‘‘कुबडीमाझी सांडली गं…’ हा अग्रलेख (२९ ऑक्टोबर) वाचला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा पदरी पडल्यानंतर आणि अनेक मातब्बर नेते पराभूत झाल्यानंतर भाजपने दूरदृष्टीने निर्णय घेत रणनीती आखली. काँग्रेस पक्षातील असंतुष्टांना चुचकारले. त्यातून व्ही. पी. सिंग गळाला लागले. मंडल आयोग, बोफोर्सचा मुद्दा, भ्रष्टाचार याच्या जोडीला हिंदुत्वाची साद घालून प्रथमच राजकारणात थेट स्वरूपात धार्मिक मुद्दा आणला.

ज्या राज्यात भाजपला काडीमात्र आधार नव्हता त्या महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना, गोव्यात मगोप, पंजाबमध्ये अकाली दल, ओडीसामध्ये बिजू जनता दल, आसाममध्ये आसाम गण परिषद, जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी इत्यादी पक्षांशी युती करत धाकट्या भावाची भूमिका पार पाडली, मात्र उमेद न सोडता संघटना वाढवली आणि त्याचबरोबर मित्रपक्षांचे खच्चीकरण केले. महाराष्ट्रात शिवसेना दुभंगली, काँग्रेस खचली, इतर विरोधी पक्ष संपवले व भाजप स्वत: स्थिरस्थावर झाला. एखादे हिंस्रा श्वापद आपले सावज हेरते आणि टप्प्यात आल्यावर त्याचा फडशा पाडते, तद्वतच भाजपने आसाम गण परिषद, अकाली दल, बिजू जनता दल, मगोपा आणि राज्यात शिवसेनेची व पवारांच्या राष्ट्रवादीची बिकट अवस्था केली. काँग्रेस पक्ष उघड विरोध करत असला तरी गटबाजीमुळे त्यांच्या विरोधाची धार बोथट झाली आहे. राज्याराज्यांतील प्रमुख विरोधी पक्षांना भाजपने लुळेपांगळे केले आहे. २०४७ पर्यंतचा विकसित देश, विकसित राज्यांचा आराखडा तयार करताना इतिहास पद्धतशीरपणे संपवण्याची तयारी करून ठेवली आहे.

● नंदकिशोर भाटकरगिरगाव (मुंबई)

कुबड्यांचे परतीचे दरवाजेही बंद

‘‘कुबडीमाझी सांडली गं…’ हा अग्रलेख (२९ ऑक्टोबर) वाचला. १९८४ च्या दोन खासदारांपासून आज देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे येण्यापर्यंतच्या काळात भाजपने अनेक आव्हानांवर मात केली. वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि इतर नेत्यांनी देशभरात आपली पकड मजबूत केली. पुढे त्यांचे विचार सोडून मोदी-शहा यांनी शिवसेना, अकाली दलापेक्षा आपण प्रबळ झालो आहोत हे लक्षात येताच अपण मोठा भाऊ आहोत म्हणून टिमकी वाजवण्यास सुरुवात केली. मित्रांना हीन दर्जाची वागणूक देत ‘तुम्ही आम्हाला हवे आहात, पण आम्ही म्हणू ते ऐकणार असाल तरच…’ याची जाणीव करून दिली गेली. ‘तुम्ही युती तोडलीत, आम्ही नाही,’ असे दावे करण्यात आले. शिवसेना, राष्ट्रवादीला ईडी, सीबीआय, वगैरेची भीती दाखवत हे पक्ष खिळखिळे करण्यात आले आणि नवनेत्यांना मानाची पदे देऊन भुलवले. आता त्याच नेत्यांच्या आधारे पुन्हा राज्य सरकार स्थापन करून आधी त्या नेत्यांना दुय्यम पदे दिली आणि आता तर तुमची आम्हाला गरजच नाही, असे जाहीरपणे मोदी-शहांकरवी सांगितले गेले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या ज्या साध्या भाजपच्या ‘कुबड्या’ आहेत त्यांनाच लाथाडायला मोदी-शहा निघाले आहेत. ‘गरज सरो नि वैद्या मरो’ अशीच ही वृत्ती. भाजप हे उघडपणे बोलत आहे, कारण त्यांना ठाऊक आहे की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे परतीचे दरवाजे केव्हाच बंद झाले आहेत.

● मोहन कर्णिकगोरेगाव (मुंबई)

कुबड्याम्हणजे नक्की कोण?

भाजप कुबड्यांवर नव्हे, स्वबळावर’ ही बातमी आणि ‘कुबडी’ माझी सांडली गं… हे संपादकीय (२८ आणि २९ ऑक्टोबर) वाचले. अमित शहा यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरांतून टीका होणे साहजिकच आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा पत्रकारांसमोर समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणतात ‘‘ठाकरेंना कुबड्यांचा अर्थ कळत नाही, अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती. मित्र म्हणजे कुबड्या नसतात’’. खरे म्हणजे त्यांनी कुबड्या म्हणजे मित्र नसतात असे म्हणायला हवे होते! एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष जर भाजपसाठी कुबड्या नसतील तर अमित शहा कुणाला उद्देशून कुबड्या म्हणाले हे फडणवीसांनी सांगावे. शहांना कुबड्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि निवडणूक आयोग तर अभिप्रेत नाहीत? कारण या कुबड्या नसत्या तर लोकसभेच्या निवडणुकीतील सार्वत्रिक वाताहतीनंतर विधानसभा निवडणुकीत एवढे देदीप्यमान यश मिळाले असते का?

● शरद गोखलेठाणे

सर्वांना संपवणे हेच भाजपचे लक्ष्य

‘‘कुबडीमाझी सांडली गं…’ हा अग्रलेख (२९ ऑक्टोबर) वाचला. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात पाय रोवलेला भाजप आता मोठा झाला आहे. एवढा मोठा की त्याला आता सर्वांना संपवायचे आहे. आज ठाकरे भाजपच्या जात्यात आहेत. उद्या नक्कीच शिंदेंचा नंबर लागेल. तर भविष्यात ‘कार्यालयीन लावणी’ फेम राष्ट्रवादीवर ‘काका मला वाचवा’ म्हणण्याची वेळ येईल. भाजपने कधी रामाचे तर कधी हिंदुत्वाचे नाव पुढे करून सत्तेचा गड जिंकला, पण मतदार सर्वकाही जाणून आहेत.

● संजय पाटीलअंत्री/शिराळा (सांगली)

कोकणच्या मातीतील भाषिक संवेदना

गंगाराम गवाणकर यांच्याविषयीचा ‘व्यक्तिवेध’ (२९ ऑक्टोबर) वाचला. गवाणकर यांनी कोकणातील बोली भाषेला कलात्मक रूप देऊन तिला मुख्य प्रवाहात आणले. ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मालवणी बोली भाषेला मराठी रंगभूमीवर मानाचे स्थान मिळवून दिले. महाराष्ट्राची एक खास बोली भाषा म्हणून लोकप्रियता मिळवून दिली. गवाणकरांच्या लेखणीत कोकणच्या मातीचा गंध, सर्वसामान्य माणसांच्या भावनांचा ओलावा होता. त्यांची नाटकाशी घट्ट नाळ जुळली होती. ते अत्यंत मृदुभाषी म्हणून ओळखले जात. खडतर परिस्थितीचा सामना करत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. त्यांना १९९६च्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याने मालवणीची मान उंचावली. गवाणकर यांच्या जाण्याने मालवणी नाटकांचा एक मोठा आधारस्तंभ गेला. गवाणकर ही केवळ एक व्यक्ती नव्हती. ती कोकणच्या मातीत फुललेली भाषिक संवेदना होती. म्हणून त्यांनी शेवटपर्यंत कोकणच्या लोकजीवनाशी आपली बांधिलकी जपली.

● सुनील कुवरेशिवडी (मुंबई)

दर्जेदार शिक्षण अद्याप फार दूर

दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कसे करणार?’ हा कैलाश सत्यार्थी यांचा लेख (२९ ऑक्टोबर) वाचला. भारतात एक समूह प्रवाहाच्या बाहेर आहे. शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. दर्जेदार शिक्षण अजून फार दूर आहे. या मुलांची नोंद सरकार शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून करते. राजकीय इच्छाशक्तीचा विचार करता, अलीकडे बहुतेक देशांत स्वत:च विषमतावादाचा पुरस्कार करणारी सरकारे सत्तेत आहेत. त्यामुळे शिक्षणावरील खर्च अन्यत्र वळवला जातो. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात एकात्मतेची संकल्पना अंतर्भूत असायला हवी. तरच सामाजिक अडथळे दूर करता येतील. हे आता सरकारवर सोपवून चालणार नाही. सत्यार्थी यांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हा या व्यवस्थेचा कणा आहे. त्यासाठी समाजाच्या सहभागाची तितकीच गरज आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आज प्रत्येक शाळेत सुरक्षित, अहिंसक, समावेशक आणि प्रभावी शैक्षणिक वातावरण असणे गरजेचे आहे. तरच दर्जेदार शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणास सुरुवात होईल. त्यासाठी सहानुभूतीपेक्षा सहानुभव महत्त्वाचा आहे.

● प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारेव्यंकटराव देशमुख महाविद्यालय, (लातूर)

व्यवस्थेची आणखी एक बळी

डॉक्टर महिलेने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली हे सिद्ध होईलच, पण त्यांच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर आत्महत्येची वेळ आली नसती. आपल्या देशात न्याय मिळवण्याची प्रक्रिया लांबलचक आहे. गुन्हा नोंदवून घेण्यापासूनच या संघर्षाला सुरुवात होते. पुढे अटक, आरोपनिश्चिती, सुनावण्या प्रत्येक टप्प्यावर प्रचंड वेळ जातो. निकाल लागल्यानंतरही अपील केले जाते आणि न्यायदानाची प्रक्रिया पुन्हा लांबते. तपास यंत्रणा सक्षम आणि प्रामाणिक असणे, राजकीय दबावाला न जुमानणाऱ्या असणे महत्त्वाचे आहे. न्याय मिळणारच, लवकरात लवकर मिळणार आणि कठोर शिक्षा होणार याची खात्री निर्माण झाली तर लोक गुन्हे करण्यास धजावणार नाहीत आणि ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या मनात न्याय मिळेल की नाही ही साशंकता उरणार नाही. ● श्यामसुंदर झळके, सिन्नर (नाशिक)