एल. के. कुलकर्णी

एका कॅथॉलिक धर्मगुरूने शास्त्रज्ञ म्हणून भूकंप व ज्वालामुखीच्या अभ्यासासाठी जीवन वाहून घ्यावे आणि ज्वालामुखींच्या छायेतही जो सुरक्षित राहिला, त्याचा थोड्याशा धनासाठी कुणी तरी जीव घ्यावा, हे सगळेच किती अतर्क्य आहे…

magma ocean on moon (1)
एकेकाळी चंद्रावर होता धगधगता लाव्हारस? ‘चांद्रयान-३’ने उलगडली चंद्राची रहस्ये
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Tiger, Resort, tiger enters in resort, Pench Tiger Reserve, Tourists, Madhya Pradesh, Panic, Forest Department, Wildlife,
Video : वाघाला रिसॉर्टमध्ये आली डुलकी, नंतर आले हत्ती; अखेर…
1897 worst earthquakes in india
भूगोलाचा इतिहास : भुकंप आणि भारत
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : युक्रेनने केले ते योग्यच!
Gosekhurd, Gosekhurd project victims,
स्वातंत्र्यदिनी आत्मदहन! गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा इशारा
China is building village on border What is Border Guardian policy Why would it be dangerous for India
सीमेवर गावेच्या गावे वसवित आहे चीन… काय आहे ‘बॉर्डर गार्डियन’ धोरण? ते भारतासाठी का ठरणार धोकादायक?
kerala jewish decreasing population
भारतातील कोचीन ज्यू समुदाय नामशेष होण्याच्या मार्गावर; कारण काय? जाणून घ्या या समुदायाचा इतिहास

भूकंप ही मानव जातीच्या उत्पत्तीपासून ज्ञात अशी नैसर्गिक आपत्ती असावी. मात्र त्याची सर्वात प्राचीन नोंद इ. स. पूर्व १८३१ मध्ये चीनच्या शांडुंग प्रांतात झालेल्या भूकंपाची आहे. पुढे चीनमध्येच इ. स. पूर्व ७८० मध्ये झालेला भूकंप, हा व्यवस्थित तपशील नोंदवलेला पहिला भूकंप. भारतात नोंदवला गेलेला पहिला भूकंप १६ जून १८१९ रोजी कच्छच्या आखातात अल्लाबंड येथे झाला होता.

लाखो वर्षांपासून जगभर कुठे न कुठे अव्याहत भूकंप होत आहेत. ग्रीकांच्या कल्पनेनुसार आपली पृथ्वी ही अटलास नावाच्या देवतेने आपल्या खांद्यावर तोलून धरली असून तो कधी कधी खांदा बदलतो, तेव्हा भूकंप होतो. चिनी, भारतीय किंवा सर्व संस्कृतीत भूकंप हे अरिष्टसूचक, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा दैवी प्रकोप याचे चिन्ह मानले जाई.

हेही वाचा >>> बुकमार्क : दैवतांच्या अतर्क्य जगात…

भारतात अनेक प्राचीन ग्रंथांत भूकंपसदृश घटनांचा उल्लेख आढळतो. मात्र विशिष्ट अशा भूकंपाची नोंद उपलब्ध नाही. पाचव्या शतकातील प्रसिद्ध ज्योतिषी वराहमिहीर याच्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात भूकंप, त्याचे प्रकार, इ.बद्दल उल्लेख आहेत. दहाव्या शतकात बंगालमध्ये बल्लाळसेन हा राजा होऊन गेला. त्याच्या ‘अद्भुत सागर’ नावाच्या ग्रंथातही भूकंपासंबंधी माहिती आहे. वराहमिहिराने भूकंपाचे आग्नेय, वायव्य, एन्द्र व वरुण असे चार प्रकार मानले असून, ते ते भूकंप कोणत्या प्रदेशात होतात व त्याचे ‘फल’ (परिणाम) काय, हेही सांगितले आहे. अशा पारंपरिक कल्पनेनुसार भूकंप हे समुद्रातील महाप्रचंड जलराक्षसांच्या किंवा पृथ्वीला आधार देणाऱ्या विशाल हत्तींच्या हालचालीमुळे, वाऱ्यांच्या प्रचंड टकरी व त्याचे पृथ्वीवर आघात यामुळे होतात. पूर्वी पर्वत पंखधारी असून, ते उडताना हालचालीमुळे भूकंप होत. पुढे पृथ्वीच्या विनंतीवरून इंद्राने पर्वतांचे पंख कापले अशीही एक कल्पना होती. एकंदर हे सर्व काल्पनिक असले तरी त्यातून भूकंपाचा जनमानसावरील प्रभाव दिसून येतो. पण भूकंप का होतात याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण खूप उशिरा मिळाले.

ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी, त्या परिसरात भूकंपाचे हादरे बसतात हे फार पूर्वी लक्षात आले होते. भूमिगत अणुस्फोटामुळेही भूकंप होतो. कृत्रिम मोठे जलाशय व धरणे यांचाही भूकंपाशी संबंध असावा हे विसाव्या शतकात लक्षात आले. पण इतर हजारो भूकंपाचे कारण भूकवचाखाली होणाऱ्या मोडतोडीत दडलेले आहे. ते अगदी अलीकडे, ५० वर्षांपूर्वी समजले. १९७० च्या दशकात विकसित झालेल्या ‘प्लेट टेक्टॉनिक्स सिद्धांता’तून भूकंप का होतात याचे स्पष्टीकरण मिळाले. भूकवच व त्याखालील पृथ्वीच्या शिलावरणाचा वरचा थर (एस्थेनोस्फिअर) आठ मोठ्या तुकड्यांत विभागलेला असून त्यांना ‘टेक्टॉनिक किंवा शिलावरण प्लेट्स’ म्हणतात. या शिलावरण प्लेट्स सतत एकमेकांपासून दूर वा जवळ सरकत असल्याने त्यांच्या सीमाक्षेत्रावर सतत प्रचंड दाब वा ताण निर्माण होतो. वर्षानुवर्षे सतत साठत जाणारा हा दाब वा ताण एका विशिष्ट मर्यादेहून अधिक झाला की तेथील खडकांची मोडतोड होते. त्या मोडतोडीतून मुक्त झालेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपात दूरपर्यंत पोहोचते व त्याचे परिणाम आपणास जाणवतात. टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमाक्षेत्राप्रमाणेच इतरत्रही भूकवचाला भेगा व तडे गेलेले आहेत. त्याही क्षेत्रात याच प्रकारे भूकंप होतात. भूकंपासाठी संवेदनशील असलेल्या अशा क्षेत्रांना ‘भूकंपप्रवण क्षेत्र’ म्हणतात.

हेही वाचा >>> बुकबातमी : ब्रिटिश बुकर यादीवर अमेरिका स्वार…

पण सर्व भूकंप सारखेच विध्वंसक नसतात. लहान, मोठा, सौम्य इ. शब्दांतून भूकंप नक्की किती विध्वंसक वा शक्तिशाली होता हे नेमके कळत नाही. भूकंपाचा अभ्यास व संरक्षक उपाय इ.साठी भूकंपाची तीव्रता सांगता येणे फार आवश्यक होते.

इटलीतील गुसीप मेर्काली या संशोधकाने १८८३ मध्ये भूकंपाची तीव्रता व्यक्त करणारी एक श्रेणी – स्केल – मांडली. यात भूकंपामुळे झालेल्या हानीवरून त्याची तीव्रता पायऱ्या किंवा श्रेणीतून मांडण्यात आली होती. मुळात ही श्रेणीसुद्धा त्यापूर्वी प्रचलित अशा ‘रोसी – फोरेल स्केल’ नावाच्या श्रेणीवर आधारित होती. तिच्यात बदल करून मेर्काली यांनी आपली सहा पायऱ्यांची भूकंप श्रेणी १८८३ मध्ये मांडली. पण पुढे त्यात सुधारणा करून त्यांनी १९०२ मध्ये १० पायऱ्यांची भूकंप तीव्रता श्रेणी जाहीर केली. ही श्रेणी लगेच बहुतेक देशांनी स्वीकारली व ती ‘मेर्काली श्रेणी’ (Mercalli Scale) याच नावाने प्रसिद्ध झाली. १९३५ मध्ये ‘रिश्टर श्रेणी’ येईपर्यंत भूकंपासाठी फक्त मेर्काली श्रेणीच वापरात होती. रिश्टर स्केल आल्यानंतर व्यवहारातही रिश्टर स्केलच वापरला जाऊ लागला. तरीही भूकंपाची तीव्रता सांगण्यासाठी मात्र मेर्काली श्रेणीच वापरली जाते. मूळच्या मेर्काली श्रेणीत पुढे चालून बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. सध्या प्रचलित असणारी मेर्काली श्रेणी ही बारा पायऱ्यांची असून ती पुढीलप्रमाणे आहे.

१. फक्त काही जणांना जाणवला.

२. विश्रांती घेणारांना जाणवला. टांगलेल्या नाजूक वस्तू झोके घेऊ लागल्या.

३. घरातील अनेकांना जाणवला. कालावधी ठरवता आला.

४. घरातील बहुतेकांना जाणवला. लोक जागे झाले. खिडक्या-दारे खडखडली.

५. बहुतेकांना जाणवला. बशा, तावदाने फुटली. लंबकाची घड्याळे बंद पडली.

६. सर्वांना जाणवला. उंच धुराडी, गिलावा निखळला. फर्निचर सरकले, वस्तू उलट्यापालट्या झाल्या.

७. सर्व जण घराबाहेर पळाले. चालत्या वाहनात जाणवला. इमारतींना थोडे नुकसान.

८. कच्च्या इमारतींची मोडतोड, पक्क्या इमारतींचे थोडे नुकसान. भिंती पडल्या. फर्निचर उलटे. वाळू-चिखलाचे फवारे, विहिरींच्या जलपातळीत फरक.

९. सर्वत्र गोंधळ. कच्च्या इमारती जमीनदोस्त. पक्क्या इमारतींचे बरेच नुकसान. भूमिगत वाहिन्यांची मोडतोड. जमिनीला भेगा.

१०. फक्त मजबूत इमारती टिकल्या. इमारतींचे पाये नष्ट. जमिनीला मोठ्या भेगा. रेल्वेचे रूळ वाकले. नद्यांचे पाणी किनाऱ्याबाहेर आले.

११. मोजक्या इमारती टिकल्या. जमिनीस मोठमोठ्या भेगा. भूमिगत वाहिन्या निरुपयोगी

१२. पूर्ण विनाश. गुरुत्वाकर्षणापेक्षा वेगाने वस्तू हवेत फेकल्या गेल्या. जमिनीला लाटांचे स्वरूप आले.

खरे तर गुसीप मेर्काली हे एक कॅथॉलिक धर्मगुरू असून ते मिलान येथील धार्मिक विद्यालयात ‘निसर्ग विज्ञाना’चे प्राध्यापक होते. इटालियन सरकारने त्यांना भूगर्भशास्त्राचे प्रोफेसर नेमले. १८८० च्या दशकात ते कॅटानिया, नेपल्स इ. विद्यापीठांत काम करीत. पुढे त्यांची नेमणूक व्हेसुव्हियस वेधशाळेचे संचालक म्हणून झाली व अखेरपर्यंत ते तेथेच कार्यरत होते. या काळात त्यांनी व्हेसुव्हियस सोबत स्ट्राँबोली व व्हल्कन या ज्वालामुखीच्याही उद्रेकाचा अभ्यास केला. व्हेसुव्हियस ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरचे पहिले छायाचित्रही त्यांनीच घेतले होते. त्यांच्या अभ्यासातूनच स्ट्राँबोली व व्हेसुव्हियस यांच्या ‘उद्रेकता सूची’ (explosivity index)चा पाया घातला गेला. दुर्दैवाने १९ मार्च १९१४ रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी नेपल्स येथे ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या घरातले १४०० डॉलर्स (आजच्या हिशेबाने) चोरीला गेले होते. त्यावरून चोरीच्या उद्देशाने त्यांना ठार मारण्यात आले असावे, असे मानले जाते.

एका कॅथॉलिक धर्मगुरूने शास्त्रज्ञ म्हणून भूकंप व ज्वालामुखीच्या अभ्यासासाठी जीवन वाहून घ्यावे आणि ज्वालामुखींच्या छायेतही जो सुरक्षित राहिला, त्याचा थोड्याशा धनासाठी कुणी तरी जीव घ्यावा, हे सगळेच किती अतर्क्य आहे… भूगोलाच्या इतिहासात अशी अकल्पित धक्के देणारी अनेक पाने आहेत.

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.