‘ All who die by the way, whether by land or by sea, or in battle against the pagans, shall have immediate remission of sins. This I grant them through the power of God with which I am invested.’
– Pope Urban II,
Speech at Council of Clermont, 1095
अकराव्या शतकात साक्षात सम्राटाला नमवून कॅथोलिक चर्च सर्वव्यापी सत्ता म्हणून उदयास आलं; पण हे सर्वव्यापी ‘ख्रिस्ती वास्तव’ अस्तित्वात येण्यासाठी शतकांचा प्रवास करावा लागला. खरंतर, इसवी चौथ्या शतकापर्यंत बहुतांश रानटी समजल्या जाणाऱ्या फ्रॅन्क, व्हॅन्डल्स, व्हिजिगोथ, ऑस्ट्रोगोथ, सेल्टिक, व्हायकिंग सारख्या जमाती आपापल्या पारंपरिक धर्मश्रद्धांना धरून होत्या. मात्र चौथ्या शतकापासून ख्रिस्ती धर्माची झपाट्यानं वाढ झाली. उदा.- फ्रान्सला फ्रान्स म्हणून ओळख मिळवून देणारा फ्रॅन्क जमातीचा राजा क्लोव्हिस सहाव्या शतकात ख्रिस्ती झाला. ख्रिस्ती धर्माला अनुरूप सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक ढाचा निर्माण करण्याचं काम सुरूच राहिलं. समाजाच्या अंतर्बाह्य ख्रिस्ती करणाच्या या प्रक्रियेत नव्याने या धर्मात दाखल होणाऱ्या जमातींच्या पूर्वीच्या सांस्कृतिक ढाच्याची विल्हेवाट कशी लावली गेली हे जाणून घेणं आवश्यक आहे.
मध्ययुगाला ‘अंधारयुग’ म्हटलं जातं, त्याउलट, पाश्चात्य संस्कृतीचा वारसा शेकडो वर्षं जपण्याचं श्रेय कॅथोलिक चर्चला दिलं पाहिजे, असाही युक्तिवाद केला जातो. वस्तुस्थिती अशी आहे की कॅथोलिक चर्चनं ख्रिस्ती चौकटीला पूरक अशाच गोष्टी जतन केल्या. बाकीच्या गोष्टी एकतर नष्ट केल्या किंवा विपर्यास करून त्यांना ख्रिस्ती मुलामा दिला गेला. उदाहरणार्थ, बायझंटाईन रोमन सम्राट जस्टिनियन मध्ययुगाच्या सुरुवातीलाच, इ. स. ५२९ मध्ये प्लेटोद्वारा स्थापीत तत्त्वज्ञानाची अकॅडमी बंद करतो. जस्टिनियन हा ख्रिस्ती धर्माला समर्पित सम्राट असल्यानं या धर्माशी विसंगत सगळ्या वैचारिक, सांस्कृतिक गोष्टी नष्ट करणं हे तो धर्मकर्तव्य समजत असे. ही कृती मध्ययुगाविषयी बरंच सांगून जाते.
प्लेटोनं इ.स.पूर्व ३८७ मध्ये अॅकॅडमीची स्थापना करून प्राचीन काळी तत्त्वज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. मात्र तब्बल ९१६ वर्षांनंतर ती बंद करून जस्टिनियननं प्राचीन तत्त्वज्ञानाचा अधिकृत शेवट घडवून आणला. अर्थात, रोमन साम्राज्याचे दोन भाग होते. रोमस्थित पाश्चात्त्य रोमन साम्राज्य आणि कॉन्स्टॅन्टिनोपल (आजचं इस्तंबूल) स्थित बायझंटाईन साम्राज्य. पाश्चात्य रोमन साम्राज्याचा शेवट इ. स. ४७६ मध्ये झाला. मात्र बायझंटाईन साम्राज्य इ. स. १४५३ पर्यंत टिकून होतं. मध्ययुगाची सुरुवात पाचव्या शतकातल्या पाश्चात्य रोमन साम्राज्याच्या शेवटानं होते; तर पंधराव्या शतकात पौर्वात्य रोमन साम्राज्याच्या शेवटानं मध्ययुगाचा अंत होतो, अशी मांडणी सर्वसाधारणपणे केली जाते. या हजार वर्षांच्या मध्ययुगीन काळात ईश्वरनिंदा- हेरेसी-च्या नावानं ‘शट् डाऊन फिलॉसॉफी’ सारखी बुद्धीविरोधी मोहीम धर्मकृत्य म्हणून सातत्यानं राबवण्यात आली. त्यामुळे सॉक्रेटिसचा अगोरा ओस पडला. प्लेटोची अॅकॅडमी बंद केली गेली. अॅरिस्टॉटलचं लायसिअम विस्मृतीत लोटलं गेलं. एपिक्युरसचा बगीचा बेचिराख झाला. स्टोइकांचा स्टोइआ (दगडी द्वारमंडप) चर्चशी जोडला गेला. ही सगळी तत्त्वज्ञानाची ठिकाणं, फक्त गतकाळाच्या आठवणी म्हणून उरली. खरंतर त्या आठवणींनाही पुसण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.
मध्ययुगात सॉक्रेटिक वारशाचा शेवट होऊन तत्त्वज्ञान स्वायत्तता आणि प्रतिष्ठा गमावून बसलं आणि तत्त्वज्ञानाला चर्चच्या आवारातच, ख्रिस्ती ‘डॉक्टरां’च्या देखरेखीखाली अंकित म्हणून वावरावं लागलं, हे खरं. पण मध्ययुगाला पूर्णपणे नापीक म्हणता येणार नाही कारण कॅथोलिक चर्च या काळात प्रचंड उद्यामशील होतं. ऑगस्टिन आणि टॉमस अॅक्विनास सारखे दिग्गज, तसंच असंख्य अनामिक ख्रिस्ती उपदेशक आणि धर्मगुरू युरोपीय समाजाचं अंतर्बाह्य इंजिनीअरिंग करत होते. समग्र समाजमनाला ख्रिस्ती वळण देण्यासाठी चिवटपणे विचारप्रणालीत्मक अभियान राबवत होते. तत्त्वज्ञानात्मक सिन्थेसिस (संगम) घडवतानाच ते पूर्वसुरींच्या विचारांतून ख्रिस्ती चौकटीला पूरक गोष्टीच कायम ठेवत होते. उदा.- ऑगस्टिननं ‘सिटी ऑफ गॉड’ची रचना करताना प्लेटोच्या चिद्वादाचा आधार घेतला, तर पुढे टॉमस अॅक्विनासनं ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अॅरिस्टॉटलच्या ‘प्राईम मूव्हर’ अर्थात आद्या कारक या संकल्पनेचा वापर केला. स्टोइकांचा विरक्तीभावही कॅथोलिक चर्चच्या परलोकवादी जीवनदृष्टीला पूरक ठरला. एपिक्युरस सारखा भौतिकवादी मात्र पचवता आला नाही. त्याचं साहित्य नष्ट करून त्याची विपर्यस्त मांडणी झाली.
ही झाली सर्वसामान्यांना अनाकलनीय वाटणारी सूक्ष्म तत्त्वज्ञानात्मक काथ्याकूट. त्यांना ख्रिस्ती चौकटीत कसं धरून ठेवता येईल हा चर्चसमोरचा महत्त्वाचा प्रश्न होता. नव-ख्रिस्ती जमातींची पूर्वीची ख्रिास्तेतर जीवनदृष्टी, चालीरीती, रूढी-परंपरा, सण-उत्सव, लोकसाहित्य या बहुजिनसी सांस्कृतिक वास्तवाचं किमान एकजिनसीकरण करणं चर्चसाठी अत्यावश्यक काम होतं. कुठल्याही सामाजिक अवकाशाचं ‘प्रभावी नियोजन, नियमन आणि नियंत्रण’ करण्यासाठी त्यात किमान एकजिनसीपणा हवाच, अशा विचारानं या जमातींच्या मौखिक परंपरेतल्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक साहित्याचं संकलन करून त्यावर सूक्ष्म धार्मिक संस्कार करण्यात आले. मौखिक साहित्यातून रूपककथा, मिथककथा, दंतकथा असं विपुल कॅथोलिक साहित्य निर्माण करण्यात आलं आणि त्यातून चर्चला समाजमनावर नियंत्रण मिळवणं शक्य होऊ लागलं.
रोलॅन्डचं प्रसिद्ध शौर्यगीत मौखिक साहित्याच्या ख्रिस्तीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. मध्ययुगात ‘Chansons de Geste’ अर्थात शौर्यगीतं (युरोपीय समाजातील पराक्रमी पुरुषांच्या शौर्याच्या आठवणींना उजळा देणारे पोवाडे) हा मौखिक साहित्य प्रकार होता. सण, उत्सव आदी प्रसंगी ही गीतं रंगवून गायली जात. अलेक्झांडर, आर्थर आणि त्याचे सरदार, शार्लमेन अशा ऐतिहासिक व्यक्तींबद्दल अशी हजारो शौर्यगीतं होती. Troubadour नावाने ओळखला जाणारा भटका समुदाय उपजिविकेचं साधन म्हणून गावोगावी ही गीतं गायचा. सामूहिक मनोरंजनासह पराक्रमी पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देणं, सांस्कृतिक आणि नैतिक शिक्षण घडवणं आणि तत्कालीन मूल्यव्यवस्था बिंबवणं हेही या जनसाहित्याचं उद्दिष्ट होतं. अकराव्या शतकात चर्चनं या मौखिक साहित्याचं संकलन करून त्याला लिखित स्वरूप दिलं आणि पुढं त्याचा वापर धार्मिक चौकटीला बळकटी प्रदान करण्यासाठी केला.
यापैकी रोलॅन्डचं शौर्यगीत (Chanson de Roland) हे सगळ्यात प्रसिद्ध. या शौर्यगीताचा नायक- शूर ख्रिस्ती योद्धा रोलॅन्ड- हा सम्राट शार्लमेनच्या दरबारातला महत्त्वाचा सरदार. त्याच्या शौर्यगीताचा हृदयद्रावक आशय म्हणजे धर्मशत्रू मुस्लिमांच्या विरोधात तो कशा प्रकारे प्राणपणाने लढला आणि शेवटी त्याने कसं हौतात्म्य पत्करलं. जवळपास हजार ओळींच्या या गीताची सुरुवात सम्राट शार्लमेनच्या भव्यदिव्य वर्णनानं होते. ख्रिस्ती धर्मरक्षक सम्राट शार्लमेन मुस्लिमांना रोखण्यासाठी दक्षिण दिशेला मोहीम आखतो, पण शत्रूला नमवून त्याला ख्रिस्ती धर्माचं श्रेष्ठत्व स्वीकारायला भाग पाडून परतताना ‘मूल्यहीन मुस्लिम शार्लमेनचा विश्वासघात करतात’ असं याचं कथानक. पिरेने पर्वतरांगांत, रोन्सव्होच्या खिंडीत घात करून शार्लमेनच्या धर्मरक्षक सैन्याची कत्तल होते. त्या तुकडीची जबाबदारी रोलॅन्डवर असल्याने त्याला ‘विश्वासघातकी धर्मशत्रूंशी लढताना वीरगती’ मिळते. आपल्या प्रिय योद्ध्याचा घात झाल्याची बातमी कळल्यावर सम्राट शार्लमेन हळहळतो आणि शेवटी धर्मशत्रूंना धडा शिकवण्याची शपथ घेतो.
रोलॅन्डचं शौर्यगीत हे इ.स. ७७८ मध्ये घडलेल्या ‘रोन्सव्हो खिंडीतल्या लढाई’वर आधारित आहे. ऐतिहासिक तथ्य असं की, तत्कालीन फ्रॅन्क सम्राट शार्लमेन अनेक महिने स्पेनच्या मोहीमेवर असताना उत्तरेत बंडखोरी सुरू झाल्यानं स्पेन-मोहीम मध्येच सोडून त्याला उत्तरेत रवाना व्हावं लागतं. वाटेत स्पेन आणि फ्रान्सला विभाजित करणाऱ्या पिरेने या पर्वतरांगांमध्ये अरुंद रोन्सव्हो खिंड आहे. शार्लमेनचं बहुतांश सैन्य खिंडीपल्याड पोहोचतं, पण रीअरगार्ड अर्थात सैन्याचा शेवटचा भाग मागे शिल्लक राहतो. ‘बास्क’ नावाची पर्वतीय जमात त्या तुकडीला खिंडीत गाठून सगळ्यांची कत्तल करते. या शेवटच्या तुकडीची जबाबदारी रोलॅन्डवर असल्यानं या धुमश्चक्रीत तोही मारला जातो.
इथं नमूद करणं गरजेचं आहे की बास्क नावाची पर्वतीय जमातसुद्धा ख्रिस्तीच होती. शार्लमेनच्या सैन्यानं परत येताना वाटेत या जमातीची गावं लुटून अत्याचार केल्यामुळे त्यांनी रोन्सव्होच्या खिंडीत सूड उगवला. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आधुनिक पाश्चात्य इतिहासकारांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेली आहे. पण अकराव्या शतकात या ऐतिहासिक सत्याचा शोध घेणं शक्य नव्हतं. कारण चर्च सांगेल ते सत्य मानणं धर्मकर्तव्य होतं आणि प्रश्न उपस्थित करणं धर्मद्रोह समजला जाई.
बरोबर याच काळात म्हणजे इ. स. १०९५ मध्ये पोप दुसरा अर्बन त्यांचं ऐतिहासिक भाषण देतात, जे वणव्यासारखं ख्रिस्ती जगात पसरतं. इस्लामचा प्रसार वेगानं होऊन जेरुसलेमवर मुस्लिम ताबा मिळवतात तेव्हा हे पोप अतिशय विदारक चित्र रेखाटतात की कशाप्रकारे आपल्या ख्रिस्ती बांधवावर अनन्वित अत्याचार होत आहेत. या भाषणानंच पुढली दोनशे वर्षे चालणाऱ्या धर्मयुद्धाला तोंड फुटलं. या धर्मयुद्धांच्या काळात रोलॅन्डच्या शौर्यगीताचा वापर लोकांना चेतवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. धर्मयोद्ध्यांना पोपचं वचन असतं की, जो कुणी येशूच्या पावनभूमीच्या मुक्तीसाठी लढेल त्याची सगळ्या पापांतून बिनशर्त मुक्ती केली जाईल.
खरंतर, कॅथोलिक चर्चनं घडवून आणलेली एकजूट फारशी यशस्वी ठरत नाही. दोनशे वर्षांच्या या धर्मयुद्धांत शेवटी पाश्चात्त्य जगाचा पराभव होतो. इ. स. १४५३ मध्ये तर पौर्वात्य रोमन साम्राज्याचा पाडाव होऊन ओटोमन तुर्कांची सत्ता युरोपच्या दारापाशी पोहोचते. मात्र पंधराव्या शतकानंतर ख्रिस्ती धर्मसत्तेला कोपऱ्यात बसवून पाश्चात्त्य जगात अंधारयुगाचा शेवट घडवला जातो. पुढल्या (आधुनिक) काळात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने समृद्ध पाश्चात्त्य जग निर्णायक मुसंडी मारून जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करतं. पहिल्या महायुद्धानंतर ओटोमन साम्राज्याचे तुकडे करून परत जेरुसलेमचा ताबा मिळवतं. थोडक्यात, दारिद्र्य, अविद्या, भीती आणि कट्टरवादामुळे निर्माण झालेली एकजूट तकलादू आणि आभासी ठरते.