महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ ही ग्रंथालयांची राज्यस्तरीय शिखर संस्था. या संस्थेचे वार्षिक अधिवेशन दरवर्षी होत असते. असे ३१वे अधिवेशन २७ व २८ फेब्रुवारी, १९८७२ला वाई (जि. सातारा) येथे झाले, त्याचे स्वागताध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. संमेलनाध्यक्ष ‘स्वामी’कार रणजित देसाई होते. या संमेलनाचे उद्घाटन प्रा. ग. प्र. प्रधान यांनी केले होते. स्वागतपर भाषणात तर्कतीर्थांनी वाईची ग्रंथपरंपरा विशद करून ग्रंथव्यवहाराचे महत्त्व लक्षात आणून दिले होते. त्या भाषणाचा सारसंक्षेप :

‘‘ग्रंथ हा माणसाचा चिरंतन शिक्षक आहे. हाडामांसाचा-रक्ताचा शिक्षक केव्हा दूर जाईल, बाजूला होईल वा केव्हा कालवश होईल, याचा नियम नसतो. ग्रंथाचे तसे नसते. तो नीट सांभाळला तर कायम उपलब्ध होतो. ग्रंथ हे अक्षरामध्ये निबद्ध असल्यामुळे त्यातील माहिती किंवा ज्ञानसंपत्ती महत्त्वाची असेल, तर तो कालवश होण्याची भीती कमी असते, तो तसा सहसा होत नाही. शब्दाने ज्ञान चिरस्थायी बनते आणि तो शब्द अक्षर बनला म्हणजे त्याला अमरत्व प्राप्त होण्याची शक्यता प्राप्त होत असते. प्रतिभावंत कवी, विचारवंत, प्रज्ञावंत, शास्त्रकार व कलाकार हे ग्रंथरूपाने वा चित्ररूपाने अमर होतात. ग्रंथकाराची ग्रंथ ही वाङ्मयमूर्ती असते. या वाङ्मयमूर्ती हजारो वर्षे टिकतात आणि ग्रंथालयामध्ये एकत्र जमत जातात.

ज्ञानसंग्रह जितका मोठा तितकी संस्कृती मोठी. पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे, म्हणून पुस्तक मस्तकावर जे निरंतर धारण करतात, तेच जीवनयात्रेत यशस्वी होतात. पुस्तक ही संसार तारून नेणारी नौका आहे. हे नौदल ज्यांचे अधिक समर्थ ते भवसागरामध्ये अधिक यशस्वी होतात. मनुष्याच्या शिक्षणाचे अत्यंत यशस्वी असे अमोल साधन म्हणजे पुस्तक होय.

प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये जेव्हा विद्या आणि कला यांची सर्व बाजूंनी भरभराट होत होती तेव्हा विचारवंत, लेखक आणि कलाकार यांना आविष्काराचे संपूर्ण स्वातंत्र्य होते. जगज्जेता सम्राट अलेक्झांडर हा जेव्हा सिंहासनावर आला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, यापुढे या उच्च पुस्तकी संस्कृतीचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. त्याने इजिप्तवर स्वारी केली आणि तेथे नाईलच्या मुखाजवळ भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर ‘अलेक्झांड्रिया’ या नावाच्या नगरीचे पुनर्वसन केले. त्या नगरीत एक संग्राहक व सर्वोत्तम ग्रंथालय निर्माण केले. ग्रीकांच्या पुस्तकी विद्यांचे संरक्षण होईल अशी तरतूद केली आणि त्याद्वारे ग्रीकांच्या बौद्धिक संस्कृतीला अमरपट्टा प्राप्त करून दिला. अनेक शतके तेथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात तत्कालीन विद्या व कला यांचे अध्ययन व अध्यापन चालू होते. इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या अखेरीस ख्रिाश्चन धर्मवेड्यांनी तेथील ज्युपिटरचे देऊळ, ग्रंथालय व संग्रहालयही धुळीस मिळविले. जेव्हा जेव्हा रासवट रानदांडगे, शस्त्रधारी व सत्ताधारी पुस्तकी संस्कृतीची उपेक्षा करतात व नाश करतात तेव्हा राष्ट्रांचा ऱ्हास होऊ लागतो. तेथूनच राष्ट्राच्या व विशेषत: भारताच्या ग्रंथसंपदेचा वारंवार विध्वंस केल्याच्या कथा इतिहासात नमूद झाल्या आहेत.

आज भारतात स्वातंत्र्योत्तर काळात संसदीय लोकशाही राज्यपद्धती स्थापन झाली आहे. या लोकशाहीची स्थापना एका उत्कृष्ट राज्यघटनेने घटना समितीद्वारा झाली आहे. लोकशाहीचे लोकशिक्षण हे अधिष्ठान होय. आपल्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात कनिष्ठ, मध्यम व उच्च पातळीवर हजारो किंवा शेकडो शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यामानाने ग्रंथालयांचा विस्तार फारच अपुरा आणि तोटका दिसतो. ग्रंथालय हीसुद्धा नागरिकांची मुक्त शिक्षण संस्था असते. बालविद्यालय, माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय आणि विद्यापीठ या प्रकारच्या आकारिक पद्धतीने शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये शिकणारे आणि शिकवणारे, विद्यार्थी आणि शिक्षक आणि त्यांच्या व्यतिरिक्त असलेले लहान-मोठे नागरिक या सर्वांचे विद्यालय वा महाविद्यालय म्हणजे ग्रंथालय होय. बालपणापासून अखेरच्या क्षणापर्यंत ज्यात प्रवेश मिळतो आणि विद्या मिळते असे विद्यालय म्हणजे ग्रंथालय होय. लोकशाही शिक्षित, समर्थ लोकच चालवू शकतात. त्यामुळे ग्रंथालये ही निरंतर लोकशिक्षण देणारी विद्यापीठेच आहेत. त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देणे, हे नित्य वाचनानेच शक्य आहे’’

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com