स्वातंत्र्याचा उदय आणि विकास होत असलेल्या विसाव्या शतकाच्या दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात महाराष्ट्रात अनेक प्रबोधनकार्य करणाऱ्या संस्था, ग्रंथालये, महाविद्यालये, विद्यापीठे सुरू झाली. तशाच अनेकानेक व्याख्यानमाला सुरू झाल्या. त्या अर्थाने समाज व धर्मसुधारणांच्या या गतीकाळास महाराष्ट्राचे आधुनिक प्रबोधन युग म्हणूनच संबोधायला हवे. सोलापुरात या काळात ‘नवयुग व्याख्यानमाला’ कार्यरत होती. या व्याख्यानमालेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे १७ फेब्रुवारी, १९४९ रोजी ‘नीती व राजनीती’ विषयावर भाषण झाले. त्याचा गोषवारा एका तत्कालीन दैनिकाच्या अंकात सापडतो.
त्यात तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, नीती आणि राजनीती शेजारी शेजारी उभ्या केल्या, तर कवीला उपमा सुचेल की, एक सती आहे, तर दुसरी वारांगना, असे दोहोंतील विषमभावामुळे लक्षात येते. नीती सतीसारखी पवित्र व दुर्लभ आहे, तर राजनीती सुलभ! चातुर्याने फसवण्याचे कसब ज्यास येते, त्यास राजकारणी म्हणतात. त्यास सत्यासत्यतेची तमा नसते, असे सर्वसामान्यांचे मत असते. राजकारणाची खरी व्याख्या मात्र निराळी आहे. राजसंस्था स्थापण्याचा, बदलण्याचा किंवा राखण्याचा योग्य प्रयत्न म्हणजे ‘राजकारण’ होय. राजनीती आणि इतर सर्व सामाजिक व्यवहार यांचे समुच्चयित मूल्य म्हणजे नीती. सगळे मोठे व्यवहार अंतिम ध्येयाला धरून घडले, तरच मानवी इतिहास हा संस्कृती विकासाचा मार्ग आक्रमू शकतो. जी कृती मानवी जीवनाला अंतिम मूल्य समजून घडते, ती नैतिक असते. मानव हेच जीवनाचे अंतिम श्रेय असते.
एका राष्ट्र, जमात, संस्कृतीविरुद्ध दुसऱ्याचे ठाकणे हे अनीतीच्या पायावर उभे असते. युद्ध त्याचीच परिणती असते. युद्ध अनीतीकडे नेते. साम्राज्य विस्ताराची कांक्षा आक्रमणाशिवाय अशक्य असते. आक्रमण अनीती असते. ते मानव संबंधाविरोधी राजकारण असते. भारतीय राजकारणाची बैठक साम्राज्य विस्ताराच्या पार्श्वभूमीतून विकसित झालेली आहे. त्यामुळे मूलत: ते अध:पतित आहे. वर्तमान युगात राजकीय आखाडे व पक्ष सामाजिक अनारोग्याची लक्षणे दर्शवितात.
भारतीय इतिहासात राजकारणाचे आदर्श आहेत. मौर्य साम्राज्याचा अमात्य कौटिल्याने राज्य शासनावर ग्रंथ लिहिला आहे. त्याचा मूळ हेतू उदात्त असला, तरी राज्यतंत्र टिकवण्याचे त्याने सांगितलेले उपाय उदात्त नाहीत. राजा जितेंद्रिय असला पाहिजे हे खरेच; पण तो अपवादाने आढळतो. राज्यसंस्थेचा नियंता तत्त्वज्ञ हवा, असे प्लेटो म्हणाला होता. लोक-सत्ता ही जीवनाच्या नैतिक पाया व प्रचीतीवर उभी हवी. तर मग नागरिक निरामय मनाची प्रचीती घेणार. परंतु, राजकारणी माणूस हे मानत नाही. महात्मा गांधींपुढे न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले होते म्हणून त्यांचे राजकारण नैतिक राहिले. राजकारण नैतिक असू शकते.
जगात पारंपरिक राजकारणात नैतिकतेचा अभाव दिसून येतो. राष्ट्र, संस्कृती, जमात इत्यादी अभिनिवेश मानवी समाजास विकृत बनवत आहेत. हिटलर, मुसोलिनी, हिडेकी टोजो हे आदर्श नव्हेत. कशासाठीही रक्त सांडणे मानवी मूल्यविरोधी होय, हे जोवर आपण समजून घेणार नाही, तोवर नीती, अनीती, आदर्श, अनादर्श यातील अंतर समजणार नाही. नीतिमत्ता जिवंत मानवी रक्ताचे सर्वश्रेष्ठ मूल्य ओळखण्यात भरलेली आहे. साधू, विरक्त, प्रौढ, गृहस्थ, विधवा, कुमारी, सौभाग्यवती यांनाच स्वस्थ, शांत, निर्वेध जीवनाची महती असते. भीरुता हे त्यांचे भूषण असते. त्यातच नीती सामावलेली असते.
नीतीची दोन उगमस्थाने आहेत. एक समाजस्वास्थ्याची आकांक्षा, तर दोन साहसी शौर्याची प्रेरणा. शौर्यभावना आंधळी बनणे घातक. कारण, त्या आंधळेपणात विवेकबुद्धी आणि विज्ञान लुप्त होते. मग मानवी शक्तीची अपारंपार उधळपट्टी अटळ होते.
सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वीचे हे तात्त्विक विवेचन आज वाचताना ते कालातीत असल्याची जाणीव होते. तर्कतीर्थ हे स्वातंत्र्यसैनिक. स्वातंत्र्याचे रूपांतर स्वराज्यात होत असतानाच्या काळातील पाच दशकांचे ते साक्षीदार नि भागीदार होते. त्यांना स्वातंत्र्याचे जितके मोल होते, त्यापेक्षा अधिक स्वराज्याचे. स्वराज्यात स्वातंत्र्य व नीती लाखमोलाची मानायला हवी, हेच या भाषणाचे खरे सूचन मानले पाहिजे.