‘श्री महालक्ष्मी नम:’ हा मंत्र १०१ वेळा म्हणा अशी सूचना मिळताच समोरच्या पाचही जणांनी तो म्हणायला सुरुवात केली. तेवढय़ा वेळात ज्योतिषाने समोरच्यांचे चेहरे न्याहाळत काही आकडेमोड केली. मंत्रोच्चार पूर्ण होताच ते चड्डी, बनियानवर असलेले तरुण मोठय़ा आशेने समोर बघू लागले. ‘‘हं.. तर तुम्हाला दरोडय़ासाठी स्थळनिश्चिती व मुहूर्त हवाय’’ असे ज्योतिषाने म्हणताच साऱ्यांचे डोळे लकाकले. ‘‘येथून म्हणजे कसब्यातून ७० किलोमीटरवर असलेली बारामती उत्तम जागा आहे. सध्या हे शहर सत्ताधाऱ्यांनी तेथील पुतण्यावर टाकलेल्या दरोडय़ामुळे देशभर गाजतेय. त्या शहरात सध्या याच दिवसाढवळय़ा पडलेल्या दरोडय़ाची चर्चा सर्वत्र आहे. दोघांवरही सारखेच प्रेम करणाऱ्या सामान्य बारामतीकरांमध्ये दुभंग निर्माण झालाय. परिणामी काका की पुतण्या असा कौल घेण्यासाठी अनेक लोक देवदर्शनाला जाताहेत. तुम्हाला घरे मोकळी मिळतील. सोन्यासारखा पुतण्या पळवल्याची चर्चा असल्यामुळे तुम्ही २०-२५ तोळे सोने लुटले तरी कुणी ते गांभीर्याने घेणार नाही. तुम्हा सर्वाची ग्रहस्थिती उत्तम. फक्त एकाचा गुरू बलस्थानात नाही, त्यामुळे त्याला मागे ठेवा. पहाटे ३ वाजून १५ मिनिटे व ५१ सेकंदाचा मुहूर्त चांगलाय.
नंतरचा एक तास ३३ मिनिटे व चार सेकंदाचा काळ अनुकूल. तेवढय़ा वेळात दरोडा टाकून व्हायला हवा. आता तुमची शस्त्रे दाखवा.’’ हे ऐकताच सर्वानी कपडय़ात दडवलेले पिस्तूल, चाकू, सुरे बाहेर काढले. ज्योतिषांनी मंत्रपुष्पांजली म्हणत त्यांची पूजा केली. ‘‘आमचे शास्त्र खुनाला परवानगी देत नाही, उलट खून कसा टाळता येईल यावर उपाय सांगते. त्यामुळे घरात कुणी असेलच तर मारहाणीवरच निभावून न्या. पिस्तुलाचा वापर शक्यतो टाळा. रोख रक्कम व सोने लुटल्यावर ते पोतडीत भरताना हा अंगारा त्यावर टाका. त्यामुळे ऐवजाचे वजन कमी झाल्याचा भास तुम्हाला सतत होईल. लूट सुरू करण्याआधी मी तुम्हाला देणार असलेले मंतरलेले गंध कपाळावर लावा. दुश्मन म्हणजेच पोलिसांना रोखण्याची ताकद त्यात आहे. कामगिरी फत्ते झाल्यावर शहराबाहेर पडताना गोविंदबागेचा रस्ता धरू नका. आजकाल तिथे रात्रभर खलबते सुरू असतात व बंदोबस्तही मोठा असतो. त्यामुळे वेगळय़ा वाटेने पसार व्हा.’’ हे ऐकून त्या पाचातला एक म्हणाला, ‘‘तुमची दक्षिणा किती? पोलीस पकडणार नाही याची गॅरंटी काय?’’ हे ऐकताच ज्योतिषी हसले. ‘‘मी एकूण लुटीच्या दहा टक्के घेतो आणि गॅरंटीचे म्हणाल तर सत्तेच्या प्रोत्साहनामुळे २०१४ पासून आमचे शास्त्र बरेच अचूक झालेले.’’ हे ऐकताच सर्व सुटकेचा नि:श्वास टाकत बाहेर पडले. तीन महिन्यांनंतर या सर्वाना पोलिसांनी अटक केली व कोठडीत डांबले. त्यांची मस्तपैकी धुलाई केल्यावर मुहूर्त पाहून दरोडय़ाचा उलगडा झाल्याने पोलीस चक्रावले. त्यातल्या एका चौकस अधिकाऱ्याने ज्योतिषाला बाजूला घेत विचारले, ‘‘तुझा मुहूर्त चुकला कसा ते सांग?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘सध्या बारामतीवर शनी व मंगळाची अनिष्ट युती झालेली आहे. त्यामुळे माझा मुहूर्त तर चुकलाच, पण पुतण्याचाही चुकला म्हणून त्यांना सर्वोच्च पद हुलकावणी देत आहे.’’ हे ऐकून पोलिसांनी ज्योतिषाला बदड बदड बदडले.
