‘बुकमार्क’मधून एरवी पुस्तकांची ओळख करून दिली जाते. पण या वेळी एका निबंधातून लेखकाची ओळख वाचकांनी करून घ्यावी, अशी अपेक्षा आहे. रशिया सोडून स्वत्र्झलडमध्ये राहावे लागलेले मिखाइल शाष्किन यांची अनेक पुस्तके आजवर रशियनमधून इंग्रजीत आली. ‘माय रशिया – वॉर ऑर पीस?’ हे सर्वात नवे पुस्तक मात्र जर्मन भाषेतून इंग्रजीत आले आहे. केवळ इंग्रजी आवृतीसाठी लिहिले गेलेले दोन लेख या पुस्तकाच्या अखेरीस आहेत. त्यापैकी एकाचे हे मराठीकरण! हा लेखक संवेदनशील आहे, साक्षीभावाने पाहणारा तरीही स्वत:चे मत मांडणारा आहे आणि संकल्पनांची उलटतपासणी करण्याची धमक दाखवणारा आहे..
वर्षांनुवर्षांच्या माझ्या जगप्रवासात मी कुठेही गेलो आणि मला भेटलेल्या एखाद्या टॅक्सी ड्रायव्हरला समजले की मी रशियन आहे, तर तो लगेच हसतो आणि ‘पुतिन!’ असे म्हणत त्याच्या हाताचा अंगठा उंचावून माझे अभिवादन करतो. टॅक्सीचालकांना पुतिन इतके का आवडतात हे मला कधीच समजले नाही. मला समजले ते एवढेच की आपण पाहतो त्या पुतिनमध्ये दोन पुतिन आहेत. मला माहीत असलेले पुतिन तुम्हाला आवडणार नाहीत आणि टॅक्सीचालकांनी त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीने त्यांचे- त्यांचे पुतिन तयार केले आहेत.
मला माहीत असलेल्या पुतिनबद्दल तुम्हाला तिरस्कार का वाटत असेल, ते उघडच आहे. एकेकाळी केजीबी एजंट असलेल्या पुतिन यांनी आपल्या राष्ट्रपती पदाच्या कारकीर्दीची सुरुवात स्वत:च्याच लोकांचा रक्तरंजित बळी देऊन केली. चेचन्याशी युद्धाचे निमित्त हवे म्हणून त्यांनी मॉस्कोतील लोकांना राहत्या घरातच गतप्राण केले. त्यानंतर, २४ फेब्रुवारी २०२२ च्या युक्रेन आक्रमणापर्यंत रशियात त्यांचीच एकहाती सत्ता आहे. पण या सगळय़ा काळात जगात मात्र दुसऱ्या पुतिन यांचे कौतुक केले जात होते. रशियात १९९० च्या दशकामध्ये असलेल्या गोंधळाच्या काळात पिळवटून गेलेल्या तिथल्या जनतेला आपला देश पुन्हा उभा राहिलेला बघायचा होता. त्यांना पोलादी ताकद असलेला नवीन नेता हवा होता. ‘आता सगळे अराजक संपले आहे, आता देश पुन्हा उठून उभा राहील आणि जगाचे नेतृत्व करेल’ असे आश्वासन पुतिन यांनी दिले.
सर्वशक्तिमान शासक आणि लोकांचा तारणकर्ता अशी त्यांची प्रतिमा तयार करण्यात आली आणि ती चांगलीच रुजली. पाश्चिमात्त्य देशांना धूळ चारल्याखेरीज रशियाचे चांगले दिवस येणार नाहीत आणि अशी धूळ चारायची तर चांगला नेताच हवा होता. क्रिमियाची ‘पुनस्र्थापना’ केल्याने कदाचित रशियातील रस्ते सुधारले नसतील, खेडय़ांत पाणीपुरवठा झाला नसेल पण यामुळे लोकांना ‘त्यांच्या’ पुतिनचा अभिमान बाळगण्याची संधी मिळाली.
‘आपले’ लोक!
‘रशियाकेंद्री जग’ म्हणजेच‘‘रुस्की मिर’ ही संकल्पना हेच पुतिनवादी विचारसरणीचा ब्रीदवाक्य आहे. मिर या शब्दाचा मूळ अर्थ रशियन खेडय़ांचा समुदाय असा होतो. आणि रशियन लोकसंख्येच्या मोठय़ा वर्गाची मानसिकता आजही मध्ययुगीन ग्रामीण समुदायाचीच आहे. ‘ते आपल्या लोकांना मारताहेत!’ असे कोणी ओरडले, तर ‘आपली माणसे’ कुठे आहेत याचा विचार न करता प्रत्येक रशियन माणूस लाठय़ा-काटय़ा घेऊन बाहेर धावत येईल. पुतिनवादी देखील गेल्या कित्येक वर्षांपासून ‘ते युक्रेनमध्ये आमच्या लोकांना मारहाण करत आहेत!’ असा प्रचार करत आहेत. पाश्चात्य देशांत राहणारे अनेक रशियन लोक पुतीन आणि त्यांनी सुरू केलेल्या युद्धाचे समर्थन का करतात, हे या विचित्र ग्रामीण मानसिकतेमधून स्पष्ट होते. त्यातून हेदेखील स्पष्ट होते की तुम्ही जर हाडाचे रशियन असाल तर शारिरीकरित्या झुरिच, लंडन किंवा युरोपात अन्यत्र कुठे येथे रहात असलात तरी मानसिकदृष्टय़ा तुम्ही रशियातच रहात असता! दिवंगत रशियन अभिनेते सर्गेई बोद्रोव एकदा एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘आपले (!)लोक कितीही चुकीचे वागत असले तरी युद्धकाळात त्यांच्यावर टीका करणे कठीण असते.’
आमच्या लोकांविरुद्ध दुष्ट पाश्चात्य देशांनी चालवलेल्या युद्धाचा सामना करणारे पुतिन हे चांगले आणि विजयी नेते आहेत, असे रशियन मानसिकतेला वाटते. आता जगाला त्यांच्याबद्दल काय वाटते ते बघू. रशियासंदर्भातील तज्ज्ञ म्हणून नाव कमावलेले पश्चिमेतील असंख्य व्यावसायिक पुतिन-वादी जसे मला आवडत नाहीत तसेच भ्रष्ट राजकारण्यांनाही आवडत नाहीत. आज ते जर्मनीचे कुलपती असतात, उद्या पुतीनचे चाकर असतात. पण परंतु ज्यांना पुतिनस्तुतीसाठी पैसे दिले जात नाहीत ते देखील पुतीनचे कौतुक का करतात हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली आहे, असे साम्राज्यवादी अमेरिकेला खडसावून सांगणारे पुतिन फक्त भारत किंवा लॅटिन अमेरिकेतील ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरचे नायक आहेत असे नाही. २००७ मध्ये म्यूनिचच्या म्यूनिच सिक्युरिटी काऊन्सिलमध्ये हे जग, एक अधिकार केंद्र, एक शक्ती केंद्र, निर्णय घेण्याचे एक केंद्र आहे, असे ध्रुवीय जग स्वीकारू शकत नाही, हे स्वत:च्या सार्वभौमत्वासाठी देखील अपायकारक आहे’, असे अमेरिकेला बजावणारे पुतिन इराणी आणि उत्तर कोरियन नेत्यांच्याही भावना व्यक्त करत होते. ‘शत्रूचा शत्रू, तो माझा मित्र’हे तत्त्व अशा पद्धतीने जगभरातील डाव्या व उजव्या विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणते.
पाश्चात्य लोकशाहीला पुतीन आवडण्याचीही बरीच कारणे आहेत. ख्रिश्चन धर्माबद्दलची, कुटुंबसंस्थेविषयीची त्यांची सकारात्मक भूमिका, समिलगी विवाह आणि ‘गे परेड’ विरुद्धच्या त्यांच्या भूमिका यांच्यामुळे हा माणूस नैतिक मूल्यांसाठी उभा आहे, असे त्यांना वाटते. त्यांच्या मते पुतिन यांनी खरोखरच आपल्यातील पौरुषाचे, ताकदीचे दर्शन घडवले आहे. ‘लिंगप्रतारणे’पासून जगाचे रक्षण केले आहे. पुरुषांना पुरुष असण्याची लाज का वाटावी? गोऱ्या लोकांना फक्त ते गोरे आहेत म्हणून वंशवादाच्या ‘मूळ पापाचे’ ओझे का वाटावे ?’ असे प्रश्न पुतिन यांनी बिनधास्तपणे विचारले. लोकशाही देशांतही, त्याच्या पौरुषयुक्त प्रतिमेच्या प्रदर्शनाने अनेक लोक प्रभावित झाले. ‘फ्रान्सच्या आजवर होऊन गेलेल्या सर्व राष्ट्राध्यक्षांपेक्षा पुतीन यांनी निसर्ग आणि प्राणी संवर्धनासाठी अधिक काम केले आहे,’ असे ब्रिजिट बार्दोट यांचे मत आहे. पुतिन यांनी आपल्या अर्धनग्न शरीराचे प्रदर्शन केले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. ‘पुतिन यांनी त्यांच्या विरोधकांची पोकळ नैतिकता आणि पाश्चिमात्य देशांच्या अध:पतनाचा पर्दाफाश केला आहे.’ म्हणून जगातल्या सर्व टॅक्सीचालकांना ते आवडतात, असे उजव्या विचारसरणीचे स्विस रॉजर कॉपेल यांचे म्हणणे आहे. असे दिसते की ‘रहस्यमय रशियन आत्मा’ असलेला हा गुप्तहेर पाश्चात्य इच्छांचे प्रतिबिंब दाखवणारा रशियन आरसा आहे.
युक्रेन-युद्धानंतरची पुतिन-प्रतिमा
पण हल्ली मात्र जगभरातील हे पुतीनचाहते निराश झाले आहेत. हा कुणी घोडय़ावर बसलेला वीर पुरुष किंवा मर्द नाही, तर फक्त एक फुगलेला खुजा माणूस आहे, असे त्यांना वाटते आहे. नाटोच्या पूर्वेकडील विस्तारासाठी खरेतर पुतीन यांच्याएवढे काम कोणत्याही पाश्चात्त्य राजकारण्याने केलेले नाही, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आता त्यात सामील होण्यासाठी आणखी देश उत्सुक असतील. प्राणी आणि पर्यावरण वाचवण्याऐवजी, पुतिन सध्या शहरांवर बॉम्बफेक करण्याचे, स्त्रियांवर बलात्कार करण्याचे, लहान मुलांना मारण्याचे आदेश देत आहेत. त्यामागे कोणतीही नैतिक, ख्रिश्चनिटीची किंवा कौटुंबिक मूल्ये नाहीत.
रशियन लोकमानसदेखील या सगळय़ामुळे खूप निराश आहे. ‘चूक कोणाची?’ आणि ‘आता पुढे काय?’ या रशियन लोकांच्या चिडून विचारलेल्या प्रश्नांमुळे तेथील अभिजनदेखील वैतागले आहेत. सामान्य लोकांसाठी, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे: ‘हा माणूस खरेच नेता आहे की की बनावट नेता आहे?’ फक्त जेतेपदच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. रशियनांच्या मते स्टॅलिन खरा नेता होता आणि अजूनही आदरणीय आहे. अफगाणिस्तानातील युद्ध आणि पाश्चिमात्य देशांविरुद्धचे शीतयुद्ध हे दोन्ही हरलेले गोर्बाचेव्ह म्हणजेच ‘गॉर्बी’ खरेखुरे नेते नव्हते.. त्यामुळेच आजही रशियन लोक त्यांचा फक्त तिरस्कार आणि तिरस्कार करतात!
क्रिमियाचा घास घेऊन, तो प्रांत रशियाला जोडून पुतिन यांनी त्यांचे अध्यक्षपद बळकट केले. लोकांच्या नजरेत ते खरे नेते ठरले. परंतु युक्रेनमध्ये विजय मिळू न शकल्याने त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.पुतिन यांच्या या नव-विरोधक ‘देशभक्तां’द्वारे चालवल्या जाणाऱ्या टेलिग्राम मेसेजिंग चॅनेलवर लाखो लोक देशद्रोह केल्याबद्दल चिडून आक्रोश करत आहेत आणि ‘काहीही झाले तरी विजय मिळाला पाहिजे’ अशी मागणी करत आहेत. युक्रेनमधून जितक्या शवपेटय़ा परत येतात, तितक्याच मोठय़ाने त्यांचा ओरडा सुरू होतो, की ‘ते आपल्या लोकांना मारत आहेत!’ खऱ्या नेत्याचा शोध आधीच सुरू झाला आहे.
वास्तविक हे सारेजण, आपल्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याबद्दल लोक पुतिनवर नाराज आहेत. एक दिवस पुतिन नसतील, पण त्यांचे चाहते आणि त्यांच्या अपेक्षा कायम राहतील. रशियामध्ये, पुतिन यांची जागा आणखी कुणी नवीन पुतिन घेईल. पुतिन यांच्यानंतर आणखी कुणीतरी येईल आणि आपल्या पौरुषाच्या प्रतिमेच्या आणि अमेरिकेच्या साम्राज्यवादावरच्या टीकेच्या जोरावर पाश्चिमात्य देशांमधल्या लोकांना दिपवून टाकेल. शेवटी, समिलगी विवाहांच्या, नाटोच्या आणि अमेरिकेच्या वर्चस्वाच्या विरोधात कोणी तरी उभे राहिले पाहिजेच की! राजकीय पातळीवरील पौरुषाच्या गरजेतून लोकांची कधीतरी मुक्तता होणार आहे की नाही, हा प्रश्न जोवर कायम आहे तोवर मिळतच राहातील, ‘नवे पुतिन’!
एक दिवस पुतिन नसतील, परंतु त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छा त्यांच्याबरोबर नाहीशा होणार नाहीत. जगाच्या रंगभूमीवर एका वेळी एकच नाही, तर अनेक व्यक्तिरेखा साकारणारा एक अभिनेता प्रत्येक बाबतीत अपयशी ठरला आहे. आता कोण येऊन ही भूमिका करतो, ते बघायचे.
