पत्रकारितेचे क्षेत्र नवनव्या आव्हानांना तोंड देत असतानाच संकर्षण ठाकूर यांच्यासारख्या अभ्यासू, जाणकार, संवेदनशील पत्रकाराचे वयाच्या अवघ्या ६३ व्या वर्षी जाणे या क्षेत्राचे नुकसान करणारे आहे. बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याचा चालताबोलता समकालीन इतिहासच असलेले संकर्षण बाबू काश्मीरसारख्या संघर्षग्रस्त भागातील प्रश्न लावून धरण्यासाठीही ओळखले जात. त्यांचा जन्म १९६२ साली पटना येथे झाला. वडील जनार्दन ठाकूर हेही पत्रकार होते. संकर्षण यांनी १९८४ साली ‘संडे’ या मासिकातून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यांनी प्रामुख्याने राजकीय पत्रकारिता केली. विशेषत: बिहार आणि काश्मीर प्रश्न नीट समजून घेऊन, त्यावर तसेच इतर सामाजिक प्रश्नांवर त्यांनी केलेले वार्तांकन प्रभावी होते. ‘द टेलीग्राफ’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ व ‘तहलका’ यांसारख्या वृत्तसंस्थांत त्यांनी बातमीदारी केली.
‘द मेकिंग ऑफ लालू यादव अॅण्ड अनमेकिंग ऑफ बिहार’ हे लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिले. लालू यांचा उदय, त्यांचे दलित-पिछड़ा राजकारण, त्यांचा संघर्ष, त्यांच्यापुढची राजकीय आव्हाने व भ्रष्टाचार तसेच बिहारमधील सामाजिक-आर्थिक विषमता यांची चर्चा या पुस्तकात आहे. ‘सिंगल मॅन द लाइफ अॅण्ड टाइम्स ऑफ नितीश कुमार’ हे त्यांचे नीतीश कुमार यांच्यावरील पुस्तक गाजले. नितीश कुमार यांची बिहारसंदर्भातील धोरणे, भ्रष्टाचारविरोधी भूमिका, राजकारण, सामाजिक बदल व विकासाची कामं; विरोधकांबरोबरचा संघर्ष या पुस्तकातून वाचायला मिळतो. ‘द ब्रदर्स बिहारी’ हे लालू यादव आणि नितीश कुमार यांच्यावर आधारित त्यांचे पुस्तक गाजले. लालू आणि नितीश यांची तुलना, त्यांच्यातील राजकीय द्वंद्व, नेतृत्व, धोरणात्मक फरक या सगळ्याची मांडणी या पुस्तकात आहे.
उत्कृष्ट राजकीय पत्रकारितेसाठी त्यांना २००१ मध्ये प्रेम भाटिया पुरस्कार तसेच काश्मीरवरील लिखाणासाठी अप्पन मेनन शिष्यवृत्ती मिळाली होती. संबंधित घटनेचा तपशीलवार अभ्यास करणे, राजकीय आणि सामाजिक घटनांच्या खोलात जाऊन सत्य समोर आणणे हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. बिहारच्या राजकारणापासून ते काश्मीरपर्यंतचे समजातले गुंतागुंतीचे प्रश्न त्यांना समजून घ्यायचे असत. त्यांची ही आच त्यांच्या कामातूनही दिसे. तपशीलवार वर्णने आणि संवेदनशीलता ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती. राजकीय घटनांमागचा एतिहासिक, सामाजिक संदर्भ मांडण्यावर त्यांचा भर असे. आपल्याकडे असलेल्या माहितीचे विश्लेषण करून ती समोरच्याला समजावून सांगणे ही त्यांची हातोटी होती. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द केले गेल्यानंतर तेथील लोकांची मानसिकता त्यांनी आपल्या वार्तांकनांमधून खूप प्रभावीपणे मांडली होती. आपला आवाज दाबला गेला या जाणिवेतून काश्मीरमधल्या लोकांची झालेली घुसमट त्यांनी मांडली. ते जणू काश्मिरी लोकांचा आवाज बनले. बिहार, काश्मीर, श्रीलंका, पाकिस्तान, कारगिल युद्ध या सगळ्या संघर्षरत क्षेत्रातून त्यांनी अतिशय संवेदनशील वार्तांकन केले होते. इंदिरा गांधींची हत्या, त्यानंतरच्या शीख दंगली यांचे त्यांनी केलेल्या वार्तांकनाचे आजही उदाहरण दिले जाते.
बिहार हे त्यांचे पहिले प्रेम होते. बिहारमधला साधेपणा, त्या मातीतील अस्सल भारतीयत्व हे त्यांच्या मनाला आनंद देत असे आणि तिथले दारिद्र्य, मागासलेपण यामुळे ते अस्वस्थ होत. त्यांच्याबद्दल त्यांची मित्रमंडळी असे म्हणत की संकर्षण बाबू जन्माने बिहारी, नागरिकत्वाने भारतीय आणि दृष्टिकोनाने जागतिक आहेत. बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्यांचे असे जाणे बिहारी मतदाराला पोरके करणारे आहे.