हरियाणातील गुर्दवाडात गावकुसाबाहेर राहणाऱ्या ट्रकचालक सतनामला त्याच्या झोपडीबोहर जमलेल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोडय़ावर बसवले तेव्हा त्याचा विश्वासच बसेना! आपल्यासारख्या मागासांना लग्नात घोडा नाकारणारे हेच का ते, असा प्रश्न त्याला पडला. मिरवणूक सभास्थानाकडे निघाली. राहुल गांधी आपल्या ट्रकमध्ये बसल्याने एवढे परिवर्तन घडू शकते याची त्याला खात्री पटेना! स्थानिक नेत्यांची भाषणे सुरू झाली. ‘गाव की शान, हमारा सतनाम’ असे नारे दिले गेले. गावाचा लौकिक वाढवणाऱ्या या चालकाला काहीही कमी पडू दिले जाणार नाही, सतनामने चालकाची नोकरी सोडून पक्षात सामील व्हावे, त्याला पंचायतीचा मेंबर म्हणून निवडून आणू असाच साऱ्यांचा सूर होता. शेवटी त्याला बोलण्यासाठी उभे करण्यात आले. त्याने राहुल गांधींना सांगितलेल्या चालकांच्या समस्या सांगायला सुरुवात करताच कार्यकर्ते ‘ये तो सब हमे मालूम है, राहुलजी काय बोलले ते सांग’ असा आग्रह धरू लागले. ते खूप चांगले ‘इन्सान’ आहेत. त्यांनी घरची चौकशी केली. झोप आली तर काय करता, नियमांचे पालन करता का, नशापानी करत ट्रक चालवता का असे अनेक प्रश्न विचारले. आमच्यासोबत काली दाल व रोटी खाल्ली असे सांगून सतनाम थांबला. सर्वात शेवटी सभेचे अध्यक्ष बोलायला उभे राहिले. ‘राहुलजींनी ट्रकने प्रवास करून हरियाणातील पक्षसंघटनेत चैतन्य निर्माण केले आहे. आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. देशभरात ९० लाख ट्रकचालक आहेत. त्यातले निम्मे आपल्या भागातले. त्यांच्या समस्यांना वाचा फोडून आम्ही गरिबांसोबत आहोत हे राहुलजींनी दाखवून दिले. त्यांच्या समस्येचे प्रतीक ठरलेला सतनाम हा आपल्या गावचाआहे याचा आम्हाला अभिमान आहे. त्याला काहीही कमी पडू दिले जाणार नाही. प्रचारातही सोबत घेतले जाईल. एखाद्या नामांकित पहिलवानासारखी वागणूक त्याला दिली जाईल अशी ग्वाही मी देतो. गांधी कुटुंब गरिबांचा कसा विचार करते हाच संदेश यातून सर्वत्र पोहचवायचा आहे तेव्हा सर्वानी आता निवडणुकीच्या कामात स्वत:ला झोकून द्यावे.’ भाषण संपताच टाळय़ांचा कडकडाट झाला. शाल, श्रीफळ व रोख रकमेचे पाकीट घेऊन सतनाम घरी आला तेव्हा प्रचंड दमलेला होता. थोडय़ाच वेळात त्याच्या घरासमोर बूमधारी पत्रकार गोळा होऊ लागले. त्यातल्या प्रत्येकाशी बोलताना तो जेव्हा राहुलजींना सांगितलेल्या चालकांच्या समस्या सांगायला सुरुवात करायचा तेव्हा त्याला पत्रकार चूप करायचे. राहुल काय म्हणाले, कोणत्या सीटवर बसले, त्यांनी डोळे मिटून डुलकी  घेतली का, सेल्फी काढला का, क्लिनरशी काय बोलले, ट्रकचा वेग किती होता, ते धाब्यावर खाटेवर बसून जेवले की टेबलवर, त्यांनी रोटी खाल्ली की नुसती दाल, ट्रकमध्ये चढताना व उतरताना त्यांना कुणी आधार दिला का, सर्वाचे जेवणाचे बिल त्यांनी दिले की तुम्ही तुमचे दिले? शेवटी कंटाळून सतनामने मुलाखती थांबवल्या व स्वत:ला घरात कोंडून घेतले. राहुलजी सोडले तर कुणालाच चालकांच्या समस्यांविषयी काही घेणेदेणे नाही. राज्यात सत्ता आली तर कदाचित तेही आपल्याला विसरतील असा विचार मनात येताच तो हिरमुसला. तेवढय़ात ट्रकमालकाचा फोन वाजला. ‘ओये कहा है तू, गाडी कौन चलायेगा’ हे वाक्य ऐकताच भानावर येत तो ‘मै भला, मेरा ट्रक भला’ असे म्हणत गॅरेजकडे निघाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chashma satnam a truck driver lives outside village in a gurdwad in haryana ysh
First published on: 25-05-2023 at 01:58 IST