आयुष्य भरभरून आणि सच्चेपणाने जगणाऱ्या व्यक्ती फार दुर्मीळ असतात. आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती, विविधांगी अनुभव एखाद्या टिपकागदासारखे स्वत:त मुरवत त्याचा फार जबाबदारीने आणि अत्यंत मेहनतीने उपयोग करून घेत एक उत्तम माणूस, एक उत्कृष्ट कलावंत म्हणून स्वत:च स्वत:ला घडवणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार हे या अशा दुर्मीळ व्यक्तींच्या पंक्तीतील एक महत्त्वाचे नाव. एखाद्या व्यक्तीची जडणघडण ही अनेकदा त्याच्या भवतालावरही अवलंबून असते, असे म्हणतात.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लहानाचे मोठे झालेल्या पोतदार यांच्या आयुष्यावरही तेथील सांस्कृतिक वातावरणाचा, विशेषत: तिथे सतत राबता असलेल्या नाट्यकर्मींचा, कलावंतांचा आणि समवयीन, समानशील मंडळींचा गराडा यांचा प्रभाव पडला. त्यांच्यातील अभिनयगुणाचे बीज त्याचवेळी रुजले असले तरी प्रत्यक्षात कलाकार म्हणून त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश अंमळ उशिरानेच झाला. मात्र, तोवरही त्यांनी जे जे केले ते अगदी मनापासून आणि सच्चेपणाने केले.
इंदूरमध्ये असताना वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी मित्रांबरोबर बालोत्कर्ष मंडळाची स्थापना करून नाटकांचे प्रयोग बसवणे आणि अत्यल्प मानधन घेऊन प्रेक्षकांसमोर सादर करण्याची सुरुवात केली होती. नाटक, साहित्य या दोन्ही गोष्टी शिक्षण आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण प्रवासातही त्यांच्याबरोबरीने पुढे जात राहिल्या. अर्थशास्त्रात एम.ए. करून अच्युत पोतदार यांनी पहिल्यांदा मध्य प्रदेशात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते थेट लष्करात रुजू झाले.
१९६८ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर ते इंडियन ऑइल कंपनीत रुजू झाले आणि तिथे पुन्हा एकदा त्यांच्यातील कलाकार जागा झाला. पंडित सत्यदेव दुबेंकडून त्यांनी नाट्याभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. मग विजया मेहतांबरोबर ‘वाडा चिरेबंदी’सारखे नाटक मिळाले. पुढे ‘आविष्कार’च्या नाट्यचळवळीशी ते जोडले गेले. त्याचवेळी ‘दुबे यांचा शिष्य’ म्हणून चित्रपटांतही छोट्या भूमिका मिळू लागल्या. कला जोपासताना कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान त्यांनी सोडले नाही.
त्यामुळे उशिराने का होईना आपला कलाध्याय नव्याने सुरू करतानाही प्रामाणिकपणे नोकरी करायची आणि शनिवार – रविवार या दोन दिवसांत नाटकांचे प्रयोग वा चित्रीकरण करायचे, हा स्वत:ला घालून घेतलेला दंडक त्यांनी नोकरीतून निवृत्त होईपर्यंत नेमाने पाळला. त्यांच्या जगण्यातला – कलेतला हा सच्चेपणा आणि त्यांची शिस्त या दोन्हींमुळे चरित्र अभिनेत्यांच्या गर्दीतही ते वेगळे ठरले असे म्हटले तर वावगे होणार नाही.
जाहिरात आहे की चित्रपट आहे; चित्रपट असेल तर आपल्या भूमिकेची लांबी किती आहे यात न अडकता, आपल्याकडून त्या भूमिकेत काय वेगळेपणा आणता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे ‘अंगार’मध्ये ‘जग्गू, ए जग्गू’ करत मुलाच्या मागे असणारा खमका बाप ते ‘थ्री इडियट्स’मधला प्राध्यापकाचा छोटेखानी प्रसंग… प्रत्येक छोट्या-मोठ्या भूमिकेत ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यांच्या याच सहज अभिनयामुळे ते विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी यांच्यासारख्या दिग्दर्शकांचे आवडते कलाकार होते.
विधु विनोद चोप्रा यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात त्यांची भूमिका निश्चित असायची. मनोरंजन वाहिन्यांच्या आणि वलयांकित ‘स्टार्स’ची गर्दी असलेल्या चित्रपटात, जाहिरात माध्यमांतही ते चरित्र अभिनेते म्हणून लोकांचे लक्ष वेधून घेत राहिले. वयाची नव्वदी गाठेपर्यंतही त्याच उत्साहाने, सच्चेपणाने आणि समाधानी वृत्तीने भरभरून जगण्याची एकही संधी न सोडणारा हा कलावंत होता!
