पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय तथा राज्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक स्तरावरच्या लोकप्रतिनिधींना सप्रेम नमस्कार. जगातील सर्वात मोठा असे बिरुद अभिमानाने मिरवणारा आपला पक्ष शिस्तीचा किती भोक्ता आहे हे तुम्ही जाणताच. पक्षाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्याची सवय यातूनच तुम्हा सर्वाना लागली आहे. आता त्याचाच एक भाग म्हणून या निवडणूक वर्षांत आधी महाराष्ट्रात वापरल्या गेलेल्या ‘मी पुन्हा येईन’ या लोकप्रिय वाक्याला केंद्रस्तरावर बढती देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. परवा विश्वगुरूंनी देशाला संबोधित करताना याची सुरुवात करून पक्षाच्या या नव्या मोहिमेचा प्रारंभ केला व हे वाक्य केवळ शब्दाचा बुडबुडा नाही तर आत्मविश्वासाने भरलेला हुंकार आहे याची जाणीव सर्वाना करून दिली. त्याला मिळालेला प्रतिसाद बघून आता सर्वाना हे वाक्य वापरण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात येत आहेत. ‘मी पुन्हा’मुळे एक वेगळय़ाच प्रकारची ऊर्जा शरीराला प्राप्त होते व दिव्यत्वाच्या अनुभूतीचा साक्षात्कार होतो. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी महिन्यातून किमान तीन तर मंत्र्यांनी प्रत्येकी पाच वेळा याचा प्रयोग भाषणात करायचा आहे. बाकी लोकप्रतिनिधींनी प्रत्येक जाहीर संबोधनात हे वाक्य वापरले तरी चालेल. मूळ वाक्य मराठीतील असले तरी देशभरात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेतून ते वापरण्याची मुभा सर्वाना देण्यात येत आहे. तरीही पक्षाचे धोरण म्हणून याच्या हिंदी अनुवादाला प्रत्येकाने प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा आहे. याचे भाषांतर करताना ‘येईन मी पुन्हा’, ‘येईन पुन्हा मी’, ‘मी येईन पुन्हा’ अशी शब्दांची फिरवाफिरव करून अजिबात गोंधळ निर्माण करायचा नाही. मूळ वाक्यात असलेली ऊर्जा या फिरवाफिरवीतून कमी होण्याचा धोका आहे याचे भान प्रत्येकाने ठेवायचे आहे. हे वाक्य वापरल्यामुळे महाराष्ट्रातील ‘भाऊं’ना अडीच वर्षे सत्तेबाहेर राहावे लागले असा दुष्ट तर्क कुणी काढू नये.

उलट याच वाक्यामुळे सत्ताप्राप्तीची ऊर्जा त्यांच्या मनात सतत प्रज्वलित होत राहिली व त्या बळावर ते यशस्वी झाले हा ताजा इतिहास प्रत्येकाने ध्यानात ठेवावा. यातला ‘मी’ कायम गुरुस्थानी राहात असल्याने तो पराभवाची भीती मनातून काढून टाकण्यास मदत करतो. समोर पराभव दिसत असेल तरी जोडतोडीचे राजकारण करून त्यावर मात कशी करायची याची शिकवण सतत देत असतो. सामान्य कार्यकर्ता ते नेते, या सर्वाकडून या तीन शब्दांचा मारा जनतेवर सतत होत राहिला तर त्यांच्यातही ‘यांच्याशिवाय पर्याय नाही’ अशी भावना निर्माण होईल व विरोधकांकडून त्यांच्या मनात निर्माण केला गेलेला संभ्रम दूर होईल याची खात्री पक्षाला झाली आहे. सततच्या माऱ्यांमुळे सत्ताप्राप्ती हेच या वाक्याला पूर्णत्व बहाल करू शकते असा समज एकदा जनतेत रूढ झाला की त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, विरोधकांच्या दृष्टीने काही अनैतिक गोष्टी, या साऱ्यांना नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा अधिकार आपल्याला मिळेल व पक्षाची पावले कायम सत्तेच्या दिशेने पडू लागतील. या वाक्याची नजाकत अशी की ते जनतेला तुम्ही देत असलेल्या आश्वासनाशी बेमालूमपणे जोडता येते. त्यामुळे ते उत्स्फूर्तपणे तुमच्या तोंडून निघाले असा भास निर्माण करता येतो. तरीही ते उच्चारताना त्यातून अहंकाराचा दर्प जाणवणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून आपण या नव्या मोहिमेत सामील व्हाल या अपेक्षेसह.

आपला राष्ट्रीय महामंत्री