अतुल सुलाखे

संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह

शरीरें चि करी कर्म दोष त्यास न लागतो

गीताई – ४-२१.

महात्मा गांधींनी स्वातंत्र्योत्तर भारताला उन्नतीचे दोन मार्ग दाखवले. चरखा आणि कांचनमुक्ती. हा कांचनमुक्ती शब्द अध्यात्म मार्गात सतत कानी पडतो. त्याला कामिनीचीही जोड असते. एकनाथ महाराजांच्या ‘चिरंजीवपदा’पासून रामकृष्ण परमहंसांच्या ‘वचनामृता’पर्यंत कामिनी कांचनाचा त्याग ही परिभाषा सतत आढळते. याचा अर्थ एवढाच की साधना मार्गात प्रगती करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने विषयासक्ती आणि परिग्रह यांचा त्याग करावा. ‘आश्रम व्रतां’मध्ये कामिनी या शब्दाचा उल्लेख नाही. तिथे ब्रह्मचर्य येते आणि या ब्रह्मचर्यपालनात स्त्रियाही सहभागी होऊ शकतात.

ब्रह्मचर्याची कल्पना आपल्या परंपरेत अतिशय विस्तृत रूपात दिसते. या अनुषंगाने विषयासक्ती सोडावी असा नियम आढळतो. आता मुद्दा कांचनाचा आहे. व्यक्तीच्या पातळीवर पैशाला हातही न लावणे कदाचित शक्य आहे. परंतु सामूहिक पातळीवर पैसा नाकारायचा कसा आणि पैसा नाकारून संपत्ती मिळवणे कसे साधायचे? भारतात ही वाट शेतीमधून जाते. पैसा नाकारत शेती करायची हा प्रयोग विनोबांनी सुरू केला. या प्रयोगाला ‘ऋषी शेती’ हे नाव त्यांनी दिले.

ही संकल्पना भारतासाठी नवी नाही. प्राचीन काळातील ऋषी कोणत्याही बाह्य गोष्टींच्या मदतीशिवाय शेती करत होते. दरवर्षी ‘ऋषी पंचमी’चे व्रत करून आपण अशा प्रकारच्या शेतीचेच एका अर्थी स्मरण करतो. विनोबा एकाच वेळी भरपूर पीक देणारी आणि बाह्य साधने नाकारणारी शेती करू पहात होते. या शेतीला स्वत:चे तत्त्वज्ञानही होते.

सर्वोदय संमेलनानंतर म्हणजे १९५१ मध्ये विनोबांनी अशा प्रकारच्या शेतीची कल्पना आपल्या सहकाऱ्यांना सुचवली. स्वत: विनोबांच्या मनात पैशांविषयी तीव्र तिटकारा निर्माण झाला होता. इतका की धनमुक्तीसाठी आत्मबलिदान करावे इथपर्यंत ते गेले होते. रुपया ही लफंगी वस्तू या देशाने नाकारायला हवी असे त्यांचे ठाम मत होते. असे घडले नाही तर समाज म्हणून आपण शाश्वत संघर्षांत सापडू अशी त्यांना साधार भीती होती. श्रमजीवनाचा स्वीकार आणि कांचनमुक्ती या दोन हेतूंनी १ जानेवारी १९५१ रोजी ‘पवनार आश्रमात’ ऋषी शेतीला आरंभ झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा शेतीमागे विनोबांचा अर्थशास्त्रीय विचारही होता. या संपूर्ण प्रयोगाचा छोटेखानी, परंतु रेखीव आढावा घेणारी रामभाऊ म्हसकर यांची एक पुस्तिका उपलब्ध आहे. सुरुवातीला या प्रयोगाची चेष्टा झाली. त्याबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या. तेव्हाच याबाबत खात्री नव्हती आणि आज अशी शेती करता येते यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. तथापि जपानमधे हा प्रयोग झाल्याचे दिसते. आज डॉ. श्रुती गोडबोले यांच्यासारख्या शास्त्रज्ञ इस्राएलमधे विनोबांचा कृषिविचार पोहोचवत आहेत. अपरिग्रह, शरीरश्रम, शेतीच्या माध्यमातून शिक्षण, बेकारीचे अंशत: निवारण आदी पैलू असणारा हा प्रयोग १९५१ ते १९५३ या काळात झाला. तो थांबला. कारण त्या सुमारास भूदान यज्ञाचा आरंभ झाला होता. जमिनीसारखे संसाधन आणि शेतीची अनोखी पद्धत हे विनोबांचे फार मोठे योगदान आहे. प्रेम आणि परिश्रम यांची प्रतिष्ठा वाढवणारा हा प्रयोग आजच्या संदर्भात फार अमूल्य आहे. jayjagat24 @gmail.com