मानव हे निसर्गाचे अपत्य आहे. त्यामुळे निसर्गाचा नाश करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही, या धारणेतून सात दशके पर्यावरणसन्मुख जीवनशैली स्वीकारून अभ्यास, संशोधन आणि लेखन या त्रिसूत्रीतून जीवन व्यतीत करणाऱ्या डॉ. हेमा साने यांच्यासारखे निसर्गव्रती व्यक्तिमत्त्व विरळाच! तब्बल सात दशके त्यांच्या घरामध्ये विजेचा वापरच केला गेला नाही. वीज नाही, त्यामुळे दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजिरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारख्या आधुनिक उपकरणांचा वापर ही तर अतिदूरची गोष्ट. निसर्गाशी सन्मुख होऊन पक्षी आणि प्राण्यांसमवेत सहजीवन जगण्याचा आनंद लुटणारे आणि त्यासाठी प्रसंगी जननिंदेलाही सामोरे जाणारे, असे पुण्यातील एक अस्सल निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. हेमा साने.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यप्रकाशामुळे भरपूर उजेड मिळतो. मग त्याच वेळेचा उपयोग वाचन आणि लेखनासाठी का करू नये या भूमिकेतून पर्यावरण प्रत्यक्ष जगण्याच्या या असिधारा व्रताचा पुरेपूर आनंद हेमाताई साने यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत घेतला. ‘मी अशा पद्धतीने राहते हा माझ्या आनंदाचा भाग आहे. विज्ञानाचा पुरस्कार करीत असले, तरी मी माझी जीवनशैली बदलली नाही हा काय माझा दोष आहे का,’ असा प्रश्न त्या विचारीत.
भाऊ आजारी पडल्यानंतर हेमाताईंनी मोबाइलचा वापर केला होता. मोबाइल चार्ज करण्यासाठी त्या शेजारच्या पुस्तकांच्या दुकानात जात. एवढी मोठी व्यक्ती आपल्याकडे येते, हा त्या दुकानदाराच्या आनंदाचा भाग होता. पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून तुळशीबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शितळादेवीचा पार आहे. शहराच्या मध्य भागातील अगदी जुनाट आणि पडका वाटावा असा वाडा (१२१, बुधवार पेठ) हे हेमाताईंचे निवासस्थान होते. वाड्यामध्ये पाऊल टाकल्यानंतर एकाच कुटुंबातील चार मांजरे आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या अशा पक्ष्यांचा कानावर पडणारा सूर साठवत पुढे गेले, की त्यांचे घर यायचे. गरवारे महाविद्यालयात अध्यापनासाठी त्या सायकलवरच जात. पुढे त्यांनी लुना घेतली.
हेमाताईंनी सौर ऊर्जेवर चालणारे दिवेही वापरले. शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसिन बंद झाल्यामुळे त्यांनी गॅसदेखील घेतला. पण, गॅसचा वापर मर्यादित होता. वाड्यामध्ये असलेल्या विहिरीचे पाणी त्या शेंदून काढून वापरत. पिण्यासाठी महापालिकेच्या नळाची तोटी. दिवसभराच्या कामातून त्या वेळ काढून स्वयंपाक करायच्या; तोही मुख्यत: मांजरे उपाशी राहू नयेत म्हणून. अभ्यास, लेखन आणि वाचन या ध्यासापोटी त्या अविवाहित राहिल्या. २००० मध्ये निवृत्त झाल्यापासून त्यांना लेखन आणि वाचन करण्यासाठी पुरेसा मोकळा वेळ मिळाला. त्यामध्ये केवळ वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.
‘निसर्गाविषयी बोलणारे खूप असतात. लिहिणारेही अनेक; पण कृती करण्याची वेळ आली, की अनेक जण मागे हटतात. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. तरीही आपण निसर्गाला ओरबाडतच असतो. आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने माणसाची निसर्गावर मात करण्याची चढाओढ सुरू असली, तरी निसर्ग आपल्याला हिसका देतोच. त्यामुळे निसर्गाला वश करणे कठीण आहे,’ ही हेमाताईंची जीवनधारणा होती. त्याची नीट जाणीव ठेवणे, हीच त्यांना श्रद्धांजली!