केशकर्तन हा निव्वळ व्यवसाय नाही ती अनेकांचे व्यक्तिमत्त्व घडवणारी कला आहे, हे ज्या कुटुंबाने फार लवकर ओळखले त्या कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीचा दुवा नुकताच निखळला. इंदिरा गांधींपासून एपीजे अब्दुल कलामांपर्यंत अनेकांची जी छबी जनमानसात कोरली गेली, ती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हबीब अहमद यांचे नुकतेच निधन झाले. देशाच्या सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात नोंदवले जावे एवढे मूलभूत योगदान त्यांनी या कलेच्या विकासात दिले आहे.
हबीब यांना या कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून लाभला. मुझफ्फरनगरजवळच्या जलालाबाद शहरात २ ऑक्टोबर १९४० साली हबीब यांचा जन्म झाला. वडील नझीर अहमद हे ब्रिटिशांच्या काळात व्हाइसरॉयचे आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींचे खासगी केशकर्तनकार होते. आपल्या कलेचा वारसा मुलाच्या हाती सोपवताना त्याची दृष्टी अधिक विशाल व्हावी म्हणून त्यांनी हबीब यांना लंडनला पाठवले. तिथल्या प्रतिष्ठित मॉरिस स्कूलमध्ये केशकर्तनाचे धडे गिरवताना सुरुवातीला काहीशा गोंधळलेल्या या तरुणाने पुढे या कलेतील तंत्रे लीलया आत्मसात केली.
भारतात परतल्यानंतर सुरुवातीला ते दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करू लागले. ब्रिटिशांचे तंत्र व भारतीयांच्या आवडीनिवडी यांचा मिलाफ साधत त्यांनी स्वत:ची शैली विकसित केली आणि दिल्लीतील लोधी हॉटेलमध्ये १९८३ साली त्यांचे पहिले सलॉन सुरू झाले.
केस कापायचे ते केवळ नीटनेटके दिसण्यासाठी, ही तोवरची संकल्पना त्यांनी मोडीत काढली. व्यक्तिमत्त्वाची ओळख घडवण्यात केशरचना किती महत्त्वाची आहे, याची जाणीव त्यांनी भारतीयांना करून दिली. त्या काळातील अनेक सेलिब्रिटीज आणि राजकीय नेत्यांच्या चेहऱ्याला त्यांनी खास ओळख मिळवून दिली. इंदिरा गांधींची कानांपर्यंतचे केस आणि त्यात पांढऱ्या केसांचा पट्टा, ही पुढच्या अनेक पिढ्यांच्या मनात घट्ट बसलेली प्रतिमा हबीब यांच्याच कलेचा आविष्कार होती. आपल्या केशरचनेत बदल करण्यास अजिबात इच्छुक नसलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांनी लहान लहान बदल करण्याचे महत्त्व कसे पटवून दिले, याविषयीची सविस्तर कहाणी हबीब यांच्या ‘हबीब, द मॅन हू बिल्ट अॅन एम्पायर’ या चरित्रात वाचायला मिळते. त्यांनी महाराणी गायत्री देवी, सॅम माणेकशॉ, तेजी बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यासाठीही काम केले.
उत्तम केशरचनेचे महत्त्व हबीब यांनी उच्चभ्रूंच्या वर्तुळातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्या काळातील भारतीयांच्या केशकर्तनाविषयीच्या कल्पना, केसांना कात्री लावताना महिलांच्या मनातील धाकधूक, तरुणींबरोबर सलॉनमध्ये येऊन सूचना करून भांडावून सोडणाऱ्या आया, लोकांच्या डोक्यात बसलेले सौंदर्याचे ठोकताळे, ते मोडून काढताना करावा लागलेला खटाटोप असे अनेक अनुभव त्यांच्या चरित्रात त्यांनी नमूद केले आहेत. या सर्व नोंदी हा भारतीयांच्या बदलत गेलेल्या सौंदर्यकल्पनांचा आणि मानसिकतेचा दस्तावेजच आहेत.
हबीब उत्तम कलाकार तर होतेच, पण त्याबरोबरच ते महत्त्वाकांक्षी व्यावसायिक आणि उत्साही शिक्षकही होते. त्यांनी अनेक हरहुन्नरी केशकर्तनकार घडवले. सौंदर्य, आत्मविश्वास ही केवळ श्रीमंतांचीच जहागिरदारी नाही हे त्यांनी समाजावर बिंबवले. त्याच वेळी आपल्या कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांचा हाच वारसा आज त्यांचा मुलगा जावेद हबीब पुढे नेत आहे.
काही माणसे आपल्या क्षेत्रात एवढे काम करून ठेवतात की ते स्वत: एखादी संस्था भासू लागतात. हबीब अहमद त्यांपैकीच एक होते. अस्ताव्यस्त वाढलेल्या केशसंभारातून सराईतपणे फिरणारी त्यांची कात्री आता कायमची स्थिरावली असली, तरीही त्यांनी घडवलेल्या शेकडो केशकर्तनकारांच्या रूपाने आणि केसांच्या सौंदर्याविषयी अतिशय जागरूक आणि आग्रही असलेल्या आजच्या पिढीच्या रूपाने ते सदैव आपल्यात राहतील.