दिवंगत माजी राष्ट्रपती आणि भारताच्या क्षेपणास्त्र-झेपेचे महत्त्वाचे शिल्पकार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात यंदाही ‘वाचन-प्रेरणा दिवस’ साजरा होईल. हा दिवस ‘राज्यभर सर्वदूर’ साजरा झाल्याचे समाधान मिळवण्यासाठी शाळा-शाळांतून शिक्षकांना हाताशी धरणे हाच हमखास मार्ग असल्याने कदाचित, १४ ऑक्टोबरच्या शनिवारीच विद्यार्थ्यांपर्यंत वाचन-प्रेरणा पोहोचेलसुद्धा! हे नेहमीचे कर्मकांड म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे बरे. पण यानिमित्ताने आपल्या राज्यभरातल्या साक्षर- शिक्षितांची, म्हणजे एकूण महाराष्ट्राची वाचन-प्रेरणा सध्या कुठे आणि कशी आहे, याचा ऊहापोह केल्यास काय दिसते?

शहरी आणि उच्च मध्यमवर्ग मराठी वाचत नाही, हे ढळढळीत वास्तव. एका पिढीपूर्वी या वर्गाने व. पु. काळे तरी वाचलेले असतात, पु. ल. देशपांडे लाडकेच असतात आणि फडके-खांडेकर वा अत्रे- चिं. वि. जोशी यांच्या तरी आठवणी हा वर्ग काढत असतो. पण नवे काही वाचावे, ही प्रेरणा या वर्गापासून एक तर दुरावली आहे किंवा याच वर्गाच्या इंग्रजी वाचनात ती जिरून गेली असेल, असे मानण्यास जागा आहे. ललित साहित्यातून जीवनदृष्टी मिळते यावर कुणाचाही विश्वास नाही आणि तो का नाही याचे कारणही कुणाला देता येत नाही.

21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tadoba online booking scam officials questioned three months ago
ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
Devid Dhavan And Govinda
मुलं कधीच गोविंदाचा सल्ला घेत नाहीत; सुनीता आहुजाचं वक्तव्य; डेव्हिड धवन अन् गोविंदातील दुराव्याबद्दल म्हणाली…
Loksatta lokrang Publisher obsessed with words
शब्द-सुरांत रमलेला प्रकाशक
the last book store
बुकमार्क : ‘ऑनलाइन’च्या महापुरातून वाचलेले लव्हाळे…
dilemma Ramdas Athawale Parbhani case
परभणी अत्याचार प्रकरणी रामदास आठवलेंची कोंडी

हेही वाचा >>> अन्वयार्थ : आरोग्य व्यवस्था सुधारणार कधी?

पण यापलीकडे वाचन-प्रेरणा जपणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे. त्यापैकी काही जण पिढीजात वाचक, पण आदल्या पिढीपेक्षा निराळी वाचन-आवड जोपासणारे. हे अनेक जण मराठी कमी वाचत असले तरी हिंदीतले उत्तम कथासाहित्य, लॅटिन अमेरिका वा पूर्व युरोपातल्या कादंबऱ्यांचे इंग्रजी अनुवाद, असा यांचा आवाका. या वर्गातल्या प्रत्येकाची भालचंद्र नेमाडे यांच्याबद्दल ठाम मते असतात, याच वर्गामुळे आनंद िवगकर, प्रवीण दशरथ बांदेकर ते प्रणव सखदेव यांच्यापर्यंत अनेक सशक्त लेखकांच्या पुस्तकांवर गेल्या दशकभरात काहीएक चर्चा घडल्याचे दिसते किंवा उदाहरणार्थ शिल्पा कांबळे यांची ‘निळय़ा डोळय़ांची मुलगी’सारखी कादंबरी या वर्गाचा पािठबा मिळवते. असा वर्ग कोणत्याही समाजात असणे आवश्यक असते- मराठीभाषक समाजात तर फारच! याच वर्गाच्या आदल्या पिढीमुळे पु. शि. रेगे- चिं. त्र्यं. खानोलकर यांच्यापासून दिलीप चित्रे, विलास सारंग आणि नामदेव ढसाळ – दया पवार यांना योग्य प्रतिसाद मिळू शकला होता. तरीही या प्रतिसादाचा चेहरामोहरा शहरीच होता आणि रा. रं. बोराडे यांच्यासारखे लेखक त्या वर्तुळाबाहेर राहिले होते. या अवस्थेत बदल होण्यासाठी जे सामाजिक स्थित्यंतर आवश्यक होते, ते महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांपासून घडू लागले- शहरांची वाढच नव्हे तर संगणक आणि मोबाइलप्रसार, छपाई आणि प्रकाशन व्यवसायाच्या भोवतीचे वलय ओसरून कोणालाही प्रकाशन व्यवसायात उतरण्याची उमेद देणारी तांत्रिक (आर्थिक नव्हे) अवस्था, प्रकाशकांचे आर्थिक रडगाणे आपापल्या पुस्तकांपुरते निवारणारे नव-लेखक सर्वदूर आढळणे, अक्षरधारा, बुकगंगा यांनी व्यवसायासाठी राबवलेल्या नव-संकल्पना.. असे ते बदल होते. पण त्याहीपेक्षा मोठा बदल कदाचित, पदवीनंतरही काही ना काही शिकणाऱ्या वा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या नव-वाचकांच्या पिढीने घडवला. न्गुगी वा थियोन्गो यांच्या ‘मातीगारी’ कादंबरीपासून रामचंद्र गुहांची पुस्तके वा ‘गुजरात फाइल्स’, ‘गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’सारख्या ललितेतर पुस्तकांचे अनुवाद उपलब्ध होण्याचा वेग गेल्या दशकात वाढला, तो या वाचकांमुळे. करोनाकाळातल्या स्थलांतराबद्दलची कादंबरी वा शिक्षणसंस्थांमधल्या गैर आर्थिक व्यवहारांचे चटके बसलेल्या नायकांच्या कथा मराठीत आल्या, त्याही वाचक-लेखकांमधल्या सामाजिक बदलामुळे. 

याच काळात सर्वांना समाजमाध्यमे जवळची वाटू लागली आणि मग फेसबुक वा व्हॉट्सअ‍ॅपवरच कोल्हापूरच्या ‘चाँद बुक डेली’चे इक्बाल लाड मराठी पुस्तके विकू लागले, कोल्हापूरचेच नेताजी कदम, पुण्याचे समीर बुक्स, ऑक्शन बुक्स, प्रभाकर आदी किंवा मुंबईतले अंबिका बुक्स हे आठवडय़ातून एकदा तरी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर पुस्तकविक्री करू लागले आणि त्यांचा पैसही वाढू लागला, अशा अवस्थेप्रत आपण आहोत. ‘पपायरस’सारखे मुंबईच्या उपनगरातले देखणे ग्रंथदालनही आता फेसबुकवर पुस्तके विकते. ही प्रगती मराठी पुस्तकव्यवहाराची नसून समाजमाध्यमाची आहे, पण तशी काही चर्चा होत नाही. ज्यांना जे वाचायचे ते मिळाले की सारेच खूश. मग एखादे ग्रंथदालन बंद का पडले किंवा वाचनालयाची दुरवस्था का झाली असे प्रश्न कुणी विचारत नाही.. त्याहीपेक्षा, वाचलेल्या पुस्तकाचा संबंध आपापल्या जीवनदृष्टीशी जोडून आत्मशोधपर चर्चा करणारेही कमीच असतात. त्यामुळे वाचक भरपूर असूनही ते ‘अदृश्य’च राहतात. ही सारी लक्षणे एका निष्कर्षांपर्यंत येतात : मराठी वाचन ही ‘मराठीभाषक समाजाची’ प्रेरणा नसून, या समाजातल्या अनेकांनी व्यक्तिगत प्रेरणा म्हणून जपली आहे.. तिचे सामाजिकीकरण होण्यात वर्गीय- आणि कदाचित वर्णीयसुद्धा- अडथळे असल्याने अशी कप्पेबंदी अटळ आहे.

Story img Loader