तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी १९२० नंतर सार्वजनिक जीवनात आले. त्यामागे लोकमान्य टिळकांची प्रेरणा होती. धर्म व समाजसुधारणेने सुरू झालेले त्यांचे कार्य समाज, धर्म, राजकारण, अस्पृश्यता निवारण, आंतरजातीय विवाह, सर्व जाती-धर्मीयांना मंदिर प्रवेश, भाषा, साहित्य, संस्कृती असे वळसे नि वळणे घेत एका क्षणी प्रबोधक व ज्ञानपरिवर्तक बनले. क्रांती की परिवर्तन अशा द्वंद्वात त्यांनी अंतिमत: स्वत:स ‘परिवर्तनवादी शास्त्री’ मानत नवमानवतावादाची कास धरली.
शरद पवार, मधु मंगेश कर्णिक, डॉ. सुधीर रसाळ, उल्हास पवार, डॉ. सदानंद मोरे, अनिल जोशी, प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, डॉ. अशोक खंडकर (अमेरिका), डॉ. अशोक जोशी (अमेरिका), डॉ. जब्बार पटेल, डॉ. तारा भवाळकर, डॉ. सरोजा भाटे, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. अशोक चौसाळकर यांच्यासारखे अनेक लोक ‘तर्कतीर्थ विचार’ जगावा, जागावा म्हणून प्रयत्नशील आहेत. हे तर्कतीर्थ पाझर साहित्य सम्राट न. चिं. केळकर, शंकरराव देव, प्रा. मे. पुं. रेगे, पु. ल. देशपांडे, प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. बाबा आढाव, प्रा. देवदत्त दाभोळकर, पन्नालाल सुराणा, बाबा आमटे, प्राचार्य राम शेवाळकर, प्रा. संभाजी कदम, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, मधुकाका कुलकर्णी, रा. ज. देशमुख, सुभाष अवचट प्रभृती मान्यवरांच्या लेखन, पत्रव्यवहारातून, संवाद-संपर्क-सहवासातून निर्माण झालेले आहेत. हा सर्व तर्कतीर्थ गोतावळा महाराष्ट्राचा सांस्कृतिक अनुबंध आहे. तो महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, दादासाहेब मावळणकर, काकासाहेब गाडगीळ, स्वामी केवलानंद सरस्वती, मानवेंद्रनाथ रॉय, साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुशीतून उदयाला आलेला आहे.
या सर्व अनुबंधातून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, प्राज्ञपाठशाळा मंडळ, ‘नवभारत’, सेंटर फॉर दि स्टडी ऑफ सोशल चेंज, धर्मकोश मंडळ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांसारख्या संस्था अजून तर्कतीर्थ विचारांची पखरण करीत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक, सुसंस्कृत व्हावे, समृद्ध राहावे म्हणून प्रयत्नशील आहेत.
मूलत: मनुष्य संस्कृती निर्माण करून तिच्यात जगणारा प्राणी आहे. महाराष्ट्र संस्कृती भारतीय संस्कृतीचे अपत्य आहे. या संस्कृतीत घेण्यासारखे जसे आहे, तसेच नाकारण्यासारखेही अनेक घटक आहेत. यासंबंधात तर्कतीर्थांनी ‘आपल्या संस्कृतीत घेण्यासारखे व नाकारण्यासारखे’ शीर्षक लेख लिहून ऊहापोह केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘जगातील सर्व प्रगल्भ संस्कृतींमध्ये स्वत: मनुष्य व विश्व किंवा व्यष्टी व समष्टी यांच्या जाणिवांचा व्यापक व्यूह असतो. त्याला विश्वविषयक तत्त्वज्ञान म्हटले जाते. जगातल्या उच्च धर्म विचारसरणीत हा व्यापक विचारव्यूह असतोच. भारतीय संस्कृतीने वेदकालापासून अशा व्यापक तत्त्वज्ञानाचा वारसा जपून ठेवला आहे. यहुदी, ख्रिाश्चन, इस्लामी, चिनी आणि भारतीय या सर्व संस्कृतीमध्ये विश्वात्मक जाणिवेचे विचारव्यूह आहेत. ते वगळता अन्य व्यूह या संस्कृतींनी नाकारलेले दिसतात. त्यामुळे धार्मिक संघर्ष, विद्वेष, विद्रोह आणि निरंतर युद्धमानता अनैतिक ठरविली गेली आहे. सर्वधर्म सहिष्णुता हे वैशिष्ट्य व प्राचीन भारतीय संस्कृतीमान सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य म्हणून मान्य केले गेले आहे, ते भारतीयांचे धार्मिक जीवनाचे मूल्य म्हणजे जगाला भावी विनाशापासून वाचविणारी शक्ती आहे. हे मूल्य न मानणारे पश्चिमी धर्म हे अपधर्म आहेत, ही गोष्ट जगाला पटविली पाहिजे.’’ या तर्कतीर्थ विचारात त्यांचे सांस्कृतिक सार सामावलेले आहे. हा सांस्कृतिक पाझर वर्तमानात जपणे सर्वांचे कर्तव्य आहे.
drsklawate@gmail.com