सर्व जनतेला सूचित करण्यात येते की, अस्थिर वातावरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाला सध्या ‘कलंकित कावीळ’ या नव्या आजाराने ग्रासले आहे. ऐन पावसाळय़ात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सामान्यांच्या मनात घबराटीची भावना निर्माण होऊ शकते. ती व्हायला नको या शुद्ध हेतूने हे आवाहन करण्यात येत आहे. मुख्यत: हा आजार दूषित पाण्याने होत नाही तर बिनपाण्याने हजामत करण्याची सवय जडलेल्यांना होतो. याने ग्रस्त असलेल्यांचे डोळे पिवळे दिसत नाहीत पण तप्त मेंदूमुळे त्यांना सारे काही कलंकित दिसते तेही पिवळसर स्वरूपात. या रोगाची लागण राज्यातील प्रामुख्याने ज्येष्ठ नेत्यांना झाल्याचे दिसून आले असून त्याचे स्वरूप साथरोगासारखेच असल्याने नवागत नेत्यांनी अशांपासून अंतर राखणे राजकीय आरोग्यासाठी हिताचे राहील. कलंक शब्दाचा वापर करत एकमेकांवर बेताल आरोप करणे व मेंदू वैचारिक कुंठताग्रस्त होणे हे या आजाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. वडिलांची कीर्ती वारंवार सांगूनही यश मिळत नसेल तर येणाऱ्या खिन्नतेतून हा आजार लवकर बळावतो. ध्येयनिष्ठ राजकारण करमणुकीच्या अंगाने जाऊ लागले की या काविळीची लक्षणे दिसू लागतात. मग मनोरंजन करण्याच्या नादात जिभेवरचे नियंत्रण सुटलेले दिसले की रोगी लगेच ओळखता येतो.

वरिष्ठांच्या आशीर्वादाच्या बळावर राजकीय घरफोडीचे गुन्हे करण्यात पारंगत झालेल्या व्यक्तीला सुद्धा हा आजार झाल्याचे अलीकडे निदर्शनास आले आहे. बूमधाऱ्यांसमोर सातत्याने ज्ञान पाजळण्याची सवय जडलेल्या व्यक्तीच्या शरीरात या आजाराचे विषाणू अतिशय वेगाने पसरतात असेही एका पाहणीत आढळून आले आहे. सतत चप्पल, जोडे मारण्याच्या बाता करणे, कसे फिरता ते बघू अशी धमकी देणे, वारंवार बाप काढणे, अवलादीचा उल्लेख करणे, टोमणे मारत मारत बोलणे अशी लक्षणे वारंवार दिसू लागल्यास संबंधित व्यक्तीच्या शरीरात हा कावीळ हळूहळू जम बसवत आहे असे समजण्यास हरकत नाही. वडिलांच्या विचारधारेला खुंटीवर टांगून असंगाशी संग करणे, भलत्यांच्या पंक्तीत बसणे, भ्रष्ट व्यक्तीला मानाचे स्थान देत एकाच ताटात जेवणे, महापुरुषांची नावे घेत समोरच्याला वारंवार डिवचणे ही सुद्धा या आजाराची प्राथमिक लक्षणे असून त्याची वारंवारिता वाढत जाताना दिसली की तो कावीळग्रस्त झाला असे समजावे.

एकमेकांना कलंकित ठरवण्याच्या नादात नेहमीच्या कावीळग्रस्ताप्रमाणेच यांचीही जेवणावरची वासना उडते. आरोप करताना घसा सुकू नये म्हणून पाण्याचा एखादा घोट घेतला तरी अशांना ऊर्जा मिळते. या आजाराचे दीर्घकालीन परिणाम काय यावर ते विचारही करत नाहीत. सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या ध्यासाने पछाडलेले हे रुग्ण सतत वाढत जाणे हा राज्याच्या राजकीय आरोग्यासाठी चिंतेचा विषय झालेला आहे. आपापले पक्ष मोठे करण्याऐवजी इतरांचे पक्ष लहान करण्याच्या प्रयत्नात आपलीच उंची कमी होत आहे हेही अशा रोग्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या आजाराचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून त्यावर अजूनतरी एकाही राजकीय संशोधकाला लस सापडलेली नाही. २०२४ पर्यंत ती सापडण्याची शक्यतासुद्धा नाही. तेव्हा जनेतेने व राजकारणात करिअर घडवू पाहणाऱ्या तरुणांनी अशा रोग्यांपासून सावध राहावे आणि कलंकशोभा टाळावी, अशी विनंती करण्यात येत आहे.

जनहितार्थ प्रसृत , राजकीय आरोग्य विभाग