अतुल सुलाखे

भूदान म्हणजे जमिनीचे हस्तांतर एवढाच अर्थ घेतला तर तो त्या परिवर्तनाच्या मूलगामी प्रयोगावर मोठा अन्याय होईल. अर्थात जमीनवाटपाचा प्रश्न विनोबांनी त्यांच्या पातळीवर तडीस नेला. त्याचा वेगळा विचार करायचा आहे.

भूदानाच्या जोडीला विनोबांनी आणखी चार पातळय़ांवर परिवर्तनाचा प्रयत्न केला. गीतेच्या परिभाषेत सांगायचे तर हा ‘नित्य महायज्ञ’ होता. विनोबांनी त्याचा आरंभ केला. विनोबा भूदानाला ‘प्रजासूय यज्ञ’ म्हणत. राजसूय यज्ञाचे हे लोकशाहीतील रूप होते. राजसूय यज्ञात चारही वर्णाचे प्रतिनिधी सहभागी होत, असे सांगितले जाते. राजाला प्रजेकडून संपूर्ण मान्यता मिळावी हा त्याचा हेतू होता. या प्रजासूय यज्ञातही विनोबांना पाच प्रकारची परिवर्तने अपेक्षित होती. जमीन विभागणी, आध्यात्मिक, हृदय, जीवन आणि समाज या पातळय़ांवरचे परिवर्तन. संपूर्ण साम्ययोग या परिवर्तन प्रक्रियेत सामावला आहे. जे गीताईमध्ये तेच भूदानामध्ये. एका दर्शनाचे दोन भाग.

दान, भक्ती, प्रार्थना, संत परंपरेचा सतत आधार, श्रुती-स्मृतीनुसार आचरण, वर्णाश्रम व्यवस्थेचा आग्रह, विनोबांच्या या गोष्टी समाजपरिवर्तनाच्या अन्य प्रवाहांना चांगल्याच खटकतात. विनोबा पाखंडी आणि जुनाट असते तर हे आक्षेप योग्य आहेत असेच म्हणावे लागले असते. तथापि विनोबांनी हे पंचायतन परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालत समाजासमोर ठेवले. ‘सनातन म्हणजे नित्यनूतन’ इतक्या थेटपणे त्यांनी परंपरेला दिशा दाखवली.

पंचायतनाची मूळ संकल्पना आद्य शंकराचार्याची आहे. उपासना पद्धतीला क्रांतिकारक दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. केवळ पाचच देवतांची उपासना करा आणि गीता आणि विष्णुसहस्रनामाचे गायन करा ही परंपरा त्यांनी समाजासमोर ठेवली. विनोबांनी आचार्याचा आदेश शिरोधार्य मानला आणि परिवर्तनाचे पंचायतन समाजासमोर ठेवले. विनोबा सांगतात त्या परंपरेशी आम्हाला कोणतेही देणे-घेणे नाही. मुळात ती आमची परंपराच नाही. या भूमिकेतून होणाऱ्या परिवर्तनामध्ये सर्वसमावेशकता नसते. तरीही ही भूमिका योग्य आहे असे गृहीत धरून विनोबांनी केलेल्या परिवर्तनाच्या प्रयत्नांना जनतेने कसा प्रतिसाद दिला हे पाहणे महत्त्वाचे आहे.

विनोबांचे पंचायतनही लोकमान्य झाले. विनोबांनी जी परंपरेची पुनर्स्थापना केली ती लोकमान्य आणि सरकारमान्यही झाली. स्वातंत्र्योत्तर भारतात हिंसाचार प्रचलित होण्याऐवजी अहिंसेचा प्रसार झाला. आज आपण जल, जंगल, जमीन, जात, जन आणि जमीन आणि पर्यायी विकासनीती असे म्हणतो त्या सर्व बाजू एका भूदान यज्ञामध्ये सामावल्याचे दिसते. याखेरीज प्रत्येक प्रदेशातील साधु-संतांच्या शिकवणीची त्यांनी नव्या संदर्भात मांडणी केली. ही सारी परंपरा त्यांनी मराठी संतांशी जोडून घेतली. संत एकनाथांच्या भागवताआधारे त्यांनी ओडिशाच्या संत जगन्नाथदासांच्या भागवताचे अध्ययन केले. अशी इतरही उदाहरणे आहेत. आद्य शंकराचार्याचे ‘दानं संविभाग:’ हे सूत्र त्यांनी भूदानाला लावले. भिक्षू आणि श्रमण परंपरेतील या तत्त्वाशी अनुकूल अशी मांडणीही त्यांनी सामावून घेतली. विनोबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुमारे चार दशकांच्या पदयात्रेत या देशाची परंपरा पुनरुज्जीवित झाली. कोणत्याही काळात हे संचित विसरता येणार नाही इतके ते महत्त्वाचे आहे.

jayjagat24@gmail.com