‘टीव्हीवरल्या ‘महाभारत’चे लेखक’ ही ओळख पक्की होण्याच्या किती तरी वर्षं आधी राही मासूम रझा यांनी ‘दास्तान ए अमीर हमजा’ मधल्या ‘तिलिस्म होशरूबा’ या आख्यानात निसर्गापासून ते मानवी मूल्यांपर्यंत भारतीयता कशी दिसून येते, याविषयीचा प्रबंध लिहिला होता. या प्रबंधाचं पुस्तक आता हिंदीत आलंय, त्यातून ‘आख्यान’ नेहमी आशेच्या, उमेदीच्या लाटांवरच डोलत- तरत राहातं, हेही उमगतं…
प्रत्येक माणूस हा त्याच्या पातळीवर एक दास्तानच आहे. प्रत्येकाच्या जगण्याची आपापली एक स्वतंत्र अशी कथा आहे. प्रत्येकाच्या जगण्याचं एक दुसऱ्याहून भिन्न असं आख्यान आहे. इथं एक शेर आठवला.
कोई जमीन है, कोई आसमान है
हर शख्स अपनी जात में एक दास्तान है
गोष्ट ही स्थळ-काळाला बांधून ठेवणारी कला आहे, हे समजून घेताना भारतीय कथनपरंपरेचा पुसटसा उल्लेख मागच्या लेखात केला होता. गोष्टीत काळ सामावतो हे तर खरंच पण कल्पनेच्या आधारे रचलेली ही सृष्टी जणू समांतर असं जगच उभं करते. अशी अनेक आख्यानं अनेक भाषांमध्ये आढळतात. भारतीय कथनपरंपरेचं उदाहरण म्हणून कथासरित्सागर वगैरेसारखी उदाहरणं आहेतच.
उर्दूच्या प्राचीन कथासाहित्यात ‘दास्तान ए अमीर हमजा’ हे एक सशक्त अशा कथन साहित्याचं मोठं उदाहरण आहे. एका कथेच्या पोटातून निघणारी दुसरी कथा हे तर त्याचं वैशिष्ट्य आहेच, खिळवून ठेवणारं कथानक, उत्कंठा, जिज्ञासा यातून फुललेली ही हजारो पानांची कथासृष्टी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हे लेखन झालं. अर्थात तरीही त्याच्या निर्मिती कालखंडाविषयी अनेक मतभेद आहेत. एवढंच नाही तर लेखकाविषयीसुद्धा अनेक मतमतांतरं आहेत. या कथनातला एक महत्त्वाचा भाग ‘तिलिस्म होशरूबा’ या नावाने आहे. ‘तिलिस्म होशरूबा’ म्हणजे भान हरपून टाकणारी, बेहोश करणारी जादू. अमीर हमजा हा या दास्तानचा नायक आहे. त्याच्यानंतर त्याचे वारस हे या कथानकाचं केंद्र आहेत. अमीर हमजा धाडसी आणि दूरदर्शी आहे. पूर्वजांनी दिलेल्या अनेक जादूई वस्तू त्याच्याकडे आहेत. त्यामुळे तो सर्व आपत्तींपासून सुरक्षितच राहतो आणि शत्रूंनाही वश करतो. अमरो अय्यार हा अमीर हमजाचा प्रिय मित्र. त्याचेही व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. त्याच्याकडे एक जादूई पोतडी आहे. तिच्यात सर्व प्रकारच्या वस्तू सामावतात. त्यात सात शहरं आहेत आणि सात नद्या. या शहरांमध्ये अमरोच्या नावाचं नाणं चालतं. त्याच्याजवळ एक अशीच जादूई चादर आहे ती पांघरल्यानंतर तो अदृश्य होतो. कथनाचा दीर्घ पट युद्धाच्या वर्णनांनी व्यापलेला. थरार आणि चित्तचक्षू चमत्कारिक घटना गुंगवून ठेवतात. या दास्तानविषयी इथं सांगायचं नाही. त्यावरील शोधप्रबंधाविषयी काही गोष्टी नमूद करायच्या आहेत.
राही मासूम रजा एम. ए. झाल्यानंतर अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये उर्दू विभागात प्राध्यापक झाले. त्यांनी ‘तिलिस्म होशरूबा’ मधील भारतीयत्वाचा शोध घेणारं संशोधन केलं. त्यातून एक प्रबंध साकारला. राही १९६६ साली अलिगढ सोडून मुंबईत आले तेव्हा या शोध प्रबंधाची प्रत त्यांचे एक सहकारी कुंवरपाल यांच्याकडेच राहिली होती. हा महत्त्वपूर्ण शोधप्रबंध पुस्तक रूपात यावा अशी इच्छा कुंवरपाल यांचीच. पण तो आला मात्र खूप उशिरा… अगदी अलीकडे. उर्दूत असलेल्या या प्रबंधाचा सीमा सगीर यांनी हिंदी अनुवाद केला असून तो आता पुस्तक रूपात आला आहे. प्रसिद्ध कादंबरीकार असलेल्या आणि अनेक चित्रपटांसह महाभारत या लोकप्रिय मालिकेचं संवाद लेखन करणाऱ्या राही यांचं हे संशोधनसुद्धा भारतीयतेची चर्चा असंख्य संदर्भांसह करणारं आहे.
राही यांनी ‘तिलिस्म होशरूबा’चं अध्ययन केलं. ही उर्दू दास्तान भारतीय परिवेशात लिहिली गेली. भारतीय जनमानसातील सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, संदर्भ यांच्या तपशिलांनी तिचं विणकाम झालेलं आहे. यातून राहींना एवढंच सांगायचं होतं, की भारतीय भूमीवर जन्मलेल्या आणि वाढलेल्या उर्दूचा सांस्कृतिक परिवेश अगदी विशुद्ध असा भारतीयच आहे. ब्रज, अवधी, भोजपुरी अशा भाषांनाही तिने आत्मसात केलं आहे. आणि ती भारतात प्रवाहित होत राहिली आहे. राही मासूम रजा यांनी आपल्या या संशोधनाच्या माध्यमातून अगदी निर्विवादपणे दाखवून दिलं आहे की ‘तिलिस्म होशरूबा’ मध्ये जे जीवनदर्शन आहे ते पूर्णपणे भारतीय असून मानवी संस्कृती ही कुठल्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ असते. यानिमित्ताने उर्दू कथनपरंपरेतील भारतीयतेचा शोध पुढे आला आहे. राही यांनी म्हटलं आहे की ही दास्तान फारसीमध्ये लिहिली गेली की उर्दूत याच्याशी घेणं-देणं नाही. तसंच ती मूळ रचना आहे की अनुवाद यातही पडायचं नाही. फक्त ती कुठल्या भौगोलिक प्रदेशाचं प्रतिनिधित्व करते याचाच यानिमित्ताने शोध घ्यायचा आहे. भारतातील नद्या, प्रदेश, शहरं यांचे असंख्य संदर्भ यानिमित्ताने दिले गेले आहेत. भारतीय समाजजीवनाचे अनेक पैलू या कथनात उलगडले आहेत. अरबी, फारसी किस्सागोईच्या निमित्ताने ‘तिलिस्म होशरुबा’ची राही यांनी भारतीय परिप्रेक्ष्यात करून दिलेली ओळख इतकी रोचक आहे की मूळ दास्तान किती उत्कंठावर्धक असेल याबाबतचं औत्सुक्य वाढतं. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत भारत, इराण आणि अरब संस्कृतीचे जे विशेष शिल्लक राहिले होते त्याची झलक या दास्तानमध्ये दिसून येत असल्याचे राही नमूद करतात पण त्यापेक्षाही जास्त त्यांनी आणखी एका मुद्द्यावर भर दिला आहे, तो म्हणजे या दास्तानमध्ये अरब आणि इराणच्या परंपरेपेक्षा भारतीयतेचं तत्त्व अधिक प्रभावशाली आहे.
पर्यावरणाच्या अनुषंगाने असलेल्या प्रकरणात धरती, वृक्षराजी, पशुपक्षी अशा सर्व घटकांची चर्चा भारतीय पटलावर करण्यात आली आहे. समाजव्यवस्थेची चिकित्सा करणाऱ्या प्रकरणात लोकांचं जीवनमान, आहार- विहार, संस्कृती तर राजकीय व्यवस्थेचा शोध घेणाऱ्या प्रकरणात शासनाचं स्वरूप, बादशहा, दरबार, शिष्टाचार, प्रशासन, सैन्य, युद्ध आदी बाबी येतात. ‘मूल्यांची सृष्टी’ प्रकरणात ललित कलांचा परामर्श घेतला आहे. राही यांनी सत्य, सौंदर्य अशा मूल्यांवर त्यात भर दिला आहे. प्रबंधाचं अध्ययन करताना ‘धरती’पासून सुरुवात केली होती. शेवटी ही चर्चा ‘आकाशा’पर्यंत येऊन पोहोचली.
‘तिलिस्म होशरूबा’ दास्तानमध्ये भारतीयतेचा शोध घेतल्यानंतर निष्कर्षात जी निरीक्षणं राही यांनी नोंदवली आहेत ती आख्यान परंपरेची वैशिष्ट्ये सांगणारी आहेत. माणूस गोष्ट का आणि कशी रचत आला यामागची परंपराच त्यांनी स्पष्ट केली आहे. त्याचा अर्क साधारण असा आहे… गोष्ट सांगण्याची ही सवय दुनियेतल्या सगळ्या देशांमध्ये आणि संस्कृतीत आढळून येते. माणूस आपली मनोवैज्ञानिक आणि भविष्यातील सगळी स्वप्नं याच गोष्टींच्या आरशात पाहतो. मग त्या गोष्टी देवी- देवतांच्या असोत, भूत- पिशाच्च अथवा पऱ्यांच्या असोत किंवा तुमच्या- आमच्यासारख्या चालत्या फिरत्या माणसांच्या असोत. हे सगळे प्रकार म्हणजे एकाच गोष्टीच्या दृश्यातले भिन्न पैलू आहेत. ज्या बाबी आम्हाला प्रत्यक्ष जीवनात प्राप्त होत नाहीत त्या स्वप्नांच्या दुनियेत पाहण्याची आस यानिमित्ताने बाळगली जाते.
गोष्ट सांगणं म्हणजे जीवनापासून पळणं नाही तर त्याला भिडणं आहे. जगण्यात आम्ही ज्या ताकदींसमोर हरत असतो त्यांच्यावर स्वप्नात अथवा गोष्टीच्या रूपाने विजय प्राप्त करण्याची मनीषा बाळगतो. जीवनातील चढउतार उमजण्याचं आणि उमेद वाढवण्याचं कामसुद्धा आम्ही याच गोष्टींद्वारे प्राप्त करतो. त्यामुळे गोष्ट सांगण्याच्या कलेला केवळ चैन कसं मानता येईल. आपली उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टांना पुरं करण्यासाठीची निष्ठा या बाबीच कोणत्याही कार्याला निर्मितीक्षम क्षणांत परावर्तित करतात.
आज भावनांना बुद्धीच्या प्रकाशात पाहिलं जात आहे पण ही साहित्याची केवळ एक बाजू झाली. याचा दुसरा पैलू भूतकाळासोबतच भविष्यकाळातली स्वप्नं पाहण्याचा आणि दाखवण्याचाही आहे. कारण भविष्य हे अगम्य तर भूतकाळ हा ओळखीचा असतो. त्यामुळेच भविष्यातलं स्वप्न हे आजवर कायम भूतकाळाच्या आरशातच दाखवलं गेलं आहे. भूतकाळाचं हे चित्र पाठीमागे वळून परतण्यासाठी नाही तर पुढे झेपावत एका वास्तवाला समजून घेण्याच्या प्रयत्नांसाठी आहे. त्यामुळे ती माणसं खरंच सुदैवी आहेत की जी भूतकाळातले किस्से आणि गोष्टींना केवळ निरर्थक न मानता माणसाचं मनोविज्ञान आणि बुद्धीचं एक आख्यान समजतात… म्हणूनच आख्यान कधीही शोकांत नसतं. जगणं हे आशेवर निर्धारित असतं, निराशेवर नाही. आख्यान रचणारा, ऐकवणारा हा आकांक्षा आणि उमेद यांना निराशा आणि दु:खातून बाहेर काढण्याचं काम करत असतो…