दहा वर्षे झाली अमेरिकी कादंबऱ्यांसाठी ‘बुकर’ क्षेत्र खुले करून. अन् आता इथले सर्वाधिक स्पर्धकच अमेरिकेतील. पूर्वी कसे राष्ट्रकुल देशांपुरते असलेल्या या पुरस्काराच्या दीर्घ यादीत एक तरी भारतीय वंशाचे नाव असे. लेखक जन्मापासून ब्रिटन, आफ्रिकेत वा दुबईमध्ये राहत असलेल्या या पुरस्काराच्या यादीत भारतीय नाव पाहून इथली माध्यमे अन् अर्धाळलेले वाचकही सुखावत. आता ते भाग्य जसे भारतीयांच्या वाट्याला नाही, तसे खुद्द पुरस्कार देणाऱ्या ब्रिटिशांच्या माथीही नाही. कारण सहा अमेरिकीपैकी तीन तगडी (रेचल कुशनेर, पर्सिव्हल एव्हरेट, रिचर्ड पॉवर्स), दोन पूर्वी लघु याद्यांमध्ये झळकलेली (एक चार वेळा दीर्घ यादीत डोकावलेला), दोन बऱ्यापैकी प्रसिद्ध (क्लेअर मेस्यूड, टॉमी ऑरेंज) आणि एक पहिल्याच कादंबरीद्वारे प्रतिस्पर्ध्यांना ठोसा द्यायला सिद्ध झालेली लेखिका (रिटा बुलविंकल) या सहांपैकी लघु यादीत उरणाऱ्यांची संख्याही अधिक असणार यात शंका नाही. येत्या काही वर्षांत ब्रिटिश आणि राष्ट्रकुल देशांतील लेखक तक्रार करतील इतके अमेरिकेने या पुरस्काराच्या स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. अमेरिकेचे ‘नॅशनल बुक अॅवार्ड’ आणि ‘पुलित्झर’सह बरीच (नाव आणि पैशांनीही) मोठी पारितोषिके जसे आपल्या देशांपलीकडे पाहत नाहीत, तसे ‘बुकर’नेही का करू नये, अशी चर्चा आता ब्रिटिश माध्यमे करू लागली आहेत. यंदा या १३ जणांच्या दीर्घ यादीत फक्त तीन ब्रिटिश, एक आयरिश लेखक आहे. भारतीय उपखंडातील, दक्षिण आशियाई देशातीलदेखील एकही लेखक नाही. आफ्रिकी देशांतूनही एकही लेखक दीर्घ यादीत येऊ शकलेला नाही. एडमंड डी वाल या कला क्षेत्रातील ‘दादा’ लेखक व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीत यंदा कादंबरीकार सारा कॉलिन्स, गार्डियन वृत्तपत्राच्या फिक्शन एडिटर जस्टिन जॉर्डन, कथालेखिका आणि प्राध्यापिका यियून ली आणि ब्रिटिश संगीतकार नितीन स्वानी यांचा समावेश आहे. त्यांनी १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या (होणाऱ्याही) शेकडो कादंबऱ्यांतून ही १३ नावे निवडली आहेत. हेही वाचा >>> बुकबातमी : ‘बिघडलेल्या’ कुटुंबाची कथा यंदा बुकरच्या स्पर्धेत आलेल्या अगदीच नवख्या नावांत याएल वान डर वाडन या डच लेखिकेची ‘द सेफ कीप’ ही पहिली कादंबरी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर दीड दशकानंतरच्या नेदरलँड्समध्ये कथानक घडते. डचांचा एका काळाचा इतिहास आणि दोन महिलांमधील द्वंद्व असे या कादंबरीचे स्वरूप आहे. शार्लट वुड या ऑस्ट्रेलियाच्या लेखिकेचा बुकरच्या यादीत पहिल्यांदाच समावेश झालाय. त्यांच्या ‘स्टोन यार्ड डिव्होशनल’ या सातव्या कादंबरीला हे नामांकन मिळाले. ब्रिटनमधील वर्जिनिया वुल्फ असे कौतुक होणारी आणि योगबहाद्दर ही वेगळी ख्याती असलेली समंथा हार्वे यांची ‘ऑरबिटल’ ही कादंबरी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घडते. कॅनडातील कवयित्री आणि लेखिका एन मिशेल यांची ‘हेल्ड’ कादंबरी पहिल्या महायुद्ध काळातील फ्रान्सचे दर्शन घडविते. सारा पेरी या ब्रिटनमधील लोकप्रिय लेखिका. त्यांची नव्वदीचे दशक रंगविणारी ‘एनलाइटमेण्ट’ ही कादंबरी पहिल्यांदाच बुकर परिघात आली आहे. ही बुकरमुळे जगाला नव्याने कळणारी नावे असली, तरी इतर लेखक बऱ्यापैकी माहिती असलेली आहेत. त्यातले आजच्या घडीचे सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे पर्सिव्हल एव्हरेट. ‘अॅडव्हेन्चर ऑफ हकलबरी फिन’ या कादंबरीचा नवावतार ‘जेम्स’ यंदाचा बुकर घेऊन जाईल, असा अंदाज ब्रिटिश माध्यमेच वर्तवत आहेत. टॉमी ऑरेन्ज हा नेटिव्ह अमेरिकी जगण्याला कादंबरीतून मांडणारा तरुण लेखक. ‘वाँडरिंग स्टार्स’ या त्याच्या दुसऱ्याच कादंबरीने बरीच हवा केली आहे. नामांकनात कादंबरी पहिल्यांदाच दाखल झाली आहे. रेचल कुशनेर हिच्या ‘मार्स रूम’ने यापूर्वी बुकरच्या लघु यादीत धडक दिली होती. पत्रकार आणि लेखिका असलेल्या कुशनेर यांची ‘क्रिएशन लेक’ ही कादंबरी फ्रान्समध्ये घडणारी सिनेमॅटिक थ्रिलरसारखी आहे. रिटा बुलविंकल यांच्या नावे एक कथासंग्रह आहे. पण महिला मुष्टियुद्धावर असलेली ही कादंबरी खूपविकी म्हणून गणली गेलेली आहे. सिनेमा-मालिका बनण्याची शक्यता असलेली अशी. लघु यादीत आली, तर ही कादंबरी मोठ्या नावांना मागे टाकू शकते. हिशम मटार यांची राजकीय कादंबरी ‘माय फ्रेण्ड्स’ ही ४६४ पानांची. क्लेअर मेस्यूड यांच्या ‘धिस स्ट्रेंज इव्हेण्टफुल हिस्ट्री’मध्ये सात दशकांतील पाच निवेदकांच्या कहाण्या आहेत. दीर्घ यादीत ‘प्लेग्राऊंड’ ही रिचर्ड पॉवर्स यांची कादंबरी आहे. बुकरच्या यादीत चौथ्यांदा झळकलेले हे नाव. पर्यावरणाचा ऱ्हास हा या लेखकाचा हातखंडा विषय. या प्लेग्राऊंड कादंबरीत तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांची सांगड घालण्यात आली आहे. यातले एक वेगळे नाव म्हणजे तरुण आयरिश लेखक कॉलिन बॅरेट. एक दशकभर ब्रिटिश मासिकांमध्ये कथा झळकल्यानंतर त्याच्या कथा न्यू यॉर्कर साप्ताहिकाने छापण्यास सुरुवात केली. अवघ्या तिशीत न्यू यॉर्करमध्ये कथा चमकवलेला आयरिश लेखक ही त्याची दुसरी ओळख. न्यू यॉर्करच्या संकेतस्थळावर त्याच्या पाच कथा वाचता येऊ शकतात. त्याची पहिलीच कादंबरी ‘वाइल्ड हाऊस’ यंदा बुकरसाठी नांमांकित आहे. आयर्लंडमधील एका छोट्या शहरातील अपहरणनाट्यातील विनोद असे त्याचे कथानक. बुकरची लघु यादी येण्यासाठी अद्याप दीड महिना आहे. तोवर भारतीय बाजारात यातील नव्वद टक्के कादंबऱ्या आलेल्या असतील. अमेरिकी कादंबऱ्या मिळविण्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्गही अनंत असताना लघु यादी आल्यानंतर यंदाच्या बुकर स्पर्धेतील पुस्तकांचे वाचन करायचे की नंतर हाच पट्टीच्या वाचकांसाठी प्रश्न असेल.