तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा अध्ययनकाळ सन १९१० ते १९२३ असा तपभराचा दिसून येतो. त्यांची मुंज नवव्या वर्षी झाली आणि शिक्षणास प्रारंभ झाला. तर्कतीर्थ लेखन, वाचन आपले जन्मगाव पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) येथील मुलांच्या मराठी शाळेत (सध्याची जिल्हा परिषद शाळा क्र. १) शिकले. १९०७ ते १९१० या काळात ते इयत्ता चौथीपर्यंत तिथे शिकले. तेच त्यांचे औपचारिक शिक्षण. वडील बाळाजी पंत वेदाध्यायी होते. त्यांचे वेदशिक्षण नाशिकच्या वेदशाळेत झाले होते. त्यांनी तर्कतीर्थांना ‘अमरकोश’ शिकवला. त्या काळात पठण हेच अध्ययन समजले जाई. चरण, अर्धेली, ऋचा, सूक्त असे क्रमाक्रमाने पाठांतर वाढविले जायचे. महिनाभरात साधारणपणे अडीचशे-तीनशे ऋचांचे पाठांतर करून घेतले जात असे. स्वर, सूर, उच्चार, अक्षरे, पदे, गायन यांवर भर असे. वडील ते घरी करून घेत. त्या अर्थाने तर्कतीर्थांचे पहिले शिक्षक त्यांचे वडीलच होते.

पुढील वेदाध्यायनार्थ वडिलांनी तर्कतीर्थांना वाईच्या प्राज्ञपाठशाळेत दाखल केले. इथे नारायणशास्त्री मराठे त्यांचे मुख्य शिक्षक (गुरू) होते. गुरुजींनी त्यांना कालिदासचे नाटक ‘रघुवंश’, बाणभट्टाची ‘कादंबरी’ शिकविली. गुरुजींना शास्त्रीय संगीताची चांगली जाण होती. प्राज्ञपाठशाळेतील गंगाधरशास्त्री जोशी यांनी ‘संस्कृतचंद्रिका’ मासिकातील अनेक गोष्टी सांगून संस्कृतची आवड निर्माण केली. रावजी जोशी तर्कतीर्थांना गाणे शिकवत. वासुदेवशास्त्री कोनकर, महादेवशास्त्री दिवेकर, दिनकरशास्त्री कानडे, तर्कतीर्थांचे सहकारी, शिक्षक म्हणून महत्त्वाचे ठरतात. १९१४ ते १९१७ या तीन वर्षांच्या प्राज्ञपाठशाळेतील अध्ययनकाळात तर्कतीर्थांनी ‘गादाधरी’, ‘पंचलक्षणी’, ‘चतुर्दशलक्षणी’, ‘तर्कदीपिका’, ‘वेदान्तसार’, ‘अर्थसंग्रह’ इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करीत त्यांनी वेद, न्याय, तर्क, व्याकरण, व्युत्पत्ती, अलंकारशास्त्र इत्यादींचे प्रारंभिक शिक्षण घेतले. सन १९१७ मध्ये तर्कतीर्थांना विनोबा भावे यांनी इंग्रजी शिकवले. इंग्रजी शिकण्यासाठी तर्कतीर्थ वाईहून बडोद्यास पळून गेले होते. तिथे ‘तर्खडकर भाषांतर पाठमाला’द्वारे ते इंग्रजी शिकले.

सन १९१८ ते १९२२ या काळात वेदाध्यायनाचे उच्चशिक्षण घेण्यासाठी तर्कतीर्थांनी काशीस प्रयाण केले. या काळात ‘तर्कतीर्थ’ पदवीसंपादनार्थ ते नवन्याय, व्युत्पत्ती, व्याकरण, तर्कशास्त्र, अलंकारशास्त्र इत्यादींचे उच्च शिक्षण घेत राहिले. इथे तर्कभूषण पर्वतीयशास्त्री यांच्याकडे वेद, वेदान्त शिकले. महानैय्यायिक रामाचरण भट्टाचार्य यांच्याकडून न्याय, वासुदेवशास्त्री अभ्यंकरांकडून व्याकरण, अंबादास शास्त्रींकडून जैन न्याय शिकले. भंडारी शास्त्री, लक्ष्मीनाथ झा, बालकृष्ण मित्र प्रभृतींनी शंकांचे निरसन करीत त्यांना प्रबुद्ध केले.

या औपचारिक शिक्षणापलीकडच्या बिनभिंतीच्या शाळेत महात्मा गांधींनी तर्कतीर्थांना सामाजिक भान दिले, तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांना सक्रिय राजकारणाचे धडे देत राजकीय मुत्सद्दी बनविले. गुरू नारायणशास्त्री मराठे यांनी संन्यास ग्रहण केला नि ते स्वामी केवलानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वामी केवलानंद सरस्वतींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या ‘मीमांसाकोश’, ‘धर्मकोश’ संपादन प्रक्रियेतून तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्त्वामधील ‘कोशकार’, ‘संपादक’ साकारला. या पायाभूत संस्कार नि शिक्षणातून तर्कतीर्थांनी ‘मराठी विश्वकोश’ (वीस संहिता खंड) निर्मिले.

आज ‘शिक्षक दिन’. तर्कतीर्थांनी आपल्या जीवन घडणीचे श्रेय या सर्व गुरूंना देत सांगून ठेवले आहे की, ‘‘माझी जीवनदृष्टी ही बुद्धिवाद व आध्यात्मिक अनुभववाद यांनी घडविली आहे. आधुनिक विज्ञाने ही बुद्धिवादावर अधिष्ठित आहेत… नैतिक दृष्टीने नैतिक आत्मस्वातंत्र्य हे ज्याला प्राप्त झाले, त्यालाच आध्यात्मिक अनुभवाची पात्रता येते. हे आध्यात्मिक नैतिक स्वातंत्र्य अंतिम जीवनमूल्य होय. विश्वासंबंधी बुद्धिवादी दृष्टिकोन स्वीकारणाऱ्यांनाही हे स्वातंत्र्य अंतिम मूल्य होय.’’ शिक्षक केवळ धडा शिकवत नसतात, ते धडा देत असतात. तर्कतीर्थांना धडा देणाऱ्यांची सूची मोठी आहे. ती वाचताना छाती दडपून जाते. तो काळ राष्ट्रीय शिक्षणाचा होता. त्याचे महत्त्व सांगत तर्कतीर्थांनी लिहिले आहे, ‘‘भारतीयांमध्ये स्वधर्मावर, स्वत:च्या परंपरागत संस्कृतीमध्ये, सनातन नीतिधर्मावर विवेकयुक्त श्रद्धा निर्माण करू शकेल, तीच राष्ट्रीय शिक्षण पद्धती होय.
drsklawate@gmail.com