उगीच तर्कटाचे जाळे विणत बसू नका. दादांच्या घशाला संसर्ग झाला हेच सत्य. अगदी त्रिवार! यात कसलेही राजकारण नाही म्हणजे नाही. आजकाल नेत्यांचे काहीही दुखले तरी त्याला राजकीय आजार म्हणण्याची प्रथाच पडली आहे. दादांना या प्रथेचे पाईक अजिबात व्हायचे नाही. राज्यातील एका उपमुख्यांचा कान दुखतो, दुसऱ्यांचा घसा. पदही सारखेच व या आजारावर उपचार करणारा तज्ज्ञही एकच, असा योगायोग तर अजिबात चर्चेत आणू नका व आता नाक कुणाचे दुखणार असा खवचट प्रश्नही विचारू नका. करोनाकाळ संपल्यावरही मुखपट्टी लावून फिरल्याने दादांच्या घशाला मोकळी हवा मिळाली नाही, म्हणून संसर्ग झाला असा अवैज्ञानिक युक्तिवाद तर अजिबात नको. दादांच्या आवाजात नेहमी जरब असते. असा आवाज काढताना घशावर ताण येतो म्हणून तो खराब झाला यातही तथ्य नाही. त्यांच्या आवाजातील जरब नैसर्गिक आहे, हे लक्षात ठेवा. राजकीय महत्त्वाकांक्षा (म्हणजे पुण्याचे पालकत्व व भविष्यात सीएम) पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी घसा ‘बसवून’ घेतला असा निष्कर्ष काढायची काही आवश्यकता नाही. आजच ते पालकत्व मिळाले तरी त्यांच्या घशावरची सूज अजिबात कमी झालेली नाही. घशावर ताण पडला तरी चालेल पण दुसऱ्या दादांच्या पालकत्वामुळे पुण्याच्या जनतेवर ताण यायला नको हाच हेतू त्यांच्या आजारपणामागे आहे असे म्हणून दादा खूश होतील याही भ्रमात कुणी राहू नका. दादा भलेही राज्याचे नेते असले तरी त्यांचे पहिले प्रेम पुण्यावर आहे. त्यासाठी त्यांना संसर्गाचे कारण देण्याची गरज नाही.

काकांनी आजवर खाऊ घातलेल्या मिठाला दादा जागले नाहीत, अचानक त्यांनी गुजरातेतून येणारे मीठ खाणे सुरू केले व त्याच मिठाच्या पाण्याच्या गुळण्या घेतल्याने घसा खराब झाला असा जावईशोध काहींनी लावला असला तरी त्यात तथ्य नाही. दादा पूर्वीही शेंदेमीठ खात व आताही तेच खातात, गुळण्यांसाठी आयोडिनयुक्त मिठाचा वापर करतात हेच खरे. त्यामुळे पक्ष पळवताना त्यांनी मिठाची बरणीही पळवली या आरोपात मुळीच तथ्य नाही. कमळाचे देठ हातात घेतल्यावर खरा पक्ष आमचाच असा प्रचार घसा ताणून ताणून करावा लागल्याने त्यावर सूज आली हाही तर्क तद्दन खोटा. कुणाचा पक्ष खरा व कुणाचा खोटा याचा निवाडा देण्याची जबाबदारी कमळाने खांद्यावर घेतल्याने दादा नििश्चत झाले असून आजारपण व याचा काहीएक संबंध नाही हे सर्वानी ध्यानात ठेवा. नेमकी मंत्रिमंडळाची बैठक असते त्याच दिवशी दादांची तब्येत कशी काय खराब होते असले फालतू प्रश्न तर अजिबात नको. आजारपण असे ठरवून आणण्यातले दादा नाहीत. स्पष्ट व खरे बोलणे हाच त्यांचा मूळ स्वभाव. काकांच्या सावलीतही ते रुसून बसायचे व आताही बसतात असे समजण्याचे काही कारण नाही. राजकारणातले ‘मर्दगडी’ अशीच त्यांची ओळख, त्यामुळे ‘रुसूबाई’सारखी विशेषणे वापरून त्यांचा अपमान करू नका. सत्तेच्या कळपात आल्यापासून त्यांना ठाणे व नागपूरशी सतत बोलावे लागते व उत्तररात्री काकांशीसुद्धा हितगुज करावे लागते, त्यामुळे त्यांच्या घशावर कमालीचा ताण आला अशी अफवा पसरवण्याचे काहीच कारण नाही. दादा लवकरच ठणठणीत होतील व त्याच जरबेने पुन्हा बोलू लागतील यावर विश्वास ठेवा!