राजा मंगळवेढेकर लिखित ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ या बृहद्चरित्राची पहिली आवृत्ती ११ जून १९७५ रोजी प्रकाशित झाली. तो दिवस साने गुरुजींच्या स्मृतीचा रौप्य महोत्सवी दिन होता. हा प्रकाशन समारंभ गोरेगाव (जि. कुलाबा, आता जि. रायगड) येथे संपन्न झाला. त्याचे प्रमुख पाहुणे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. या प्रकाशन समारंभातील त्यांचे भाषण म्हणजे तर्कतीर्थांनी साने गुरुजींना वाहिलेली आदरांजलीच होती. ते भाषण साप्ताहिक ‘साधना’ पुणेच्या २१ जून, १९७५ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते.
त्यावेळी तर्कतीर्थ म्हणाले होते की, साने गुरुजी हा विषयच मुळी प्रकाशाचा ध्यास लागलेल्या माणसाचा आहे. भारतात कथाकथनाची परंपरा होती, परंतु तिचा सामाजिक जाणिवा व राष्ट्रप्रेमासाठी गुरुजींनी जितका उपयोग करून घेतला, तितका क्वचित कुणी केला असेल. हे माध्यम पकडून गुरुजींनी असंख्य धडपडणारी मुले निर्माण केली. कथाकथनाच्या परंपरेला नैतिक अधिष्ठान, हौतात्म्याची ओढ, समर्पणाची वृत्ती निर्माण करण्याचे, माणूस बदलण्याचे सामर्थ्य साने गुरुजींनी प्राप्त करून दिले.
साने गुरुजींच्या साहित्यावर रडवे आणि दुबळे साहित्य म्हणून आक्षेप घेण्यात येतो. हा आक्षेप खोटा आहे. वस्तुत: ते अश्रू नैतिकता, सात्त्विकता आणि मांगल्याच्या ओढीतून निर्माण झालेले आहेत. गुरुजींचे साहित्य वाचून माणुसकीचा गहिवर उचंबळून येतो. माणसाबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. या जिव्हाळ्यातून येणारे अश्रू मन पवित्र करतात. त्यातून पवित्र कार्याचा अट्टहास निर्माण होतो. हे अश्रू अंधाराकडून प्रकाशाकडे नेत मांगल्याचे. प्रकाशाचे दरवाजे उघडतात.
साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून प्राणाची बाजी लावत आमरण उपोषण केले होते. गुरुजींची ही मागणी केवळ मंदिर प्रवेशाची नसून, सामाजिक प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकण्याचा तो प्रयत्न होता. हरिजनांसारखा वर्ग दुबळा, उपेक्षित राहिला तर राष्ट्र दुबळे ठरणार, ही तळमळ त्यामागे होती. हे उपोषण राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता निर्मिण्याच्या कळकळीतून केले होते. राष्ट्रीय एकात्मतेचे आजचे कागदी धिंडवडे पाहिल्यावर गुरुजींचा ‘आंतरभारती’ विचार श्रेष्ठ वाटतो. राष्ट्रीय एकात्मतेच्या परिषदा जे करू शकणार नाहीत, ते आंतरभारती आंदोलन करून जाईल इतके सामर्थ्य साने गुरुजीप्रणीत या विचारात होते.
आजच्या समाज व्यवस्थेत शिक्षणात श्रमाची अप्रतिष्ठा होत आहे. आजचे शिक्षण माणसाला पांढरपेशा करून श्रमाला तुच्छ लेखते. श्रमाला कमी लेखणारे शिक्षण आर्थिकदृष्ट्या राष्ट्राला मागास बनविते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, राष्ट्रीय उत्पादन श्रमातून निर्माण होत असते. श्रमाबद्दलच्या तिरस्कारातून आपण नवा चातुर्वर्ण्य निर्माण केला. यासाठी साने गुरुजींनी केलेला राष्ट्रसेवा दलाचा उपक्रम आज लाखमोलाचा ठरतो. साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांनी श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी मरगळ झटकली पाहिजे.
साने गुरुजींचा देहत्याग १९५० च्या भ्रष्टाचार, सत्तासीनतेच्या परिस्थितीतून निर्माण झाला होता. भ्रष्टाचार, सत्तापिपासूपणाचा विषवृक्ष १९५०पेक्षा आज अपरंपार फोफावला आहे. आज गुरुजी असते तर त्यांनी जाहीर आत्मदहन केले असते किंवा तरुणांना हाक देऊन त्यांना जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांतीसाठी तयार केले असते. जयप्रकाशजींना राष्ट्राच्या दुखण्याचे निदान झाले आहे; पण त्यांच्याजवळ कार्यक्रम आणि उपाय नाही. सर्व पक्षांचे नेतृत्व मनाने म्हातारे झाले आहे. या गोरेगावसारख्या खेड्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते आपले स्वतंत्र झेंडे गुंडाळून विनोबाप्रणीत ग्राम परिषद स्थापन करतात, हा अनुकरणीय आदर्श आहे.
तर्कतीर्थांचे भाषण साने गुरुजींच्या रौप्य महोत्सवी स्मृतिदिनाचे. परवा ११ जून, २०२५ या दिवशी आपण त्यांचा अमृत महोत्सवी स्मृतिदिन साजरा केला. आज ५० वर्षांनंतरही साने गुरुजींना मानणारा मोठा समाज महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्म आणि पक्षांमध्ये आहे. हे भाषण वाचून तो अंतर्मुख होऊन विधायक बदलांसाठी कृतसंकल्प होईल, तर ते या तर्कतीर्थ विचारांचे रचनात्मक योगदान ठरेल. घरोघरी ‘श्यामची आई’ किंवा ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ उपक्रम वर्तमानात सुरू आहेत. हे उपक्रम महाराष्ट्रात सर्वत्र अमलात आले, तर तर्कतीर्थ अभिप्रेत साने गुरुजींचा माणुसकीचा गहिवर पुनरुज्जीवित होईल.
drsklawate@gmail.com