे’, असे मानणारे सावरकर तर गायीला केवळ एक उपयुक्त पशू म्हणत. प्राणीहत्या झाली तरी चालेल परंतु देशाची बुद्धिहत्या होऊ नये असे त्यांचे मत होते. परंतु देशाची बुद्धिहत्याच व्हावी यासाठी गोहत्याबंदीचा नाममात्र कायदा करून त्याच्या आडून गोरक्षकांच्या उच्छादाला छुपी मोकळीक देण्याचे धोरण आहे की काय, असा संशय घेण्यास पुरेशी जागा आहे. ● राजेंद्र फेगडे, नाशिक