Be not afraid of greatness! – Shakespeare

१४९४ मध्ये पहिला फ्रॉन्स्वॉचा जन्म झाला तेव्हा फ्रान्स मध्ययुगीन गोथिक काळातच जगत होता. रनेसॉन्सच्या प्रक्रियेमुळे १६व्या शतकाच्या पूर्वार्धात फ्रान्सचा कायापालट होऊन उत्साहाचं आणि आशावादाचं वातावरण निर्माण झालं. शतकांच्या खिन्न मानसिकतेतून बाहेर पडून रनेसॉन्सच्या माणसाला स्वत:च्या सुप्त क्षमतांची अनुभूती होत होती. स्व-भान आणि स्वाभिमान अहंकाराचं अर्थात पापाचं लक्षण मानण्याऐवजी, शेक्सपियरच्या शब्दांत सांगायचं झालं तर ‘ Be not afraid of greatness.’ असं रनेसॉन्सचा माणूस म्हणू शकत होता. सुखाच्या चाव्या मनुष्याच्याच हातात आहेत, हा आशावादी आणि आश्वासक मानवतावाद राब्लेच्या धाडसी साहित्यकृतींमध्ये दिसून येतो. पहिला फ्रॉन्स्वॉचा मृत्यू १५४७ मध्ये झाला, तोवर फ्रान्सनं रनेसॉन्सचा परमोच्च बिंदू गाठला होता. पहिला फ्रॉन्स्वॉचा वारसदार दुसऱ्या हेन्रीनंसुद्धा धार्मिक क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांत रनेसॉन्सचा वारसा चालू ठेवला.

मात्र १५५९ मध्ये हेन्रीच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या तीन मुलांकडून राजेपद पेलवलं गेलं नाही. त्यांच्या जागी त्यांची आई कॅथरीन द मेदिची राज्यकारभार पाहात होती. फ्रान्समधल्या राजकीय अस्थिरतेमुळे आशावादी मानवतावादाची नौका धर्मयुद्धांच्या हिमनगावर आदळून संकटग्रस्त झाली. बहुसंख्याक कॅथोलिक आणि अल्पसंख्याक प्रोटेस्टंट यांच्यात धर्मयुद्धांना तोंड फुटलं. जवळपास ५० वर्षं फ्रेंच समाज असहिष्णुता, अराजकता आणि यादवीच्या आगीत होरपळून निघाला. जणू काही नव्या जगाच्या शोधात निघालेल्या खलाशानं निरर्थक ठरलेला मध्ययुगीन किनारा मागे सोडावा; पण आधुनिकतेचा किनारा गाठण्याआधीच त्याची नौका महासागरात भरकटून जावी, तशा या स्थितीतच फ्रेंच रनेसॉन्सचा शेवट झाला. पण १७व्या शतकात येऊ घातलेल्या वैज्ञानिक आधुनिकतेला अद्याप अवकाश होता. या मध्यंतरीच्या काळाचा उल्लेख बारोक (Baroque) या संकल्पनेनं केला जातो.

फ्रेंच रनेसॉन्सचा शेवट आणि बारोक जाणिवांचा उदय ज्या ऐतिहासिक परिस्थितीमुळे झाला, ती समजून न घेता अमूर्त चर्चा करणं हिमनगाच्या दृश्य भागाला हिमनग समजण्यासारखं होईल. त्यामुळे, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुधारणावादी प्रोटेस्टंटांच्या ‘रिफॉर्मेशन’ विरोधात परंपरावादी कॅथोलिकांची ‘काउंटर- रिफॉर्मेशन’ मोहीम कशी सुरू झाली आणि फ्रेंच रनेसॉन्सचा शेवट होऊन बारोक दृष्टिकोनाचा उदय कशा प्रकारे झाला, हे या लेखात पाहू.

फ्रान्समधली प्रोटेस्टंट चळवळ

रनेसॉन्सचं अपत्य ठरलेल्या प्रोटेस्टंट चळवळीच्या बाबतीत १६व्या शतकाच्या सुरुवातीला पहिला फ्रॉन्स्वॉची भूमिका संदिग्ध होती. मानवतावादी विचारांच्या प्रभावापायी त्यानं विचारवंतांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या. त्यानं इतर सगळ्या क्षेत्रांत रनेसॉन्सच्या प्रक्रियेला प्राधान्य दिलं. मात्र स्वतंत्र प्रोटेस्टंट चर्चची स्थापना करायला त्यानं अनुमती दिली नाही. त्याला रोमन कॅथोलिक चर्चला तडा जाऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे १६व्या शतकाच्या पूर्वार्धात फ्रेंच प्रोटेस्टंट भूमिगत राहून काम करत होते. प्रोटेस्टंटांनी १५३४ सालात फ्रान्सभर ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे फ्रॉन्स्वॉच्या खोलीबाहेर गुप्तपणे कॅथोलिक चर्चच्या विरोधात भित्तीपत्रकं लावली, तेव्हा मात्र फ्रॉन्स्वॉ सुधारणावाद्यांच्या विरोधात पावलं उचलू लागला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा हेन्रीनं प्रोटेस्टंटांविषयी कधी तडजोडीची, तर कधी ताठर भूमिका घेतली.

मात्र दुसऱ्या हेन्रीच्या मृत्यूनंतर सत्ता त्याची पत्नी कॅथरीन द मेदिचीच्या हातात जाते. ती साक्षात पोपची पुतणी. तिच्या नेतृत्वात प्रोटेस्टंटांचा बीमोड करण्याची मोहीम आखली जाते. फ्रान्सभर १५६० पासून लढाया, कत्तली, दंगली, झटापटींचा रक्तरंजित अध्याय सुरू होतो. त्याही वेळी सुमारे २० टक्के फ्रान्स प्रोटेस्टंटांच्या ताब्यात होता, त्यांना इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि इतर प्रोटेस्टंट राज्यांकडून कुमक मिळत होती. फ्रान्समधल्या धर्मयुद्धांना तत्कालीन भू-राजकीय परिमाणही होतं. इटली, स्पेन, पोर्तुगालसारख्या दाक्षिणात्य लॅटिनाइज्ड राज्यांत प्रोटेस्टंट चळवळ मूळ धरू शकली नाही. पण उत्तरेत जर्मन भाषक प्रांत, स्कॅन्डिनेव्हिया, इंग्लंड आदी राज्यांमध्ये १६व्या शतकाच्या सुरुवातीलाच प्रोटेस्टंटांनी पाय रोवल्यानं कॅथलिक चर्चला माघार घ्यावी लागली. परंपरावादी दक्षिण आणि सुधारणावादी उत्तर यांच्या कात्रीत सापडलेल्या फ्रान्सनं, राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी कधी प्रोटेस्टंट तर कॅथोलिक युरोपशी आघाडी केली.

प्रोटेस्टंट चळवळीला फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी लाभत असले तरी उत्तर युरोपपेक्षा फ्रेंच समाजाचं लॅटिनायजेशन खोलवर झाल्यामुळे फ्रान्सचा उल्लेख रोमन कॅथोलिक चर्चची ‘थोरली मुलगी’ म्हणून केला जाई. भू-राजकीय समीकरणात ही ‘थोरली मुलगी’ हाताबाहेर जाऊ नये यासाठी रोम आणि स्पेननं कॅथरीन द मेदिचीला हाताशी धरून काऊन्टर रिफॉर्मची रणनीती आखली. मात्र तोवर अनेक बलाढ्य फ्रेंच राजघराण्यांनी कॅथोलिक चर्चला सोडचिठ्ठी देऊन प्रोटेस्टंट धर्मश्रद्धा स्वीकारली होती. पहिला फ्रॉन्स्वॉची भाची प्रोटेस्टंट पंथाची अनुयायी झाली होती. तिचा मुलगा पुढे अनेक चित्तथरारक संकटांना तोंड देत चौथा हेन्री म्हणून १५८९ मध्ये फ्रान्सचा राजा झाला. थोडक्यात, प्रोटेस्टंट चळवळ ही समग्र व्यवस्थेत मूलगामी बदल घडवून आणणारी प्रक्रिया होती. कुठलीही व्यवस्था आपोआप प्रस्थापित झालेली नसते त्याचप्रमाणे ती विद्रोहाशिवाय बदलत नसते. प्रस्थापित व्यवस्थेतला बदल म्हणजे सत्तासंबंधांतलं स्थित्यंतर असल्यामुळे, प्रस्थापित व्यवस्थेचे लाभार्थी विद्रोहाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न प्राणपणानं करतात.

सेंट बार्थेलेमीची कत्तल

धर्मयुद्धांमुळे धगधगत्या फ्रान्समध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कॅथरीन द मेदिचीनं तिच्या मुलीचा हात प्रोटेस्टंट राजा हेन्री द नाव्हारला देण्याचा प्रस्ताव मांडला. या बातमीनं फ्रान्समध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. तर, प्रोटेस्टंट नेतृत्वाला याबद्दल संशय असूनही त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला.

हेन्रीच्या लग्नासाठी १५७२ च्या ऑगस्ट महिन्यात प्रोटेस्टंट नेते आणि हजारो समर्थक पॅरिसमध्ये जमतात. हेन्रीसोबत इतर शीर्षस्थ नेत्यांच्या मुक्कामाची व्यवस्था लूव्रच्या महालात असते. मात्र इथेच प्रोटेस्टंटांच्या शीर्षस्थ नेत्यांना एका झटक्यात संपवायचं, हेन्रीला कॅथोलिक धर्म स्वीकारायला भाग पाडायचं आणि सर्वसामान्यांची ‘घरवापसी’ घडवून आणायची, असा मॅकियाव्हेलियन कट कॅथरीनकडून रचण्यात आलेला असतो. कटाची बातमी तत्कालीन फ्रेंच राजा नववा चार्ल्सच्या कानावर पडते तेव्हा त्याला वेड लागण्याची पाळी येते. त्याच्या नावावर होणारी ही कत्तल त्याला मान्य नसते. पण प्रोटेस्टंटांचा काटा काढला नाही तर ते त्याचीच हत्या करतील, असं त्याला पटवण्यात येतं.

लग्नानंतर सेंट बार्थेलेमीच्या दिवशी लूव्रचे दरवाजे बंद केले जातात. लूव्रमध्ये मुक्कामाला असणाऱ्या सगळ्या शीर्षस्थ नेत्यांची कत्तल होते. कट्टरपंथी कॅथोलिक हेन्रीचाही काटा काढणार असतात, पण कॅथरीन हेन्रीला ‘यादीतून वगळण्या’चे आदेश देते. हेन्री प्रोटेस्टंट असला तरी तो पहिल्या फ्रॉन्स्वॉच्या भाचीचा मुलगा होता! नंतरच्या घडामोडी मात्र कॅथरीनच्या हाताबाहेर जातात. कट्टरपंथीयांकडून ‘सगळ्या प्रोटेस्टंटांना संपवा!’ अशा घोषणा पॅरिसमध्ये दिल्या जातात आणि रातोरात पॅरिसमध्ये तीन-चार हजार प्रोटेस्टंटांची कत्तल केली जाते.

गृहयुद्धाला पुन्हा तोंड फुटून हजारो फ्रेंच लोक मारले जातात. हेन्री व्यवहारवादी विचार करून धर्मांतर करतो. त्याला लूव्रमध्ये नजरकैदेत ठेवलं जातं. मात्र काही काळानंतर तो स्वत:ची सुटका करून परत धर्मांतर करून प्रोटेस्टंट होतो. त्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडतात. नववा चार्ल्स १५७४ मध्ये क्षयरोगानं मृत्यू पावतो. कॅथरीनचा मुलगा तिसरा हेन्री गादीवर येतो. त्याचा १५८९ मध्ये खून करण्यात येतो. कुणीही कल्पना केली नसते की दुसऱ्या हेन्रीच्या चार मुलांचा एका पाठोपाठ मृत्यू होईल, त्यांना मूलबाळ होणार नाही आणि शेवटी अनपेक्षितपणे हेन्री द नाव्हार या दूरच्या प्रोटेस्टंट राजपुत्राकडे राजेपद जाईल! पण कॅथोलिकबहुल फ्रेंच समाजानं कुणा प्रोटेस्टंटाला राजा मानणं त्या वेळी अशक्य होतं. प्रथेप्रमाणे हेन्री द नाव्हारचा राजेपदावर हक्क असला तरी पॅरिसचं सिंहासन चार वर्षं रिकामंच राहतं. हेन्री पॅरिसवर चालून जातो. पॅरिसला वेढा दिल्यावर नागरिक उपाशी मरतात, पण हेन्रीला स्वीकारलं जात नाही!

शेवटी ‘धर्मापेक्षा पॅरिस महत्त्वाचं!’ हे व्यवहारचातुर्य दाखवून हेन्री आपला प्रोटेस्टंट धर्म त्यागून १५९३ मध्ये कॅथोलिक बनतो. वीसेक वर्षांच्या कारकीर्दीत हेन्री अशांत फ्रान्समध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होतो. आर्थिक व्यवस्थेला बळकटी आणतो. कृषी सुधारणांमुळे ग्रामीण भागात संपन्नता येते. रयतेचा राजा, गरिबांचा कैवारी म्हणून हेन्रीविषयी लोकगीतं रचली जातात.

हाच हेन्री १५९८ मध्ये ‘एडिक्ट ऑफ नॉन्त’ हा अध्यादेश काढून, उपासनास्वातंत्र्याला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून देतो. हा अध्यादेश म्हणजे धर्मयुद्धांमध्ये होरपळून निघाल्यानंतर धर्मनिरपेक्षता या आधुनिक मूल्याची अपरिहार्यता अधोरेखित करणारा ऐतिहासिक क्षण!

मात्र ही भरभराटीची आणि स्थैर्याची परिस्थिती फार काळ टिकत नाही. समृद्ध आणि स्वायत्त फ्रान्स पूर्णपणे प्रोटेस्टंट होऊन आपल्या नियंत्रणाबाहेर जाईल या भीतीनं रोमचे धर्मांध गट फ्रॉन्स्वॉ राव्हाइआक नावाच्या कट्टरपंथी तरुणावर हेन्रीच्या खुनाची जबाबदारी सोपवतात. १६१० मध्ये राव्हाइआक लूव्र महालापासून जवळच, भर रहदारीच्या रस्त्यावर, सहिष्णुतेची मूर्ती समजल्या जाणाऱ्या लोकप्रिय हेन्रीचा खून करतो. त्याला ताबडतोब अटक करून मृत्युदंडही होतो, पण या राव्हाइआकनं ‘धर्मद्रोही’ हेन्रीला संपवून केवळ त्याचं धर्मकार्य केलं असा प्रचार केला जातो. संपूर्ण फ्रान्स मात्र हेन्रीच्या हत्येनं हळहळतो.

थोडक्यात, १६व्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिकतेचा किनारा दृष्टिपथात येण्याआधीच धर्मयुद्धांमुळे फ्रेंच रनेसॉन्सची चळवळ संकटग्रस्त झाली. पण मागे वळून जाणं, हा पर्याय उरत नाही आणि पुढली वाट स्पष्टपणे दिसत नाही. ही बारोक मन:स्थिती मिशेल द मोन्तेन्य (१५३३- १५९२) या प्रसिद्ध फ्रेंच विचारवंतानं त्याच्या स्वकथनपर निबंधांत व्यक्त केली आहे. त्याविषयी पुढील लेखात.

sharadcrosshuma@gmail.com

फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.