‘जो बीवी से सचमुच करें प्यार, वो ‘प्रेस्टीज’से कैसे करें इन्कार’ अशी प्रेशर कुकरची तद्दन भावनिक जाहिरात ‘दूरदर्शन’हे सरकारी माध्यमच एकमेव चित्रवाणी वाहिनी असतानाच्या काळात प्रसृत झाली, तेव्हा खरे तर ग्राहक चळवळ जागरूक होती. तरीही त्या जाहिरातीवर कोणी आक्षेप घेतले नाहीत. याचे कारण मात्र विज्ञानाशी निगडित होते. प्रेशर कुकरला शिट्टीखेरीज ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असूनही वाफ आतल्याआत कोंडली जाण्याच्या तक्रारींमुळे हे उत्पादन विकले जात नव्हते. यावर तोडगा म्हणून, कुकरच्या झाकणात ‘रिंग’ (गास्केट) असते तिथून तरी अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी वाफेला वाट मिळावी, यासाठी एक चीरवजा भोक झाकणाला पाडण्यात आले. या सुविधेचे नाव ‘गास्केट रिलीज सिस्टीम’अर्थात ‘जीआरएस’. ती आमच्या कुकरमध्ये आहे, म्हणजेच कुकरचा वापर सुरक्षित असावा ही स्वयंपाक करणाऱ्यांबद्दलच्या प्रेमातूनच आलेली तुमची मागणी आम्ही पूर्ण केलेली आहे, अशी ती जाहिरात होती.
तरीही ‘स्वयंपाक काय फक्त ‘बीवी’नेच करावा का?’ हा प्रश्न उरतोच. ‘जीआरएस’सारखा काहीएक सुरक्षा उपाय आपल्या कंपनीच्या कुकरमध्ये असलाच पाहिजे, हा आग्रह ज्यांनी तडीस नेला, ते ‘टीटीके प्रेस्टीज’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक टी. टी. जगन्नाथन यांना हा प्रश्न कुणी विचारला होता की नाही माहीत नाही. त्यांच्या ‘डिसरप्ट ॲण्ड कॉन्कर : हाउ टीटीके प्रेस्टीज बिकेम अ बिलियन डॉलर कंपनी’ या आत्मचरित्रातही तसा थेट प्रश्न विचारल्याचा उल्लेख नाही. परवाच्या शुक्रवारी (१० ऑक्टोबर) त्यांचे निधन झाल्यामुळे आता हे कुतूहल शमणे कठीणच. पण समजा, ‘स्वयंपाक फक्त स्त्रियांचेच काम, असे का समजता?’ असे कुणी जगन्नाथन यांना विचारले असतेच तर तत्क्षणी उत्तर आले असते : मी वयाच्या आठव्या वर्षापासून आवडीने स्वयंपाक करतो आहे!
वास्तविक जगन्नाथन हे तसे बड्या घरचेच. त्यांचे आजोबा टी. टी. कृष्णम्माचारी ऊर्फ टीटीके- स्वतंत्र भारताचे (नेहरूकाळातले, सहावे) अर्थमंत्री! त्यांनी स्थापलेल्या ‘टीटीके इंडस्ट्रीज’ची स्थिती मात्र देशातल्या त्या वेळच्या अन्य खासगी उद्योगांप्रमाणेच रुटुखुटू. जगन्नाथन हुशार निघाले, आयआयटी चेन्नईत सुवर्णपदक मिळवून अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात पीएच.डी.साठी गेले. पण १९७२ मध्ये ‘टीटीके इंडस्ट्रीज’चे वासे पोकळ झाले, दिवाळखोरीची स्थिती आली, अशा वेळी वडील टी. टी. नरसिंहन यांनी मुलाकडे कंपनीची सूत्रे दिली. आजोबा १९७४ मध्ये वारले, तोवर कंपनी बऱ्यापैकी सुरू राहिलीच, पण १९७५ नंतर तिची भरभराट होत गेली. ग्राहकांच्या तक्रारींवर उपाय शोधल्यानेच कंपनी वाढली. मग स्वयंपाकघरातल्याच अन्य वस्तूही या कंपनीने बाजारात आणल्या. ‘टीटीके प्रेस्टीज’च्या विक्रीचा वार्षिक आकडा मार्च २०२५ अखेर २५३० कोटी रुपयांवर होता आणि स्वयंपाकघरातल्या उपकरणांच्या बाजारपेठेचा ४० ते ४५ टक्के हिस्सा आज या कंपनीने व्यापला आहे.
या कंपनीच्या अध्यक्ष पदावरून २५ मार्च २०२५ रोजी ते निवृत्त झाले. त्याआधी १९७२ ते २०१९ अशी २६ वर्षे ते व्यवस्थापकीय संचालक होते. त्यानंतर अध्यक्ष (आणि बिगरव्यवस्थापकीय संचालक) हे पद स्वीकारून त्यांनी सूत्रे पुढल्या पिढीकडे- टी. टी. मुकुंद आणि लक्ष्मणन यांच्याकडे त्यांनी सोपवली होती.