स्वातंत्र्यपूर्व काळातील दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, औंध, सांगली, मिरज इत्यादी संस्थानांनी साहित्य, कला आणि संस्कृती विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. या काळात दक्षिण मराठी साहित्य संमेलने भरत होती. दक्षिण महाराष्ट्रातील साहित्यिकांना त्यामुळे व्यासपीठ लाभत असे. २० डिसेंबर, १९५४ला भरलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष आचार्य प्र. के. अत्रे होते, तर उद्घाटक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. अनेक वर्षांच्या खंडानंतर या साहित्य संमेलनाचे पुनरुज्जीवन झाल्याची नोंद ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ त्रैमासिकाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकात (क्र. १११) पृष्ठ क्र. ४३वर आढळते. या संमेलनास ग. ल. ठोकळ, ना. सं. इनामदार, बाबा कदम, रणजित देसाई प्रभृती साहित्यिक सहभागी झाले होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात तर्कतीर्थांनी कला व साहित्य ही तत्त्वे मानवी जीवनात संस्कृती विकासाची शक्ती असल्याचे सांगत विशद केले होते की, ‘‘कला वा साहित्य हे मानवी कर्म आहे, त्यास मानवी जीवनाच्या बाहेर अस्तित्वच असू शकत नाही. मानवी जीवन म्हणजे केवळ श्वसनकर्म नव्हे. मानव्य हे भोवतालचा व आतला निसर्ग बदलून त्याला अधिक उपयुक्त, उन्नत व सुंदर करून देण्याचे कार्य करण्यात व्यक्त होत असते. मनुष्य विश्व जाणतो म्हणून जगतो. ते जग जाणून त्यात बदल घडवूनच माणसास जगणे शक्य होते, म्हणून जागृती ही उपनिषदांनी सुषुप्ती (गाढ निद्रा) व स्वप्न यांपेक्षा अधिक प्रशंसिली आहे. अक्षिस्थ पुरुषाची उपासना उपनिषदांनी सांगितली आहे. अक्षिस्थ म्हणजे डोळ्यांत बसून विश्व पाहणारा जीवात्मा. साहित्य वा शास्त्र ही उच्चतर जागृती वा महाजागृती होय. कलेच्या अनुभूतीस व्हाइटहेड याने कला म्हणजे ‘उच्चतर अवस्थेप्रत पोहोचलेले इंद्रियांचे विश्व’ असे म्हटले आहे, ते याच अभिप्रायाने.
‘कलेकरिता कला’ म्हणणारा एक संप्रदाय आहे व जीवनाकरिता कला म्हणणारा दुसरा एक संप्रदाय आहे. वस्तुत: ही दोन्ही विधाने परस्परविरोधी नाहीत, एवढे तरी तर्कशास्त्र आपणास माहीत असावयास पाहिजेत. ‘कलेकरिता कला’ याचा अर्थ कला ही स्वयमेव साध्य होय. कला ही स्वयमेव आनंदमय असल्याचे कोण नाकारेल? साध्य हीच साधने होतात. ही जीवनाच्या परिणत अवस्थेची खूण आहे, परंतु कलेला जीवनाबाहेर अस्तित्व नसते. उच्च अनुभूती कलेचे तिचे स्वरूप असल्यामुळे जीवनाचाच ती अविभाज्य भाग होते. अनुभूती ही जीवात्म्याचाच अंश आहे. अंश हा अंशीहून अविभाज्य असतो. अंशाहून अंशी श्रेष्ठ असतो म्हणून ‘जीवनार्थ कला’ हा सिद्धांत गणिती पद्धतीने निर्विवादपणे सिद्ध होतो.
जीवन म्हणजे या विश्वातील प्रत्यक्ष जीवनच होय. आपण पारलौकिक जीवनाला अतिरिक्त महत्त्व देऊन या जीवनाच्या सर्वश्रेष्ठ नैतिक मूल्यांची उपेक्षा केली आहे. आपण भारतीयांनी गेली हजार वर्षे पारलौकिक जीवनावर आपली मने केंद्रित केली. आपण अजूनही मनाने परलोकवासी आहोत. त्या काल्पनिक पारलौकिक जगापेक्षा याच जगाचे महत्त्व आपणास समजण्याची गरज आहे. यापुढे मध्ययुगीन परलोकपरायण असलेले संतवाङ्मय आपणास आपले प्रश्न उलगडण्यास पुरे पडणार नाही. आपल्या या जीवनाचा खोल नैतिक अर्थही त्यामुळे स्पष्टपणे कळणार नाही. या ऐहिक जीवनास मुख्य केंद्रस्थान मानण्याने माणसाचा नैतिक अध:पात होतो, हा एक गैरसमज आहे. जीवन हेच श्रेष्ठ अंतिम मूल्य मानले, तरच आपण या जीवनाला भव्य रूप देऊ शकू. त्याकरिता मोठमोठे विधायक स्वरूपाचे मानसिक व बाह्य जगातले पराक्रम करू शकू. या जीवनाची सर्जनशक्ती उजळविणारी व बंधमुक्त करणारी प्रतिभा न तज्जन्य साक्षात्कार ज्यांना लाभतो, तेच या नव्या जगाचे श्रेष्ठ साहित्यिक व कलाकार होतील. हा जडवाद नव्हे व भौतिकवादही नव्हे. हे नवे अध्यात्म आहे, यात नास्तिक्य नाही. हे नैतिक आस्तिक्याचे अधिष्ठान आहे.’’
आपल्या प्रस्तुत व्याख्यानातून तर्कतीर्थ कला, साहित्य, संस्कृती आणि साहित्यकार या चार घटकांचा अनुबंध स्पष्ट करत एकराष्ट्रीयत्वाचा आग्रह धरतात. इथला हिंदुधर्म हा हिंदू संस्कृतीसदृश आहे, हे ते बिंबवताना दिसतात.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com
