अतुल सुलाखे

सृष्टी म्हणजे देवाची आरती. पूजा यथासांग होऊन चुकली आहे, आपला नमस्कार तेवढा बाकी उरला आहे.

– विचारपोथी, विनोबा.

विनोबांना हयातीतच असंख्य विशेषणे मिळाली. तसेच त्यांचे अपार कौतुकही झाले. एकदा विनोबांनी गांधीजींचे पत्र वाचून फाडून टाकले. हेदृश्य कमलनयन बजाज पहात होते. लहानग्या कमलनयनने विनोबांना थेट विचारले की बापूंनी लिहिलेले पत्र तुम्ही का फाडले? विनोबा म्हणाले, ‘बापूंना माझ्याबद्दल जे वाटते तसे मला मात्र वाटत नाही. म्हणून पत्र वाचून फाडून टाकले’ प्रसंग इथे संपला. पण कमलनयन यांनी मोठय़ा कुतूहलाने त्या पत्राचे सर्व तुकडे एकत्र केले. पत्रात बापूंनी लिहिले होते ‘तुमसे ऊंची आत्मा मैंने आजतक नहीं देखी.’ एखाद्याने हे पत्र मिरवले असते, पण विनोबा त्या वृत्तीचे नव्हते.

हा मान त्यांना लहानपणापासून मिळत होता. मात्र त्यांच्यातील साधक कायमच जागा होता. विनोबांनी केलेले अध्ययन, भूदान आणि ग्रामदानाचे कार्य याविषयी खूप बोलले गेले आहे. तथापि विनोबांचे आश्रमीय व्रतांचे पालन त्या अनुषंगाने केलेले शरीर परिश्रम यांचा विचार केल्याखेरीज विनोबांचा खरा परिचय होणार नाही. सर्वोदयाचे भाष्यकार ही विनोबांची ओळख आश्रमीय व्रतांच्या भूमिकेशिवाय ध्यानात येणार नाही.

तत्त्वज्ञान म्हणून गीता, भक्ती डोळस असावी म्हणून संत साहित्याची निवड, एकसमन्वय साधता यावा यासाठी भारतीय उपखंडातील धर्मश्रद्धांचे जतन करणे आणि नवे रूप देणे, या धर्म आणि संस्कृतीला कालसुसंगत रूप देताना जगण्याचे प्रश्न हाती घेणे, असा विनोबांचा चौफेर आवाका होता.

वेद आणि उपनिषदांपासून अध्ययन सुरू करायचे आणि राजकीय विचारसरणीशी ते जुळवायचे अशी त्यांची कामगिरी होती. ते अनेक विषयातील जाणकार होते. अशी दमदार विचार पद्धती असताना त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान मात्र सामान्य माणसाच्या भाषेत मांडले. ते जीवनात कसे उतरवायचे त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले.

विनोबांकडे राजकीय भूमिका होती. तथापि ती एखाद्या पक्षाचा अथवा एखाद्या नेत्याचा कैवार घेणारी नव्हती. तरीही त्यांच्या राजकीय भूमिकांवर जोरदार टीका झाली. आजही होते. वर्तमान परिस्थितीत राजकारण वगळून सामाजिक कार्य करता येणार नाही असे ते म्हणत. सत्याग्रह ते लोकशक्तीचे जागरण असे त्यांच्या राजकीय भूमिकेचे रूप होते. व्रतस्थ राजकारणाचा पाया त्यांनी घातला. रोजच्या जगण्याच्या प्रश्नांवरही त्यांनी काम केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढे अचाट कार्य करून विनोबा शेवटपर्यंत अलिप्त साधक राहिले. झालेल्या सर्व आरोपांना उत्तर देणे सहज शक्य असताना त्यांनी तसे करणे नाकारले. केलेल्या आणि न केलेल्या चुकांसाठी उपेक्षेची शिक्षा त्यांनी भोगली. अर्थात विनोबांनी ही उपेक्षा शिक्षा म्हणून स्वीकारली नसती. सर्वाना समजून घेत ते शेवटापर्यंत वावरले. जनांचे अपराध पोटात घेतल्याशिवाय योगसाधना करता येत नाही. विनोबांचे जीवन असे होते.त्यांचे धाकटे भाऊ म्हणजे शिवाजीराव भावे यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्रात विनोबांचे समग्र आयुष्य ‘ब्रह्म तत्त्वाच्या आधारे मांडले आहे. हे ब्रह्मतत्त्व म्हणजेच साम्यतत्त्व.’  पूर्वी ब्रह्मयोग होता. काळ बदलला आणि त्याचा साम्ययोग झाला.