अतुल सुलाखे

ऋषी शेतीचा प्रयोग कांचन मुक्तीचा होता तर सर्वोदयासमोर समाजातील सर्व घटकांच्या समग्र उन्नतीचे आव्हान होते. फाळणी, त्यानंतर पाकिस्तान विरुद्धचे युद्ध, गांधीजींची हत्या, देशभरात निर्माण झालेला धार्मिक आणि जातीय तणाव, राज्यांचे प्रश्न आदी समस्या तीव्र झाल्या होता. या सर्व संकटांचा हिंसा हा समान पाया होता.

वस्तुत: भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा चांगला अनुभव हवा असताना त्यांना रक्तपाताला सामोरे जावे लागत होते. राजकीय आणि आर्थिक आघाडय़ांवर नेहरू आणि पटेल झुंजत होते. गरज होती ती नैतिक संस्कारांची. इथे नेहरूंचा द्रष्टेपणा कामी आला. या कामासाठी त्यांनी दोन सत्पुरुषांना विनंती केली. विदेशात भारताचा शांतिसंदेश पोहोचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनच्या स्वामी रंगनाथानंदांची निवड केली. नेहरूंच्या इच्छेनुसार विनोबा निर्वासितांना धीर देत होते. अहिंसेचा विचार बिंबवत होते. नेमका त्याच वेळी देशांतर्गत जातीय हिंसाचार बळावला. बिकानेर येथील उच्चवर्णीयांनी दलितांना मंदिर प्रवेश नाकारला. शहरात अशांतता पसरली. दलित समाजावरील अत्याचाराविरोधात उभे राहणे, ही भावे घराण्याची किमान दोन पिढय़ांची परंपरा होती.

परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन विनोबा बिकानेरमध्ये दाखल झाले. त्यांनी तिथल्या सनातनी गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही ते बधत नाहीत हे पाहून त्यांनी क्रांतिकारी बोल सुनावले. ‘जी मूर्ती सर्वाना दर्शनासाठी उपलब्ध नसते, ती मूर्तिशास्त्रानुसार मूर्तीच नाही.’ आजही मंदिर प्रवेशाचा प्रश्न आहे, तथापि समाजाची कानउघाडणी करणारा आवाज मात्र नाही. विनोबांची बुद्धी आणि कळकळ सनातनी वर्गापर्यंत पोहोचली आणि अवघ्या चार दिवसांत शहरात शांततेचे वातावरण निर्माण झाले.

बिकानेरहून विनोबा ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याकडे म्हणजे अजमेरकडे रवाना झाले. विनोबा कुराणाचे उपासक आणि इस्लामचे चाहते होते. त्यांचा कुराणाचा व्यासंग आणि त्यांचे कुराणसार हे पुस्तक अत्यंत सखोल आहे. त्यांच्या व्यासंगाला प्रत्यक्ष मौलाना अबुल कलाम आझादांनी दाद दिली होती. या दग्र्यावर विनोबांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. त्या प्रार्थनेने विनोबा भावविवश झाले आणि त्यांच्या डोळय़ांतून अश्रुधारा वाहू लागल्या. विनोबांचा अजमेरमध्ये आठवडाभर मुक्काम होता.

या मुक्कामात विनोबांनी प्रवचने दिली. प्रवचन, नमाज, रामधून असा कार्यक्रम असे. या अल्प वास्तव्यात विनोबांनी दोन मोठे संदेश दिले. पहिला सलोख्याचा, तर दुसरा समानतेचा होता.

विनोबा म्हणाले, ‘मी खुदाई खिदमतगार आहे. भारत हा सर्वधर्मीयांचा देश आहे. या मातीत आपला जन्म झाला आहे व शेवटी याच मातीशी एकरूप व्हायचे आहे. तेव्हा सगळय़ांनी प्रेमाने आणि भावाप्रमाणे राहावे.’ विनोबा उच्चासनावर बसून इस्लामचा गूढ आणि श्रेष्ठ संदेश मुस्लीम भावंडांना सांगत होते आणि प्रवचनानंतर श्रोते त्यांच्या हाताचे चुंबन घेत होते. एकनाथ महाराजांच्या ‘हिंद-तुरुक’ संवादाचे हे आधुनिक आणि मनोज्ञ रूप होते.

या प्रवचनांच्या निमित्ताने मुस्लीम स्त्रियांसाठीची पडदा प्रथा दूर केली पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. दलित असोत की स्त्रिया त्यांच्यावरचा अन्याय विनोबांनी कधीही सहन केला नाही.

विनोबांचे हृदय चंद्राप्रमाणे शीतल आणि वैराग्य सूर्याप्रमाणे धगधगते होते. चंद्र गर्भाचे रक्षण करतो आणि सूर्य आपली सेवा करतो. विनोबांमधील हा समन्वय जनतेला जाणवला आणि त्यांचा उपदेश त्यांनी शिरोधार्य मानला.

jayjagat24@gmail.com