माणसाचं हस्ताक्षर असो वा त्याचं लिहिलेलं पत्र, ते त्या व्यक्तीच्या चारित्र्याचं प्रतिबिंब असतं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी यशवंतराव चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रांचा संक्षिप्त आणि संपादित मजकूर आपण या सदरातील दोन-तीन भागांत वाचला. तर्कतीर्थांच्या प्रत्येक पत्रास यशवंतराव चव्हाण उत्तर देत, असे या उभयतांमधील पत्रव्यवहारातून दिसून येते. यशवंतराव चव्हाण तर्कतीर्थांच्या दीर्घ पत्रांना संक्षिप्त परंतु सूचक उत्तरे देत. ती देताना त्यांना आपल्या पदांचं भान (मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री) असे. काही सूचना, शिफारसींचा यशवंतराव अनुल्लेखाने वा दुर्लक्ष करून अव्हेर करताना दिसतात. यात अनादर नसला तरी आपल्या पदाच्या जबाबदारीचे व जोखमीचे भान यशवंतराव चव्हाण जपत.

उदाहरणच द्यायचं तर १९६२ला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची स्थापना झाली. कुलगुरू पदावर कुणाची नियुक्ती करायची याची चर्चा राजकीय व शासकीय पातळीवर सुरू होती. तर्कतीर्थ आपल्या पत्रातून काही नावे सुचवितात. त्या पत्रात इतर अनेक प्रश्नांचा ऊहापोह असतो. यशवंतराव चव्हाण त्या पत्रास उत्तर देतात; पण कुलगुरू पदावर नियुक्तीच्या मुद्द्यावर मौन धारण करतात. प्रत्यक्षात नियुक्ती अन्य व्यक्तीची होते. ही राजकीय प्रौढता नि स्वत:स अन्य कुणास गृहीत धरता येणार नाही, याचं गर्भित आणि गंभीर सूचन होतं.

यशवंतराव चव्हाण तर्कतीर्थांना कटाक्षाने मराठीत उत्तरे देत. ६ डिसेंबर १९८०ला त्यांनी इंग्रजीत पत्र लिहिले. त्यात त्यांनी प्रारंभीच खेद व्यक्त केला आहे की, ‘‘मराठी टंकक (टायपिस्ट) उपलब्ध न झाल्याने नाइलाजाने इंग्रजीत लिहावे लागत आहे, त्याबद्दल क्षमस्व!’’ १ मे १९६०ला मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्राच्या सिंहासनावर मराठी आरूढ झाल्याचे गौरवोद्गार यशवंतराव चव्हाण यांनी काढले होते.

यापूर्वी या सदरात आपण ‘दार नाही उघडले तर…’ शीर्षकाचे तर्कतीर्थांचे पत्र वाचले आहे. (६ ऑक्टोबर २०२५) त्या ३ ऑगस्ट १९८१च्या पत्रास २ सप्टेंबर १९८१ रोजी उत्तर देत यशवंतराव चव्हाण यांनी लिहिले आहे, ‘‘राजकीय निर्णयांचे परिणाम दूरगामी असतात. मला कसलीही घाई झालेली नाही. आजच्या पक्ष राजकारणाच्या विश्लेषणाने मी घेतलेला निर्णय बरोबर आहे, असे मला वाटते आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की, ‘दार उघडत नाही, तोपर्यंत उघड्यावर बसावं.’ माझ्या मनाची ही तयारी करूनच मी हा निर्णय घेतला आहे.’’ या उत्तरातील संयम व समंजसपणा वाखाणण्याजोगा आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर झालेल्या सन १९६२च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला देदीप्यमान यश लाभले. त्याचा उल्लेख करत तर्कतीर्थांनी आपल्या १३ मार्च १९६२च्या पत्रात लिहिले होते की, ‘‘महाराष्ट्राला जणू काय ईश्वरी संकेत असावा, अशा प्रकारचे राजकीय स्थान गेल्या तीन वर्षांतील घडामोडींनी व विशेषत: अखेरच्या निवडणूक निकालाने प्राप्त झाले आहे. शिखरावर वस्तू फार वेळ टिकाव धरू शकत नाही असे म्हणतात. परंतु, एका शिखरावरून अधिक वरच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न सुरू झाला तर मात्र वस्तू पहिल्या शिखरावरून खाली घसरत नाही.’’ या मजकुरास प्रतिसाद देत आपल्या १२ एप्रिल १९६२च्या पत्रात यशवंतराव चव्हाण लिहितात, ‘‘शिखरावरील वस्तूचा दृष्टांत हृद्या वाटला. महाराष्ट्र काँग्रेसच्या घवघवीत यशामुळे तिच्यावर स्वाभाविकपणे येऊन पडलेली जबाबदारी व भारतीय संघटनेच्या व्यापक भूमिकेवरून तिला पार पाडावयास लागणारी कर्तव्ये, यासंबंधीचे आपले विचार कळले. कार्यकर्त्यांची वैचारिक वा बौद्धिक तयारी करण्याचे अधिकाधिक प्रयत्न होणे अगत्याचे आहे. आपल्या विचारांशी मी सहमत आहे.’’

अशाच एका पत्रात तर्कतीर्थांनी, ‘‘राजकारणात व्यावहारिक व तात्त्विक ज्ञान कार्यकर्त्यांना देण्याची आवश्यकता विशद करत कर्म व ज्ञान यांची जोडी पक्ष्याच्या दोन पंखांप्रमाणे उपयोगी पडते,’’ असे म्हटले होते. त्यास प्रतिसाद देत त्यासाठी मानव संस्कृती संस्था स्थापनेसंबंधी सकारात्मक पाऊल उचलण्याची हमी यशवंतराव चव्हाण यांनी तर्कतीर्थांना दिली होती. हा सारा पत्रव्यवहार या उभयतांमधील सद्भाव, सहकार्य, साहचर्याचा तद्वतच राजकीय सहप्रवासाचा म्हणून महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज म्हणून आपणासमोर येत राहतो.

drsklawate@gmail.com