अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्याग्रह मार्गाचा शोध घेताना विनोबांनी परंपरेचा मागोवा घेतला. ते प्रथम सत्याग्रही होते म्हणजे ते गांधीजींच्या कसोटीला पुरेपूर उतरले होते. परंपरा, आचरण, प्रयोगशीलता आणि अपार साहस इतक्या सगळय़ा वैशिष्टय़ांचा विनोबांच्या सत्याग्रह चिंतनाला आधार होता.

विनोबांच्या सत्याग्रह चिंतनानुसार आपल्या सत्याला चिकटून राहण्याची आणि प्रतिपक्षाचे सत्य ग्रहण करण्याची तयारी असणे ही जी शक्ती आहे ती मनाच्या वर उठल्याशिवाय शक्य नाही. मनाच्या वर जाण्याची जी शक्ती आहे ती श्रमण परंपरेचा जसा विशेष आहे तशीच ती अरिवदांचीही शिकवण आहे. त्याआधी ऋग्वेदानेही सत्याग्रहाला नवा आयाम दिला आहे. ‘युद्ध’ म्हणजे काय तर ‘मम सत्यम्’ भास्कराचार्यानी आणखी विस्ताराने युद्ध शब्दाची उकल केल्याचे दिसते. ‘मम सत्यम् युद्धम्’. थोडक्यात ‘माझे सत्य’ म्हणजेच युद्ध. विरोधकांकडे सत्याचा लेशही नाही, अशी भूमिका असेल तर मग युद्धाशिवाय दुसरा मार्ग शिल्लक उरत नाही. भले ते युद्ध नि:शस्त्र असले तरी त्याला सत्याग्रह म्हणता येणार नाही.

श्रमण परंपरेने ही भूमिका सातत्याने मांडल्याचे दिसते. तिचे दोन विशेष आहेत. पहिला आहे ‘स्यादवाद’. विनोबांनी त्याला सूत्ररूप दिले ‘अपि सिद्धांत:’ हेही योग्य आणि तेही योग्य. दुसरा आहे ‘अनेकांतवाद’. विनोबांच्या मते ही खरी सत्याग्रही वृत्ती म्हणता येते. लोकशाहीच्या रक्षणासाठी हे दोन्ही विचार अतीव महत्त्वाचे आहेत. थोडक्यात कोणत्याही गोष्टीविषयी आग्रह धरायचा नाही. सर्वाशी मेळ घालायचा आणि प्रत्येकाच्या पैलूला महत्त्व द्यायचे.

ही भूमिका व्यवहार्य नाही. ती प्रत्येक सत्याग्रहाला लागू करता येणार नाही, अशी कुणाची समजूत असेल तर तिचा विचार होऊ शकतो. तथापि गांधीजींच्या नंतरच्या बहुतांश सत्याग्रहांमध्ये प्रेम नव्हते. त्यात द्वेष करत लढा देण्याची वृत्ती होती, पण भाषा मात्र ‘सत्याग्रहा’ची होती. ही दंभाची परमावधी म्हणावी लागते. यापेक्षा हातात शस्त्र घेऊन लढा हा गांधी, विनोबांचा सल्ला जास्त चांगला म्हणावा लागतो.

कोणत्याही काळातील सशस्त्र लढा  व्यावहारिक नसतो. आधुनिक काळात तर तो जवळपास अशक्य आहे. आजचा सशस्त्र संघर्ष हा युद्धाचा भाग नसून व्यापाराचा भाग आहे. कोणताही पक्ष पूर्णपणे जिंकणे अथवा पराभूत होणे ही गोष्ट आजच्या युद्धनीतीला झेपणारी नाही. माणसे मारावीत, भूप्रदेश बेचिराख करावा आणि पुन्हा तिथे विकास (?) करावा असा हा व्यापाराचा खेळ आहे.

जिथे युद्ध शक्य नाही तिथे युद्धज्वर पोचवणे आणि अंतर्गत अशांतता निर्माण करणे हाही युद्ध व्यापाराचाच भाग आहे. इतिहासात केव्हाही निव्वळ दंडशक्तीने लोकांना एकत्र ठेवले आहे असे दिसत नाही. धर्म म्हणजे मनाची शांती आणि विधायकता यातून मानवी मनाला आधार मिळतो. गांधी परिवारात या पातळीवर सर्वाचे नेते होते. साहजिकच त्यांचे सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान सूक्ष्म होत जाणारे आणि म्हणूनच अत्यंत व्यवहारी असे होते. त्यांचे हे चिंतन गांधीजींच्या देखरेखीत आणि आधुनिक भारताच्या राजकीय पटलावर झाले हे विसरून चालणार नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog satyagrahi contemplation vinoba tradition gandhiji ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST